computer

सगळ्यांना माहित असायला हवेत लवंगेचे ६ महत्त्वपूर्ण औषधी उपयोग!!

भारतामध्ये मसाल्यातील द्रव्य म्हणून लवंग खूप प्रसिद्ध आहे. केरळ प्रांतामध्ये मुख्यतः लवंगेची लागवड होत असे. आता पश्चिम घाटातही तिची लागवड होऊ लागली आहे. लवंगेचा तीक्ष्ण सुगंध निरनिराळ्या पदार्थांना स्वादिष्ट बनवण्यामागे मोठा हातभार लावतो. त्याबरोबरच दातांचे रोग आणि तोंडाच्या रोगांमध्येही परंपरेने ती सहजगत्या वापरली जाते. पण याखेरीजही लवंगेचे आणखी अनेक औषधी उपयोग आहेत, ते आज पाहू.

लवंगेची नावे –

इंग्लिशमध्ये क्लोव्ह आणि लॅटीनमध्ये सायजियम ऍरोमॅटीकम् या नावाने ओळखल्या जाणा-या लवंगेला संस्कृतमध्ये पुढील नावांनी संबोधलेलं आहे –

देवकुसुम, दिव्य, शेखर, लवंग, लव, श्रीपुष्प, गीर्वाणकुसुम (दैवी सुगंधी आणि उपयुक्त फुले असल्यामुळे)

श्रीप्रसून (चांगली फळे असणारी)

चंदनपुष्प (चंदनाच्या फुलांसारखी फुले असणारी)

श्री (पवित्र)

वारिज, जलज, तोयधिप्रिय, वारिसंभव (जलीय भागांमध्ये निर्माण होणारी असल्याने तिची ही नावे पडली आहेत)

लवंगलतिका (फुलांच्या नाजुकपणामुळे हे नाव पडले आहे)

याशिवाय –

हिन्दीमध्ये लौंग, बंगालीमध्ये लबंग, तमिळमध्ये किराम्बु, तेलुगूमध्ये कारावाल्लु अशी लवंगेची नावे आहेत.

लवंगेचे स्वरुप –

लवंगेचा सुमारे १५ मीटर उंचीचा सदाहरित वृक्ष असतो. झाडाची साल धुरकट, कोवळीशी असते. फांद्या खोडाच्या चारही अंगाने फुटलेल्या असतात. पाने हिरवी, लांबुडकी गोल आणि टोकाशी सरळ असून लांबीला सुमारे ८ ते १५ सेंमीची असतात. लवंगेची फुले तांबड्या त्रिकोणाकृती बेलबुट्टीची असतात. लवंगेचे झाड नवव्या वर्षी फुले देऊ लागते. वसंत ऋतूमध्ये लवंगेला फुले येतात. फुलाच्या कळ्या वाळवून बाजारामध्ये लवंगा म्हणून मिळतात. लवंगेची फळे ग्रीष्म ऋतूमध्ये लागतात. ती मांसल आणि २ ते ४ सेंमी लांबीची असतात. प्रत्येक फळामध्ये एकच बीज असते.

लवंगेचे गुण –

लवंग गुणाने तीक्ष्ण, स्निग्ध आणि पचायला हलकी असते. तिच्यामध्ये एक उडनशील तेल असते त्यामुळे तिला तो विशिष्ट सुगंध लाभला आहे. लवंग चवीला कडसर तिखट आणि शीत असते. ती कडसर तिखट असल्यामुळे कफाच्या रोगांमध्ये आणि थंड असल्यामुळे पित्ताच्या रोगांमध्ये वापरली जाते.

लवंगेचे उपयोग –

सर्वसाधारण आयुर्वेदिक औषधींप्रमाणे लवंगेचेही दोन प्रकारे उपयोग सांगितले जातात. बाह्य म्हणजे पोटात न घेता, शरीरावर बाहेरून वापरून घेतलेले उपयोग आणि अभ्यन्तर म्हणजे मुखावाटे खाऊन शरीरामध्ये गेल्यावर परिणाम म्हणून घेतलेले उपयोग. रोगांच्या उपचारांच्या दृष्टीने हे दोन्ही उपयोग जाणून घेणे गरजेचे असते.

बाह्य उपयोग –

लवंग तीक्ष्ण असल्यामुळे रस-रक्त धातू उचंबळून येतात आणि कार्यकारी होतात. त्याचबरोबरती सुगन्धी असल्याने ती बाह्य कृमी नष्ट करण्याचे कार्य करते. सर्दी-पडशांमुळे होणाऱ्या डोकेदुखीवर लवंगांचा लेप घालतात. काही प्रकारच्या त्वचा रोगांवरही असा लेप केला जातो. मुखरोग आणि दातांच्या विकारांमध्ये लवंगा चघळतात. दात किडून निर्माण होणाऱ्या -या पोकळीमध्ये आणि दात दुखण्याच्या त्रासामध्ये लवंगाच्या तेलाने भरलेला कापसाचा लहानसा बोळा दातांमध्ये धरल्यास त्यामुळे वेदनाशमन होते. किडलेल्या दातांतील कीडही लवंगाच्या तेलाने मरते.

पोटात घेता होणारे उपयोग –

पाचनसंस्थान –

लवंग पाचक, भूक वाढवणारी, रुची देणारी आहे. तीक्ष्णपणामुळे ती लाळग्रंथींना उत्तेजना देते आणि त्यामुळे लाळस्राव वाढवते. तोंडाचा कोरडेपणा दूर होतो. लवंग सुगंधी असल्यामुळे मुखदुर्गंधीचा नाश करते. तिखटपणामुळे तोंड स्वच्छ करते. हिच्यात वाताला खालच्या दिशेने ढकलून गुदमार्गाने बाहेर काढवण्याचा गुण असल्याने पोटदुखीमध्येही वापरली जाते. लवंग यकृताच्या ग्रंथींना उत्तेजना देते. यामुळे अग्निमांद्य, अरुचि, पोटफुगी, अम्लपित्त, उलट्या होणे, अतितहान लागणे अशा रोगांमध्ये उपयोगी पडते. पटकीमध्ये एक उकळी फुटलेल्या ५० मिली पाण्यात १५-२० लवंगा टाकून ते पाणी थंड झाल्यावर पिण्यास देतात. यामुळे उलट्या थांबतात, तहान-तहान होणं कमी होतं आणि जीव घाबरा होणंही थांबतं.

श्वसनसंस्थान –

कफ कमी करणारी, कफाची दुर्गन्धी नाहीशी करणारी, दमा कमी करणारी असल्यामुळे लवंग श्वासनलिकांमधील त्वचेवर परिणाम करते आणि कफ सुटण्यास कारणीभूत होते. खोकला, दमा, उचकी या रोगांमध्ये लवंग उत्तम काम करते. लवंग क्षयरोगामधला खोकला आणि कफाची दुर्गन्धी कमी करते.

रक्तवहनसंस्थान –

लवंग तीक्ष्णत्वामुळे हृदयाला उत्तेजना देते. त्यामुळे रक्ताभिसरण जोमाने होते. परिणामी रक्तदाबामध्ये थोडी वाढ होते. हृदय दौर्बल्य आणि रक्ताच्या घट्टपणामुळे होणा-या रोगांमध्ये लवंग उपयुक्त ठरते.

प्रजननसंस्थान -

लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी, गरोदर स्त्रियांमध्ये दुधाचा स्राव योग्य पद्धतीने करवण्यासाठी आणि शुक्राचा स्राव नीट करवण्यासाठी लवंग वापरली जाते. गरोदर स्त्रियांच्या उलट्यांमध्ये लवंग + मध यांचे चाटण उपयोगी पडते.

मूत्रवहनसंस्थान –

लवंगांमुळे वृक्कांना उत्तेजना मिळून मूत्रोत्पत्ती अधिक होते. त्यामुळे मूत्र व्यवस्थित सुटत नसेल तर लवंग वापरतात.

तापक्रम –

लवंग आमपाचक असल्यामुळे ती आमाचे पचन करून ज्वर म्हणजे ताप कमी करण्याचे कार्य करते. पाण्यामध्ये लवंग उकळून तयार केलेल्या लवंगाच्या पाण्याचा वापर तापामध्ये करतात. यामुळे आमपचन तर होतेच, पण त्याबरोबरच तापातील तहान लागणे, वांती होणे ही लक्षणेही दूर होतात.

कोणत्याही भारतीय घरामध्ये लवंग नेहमीच उपलब्ध असते. ती पाचक, ताप कमी करणारी, दुष्ट कफावर काम करणारी असल्याने दम लागण्याच्या त्रासावर उपयुक्त असल्यामुळे सध्याच्या काळामध्ये लवंग एखाद्या संजीवनीप्रमाणेच कार्यकारी व्हावी, यात काही संशय नाही.

 

लेखक : डॉ. प्रसाद अकोलकर

सबस्क्राईब करा

* indicates required