आपल्या स्वयंपाकघरातल्या काळ्या मिरीचा लेप आणि चूर्ण कोणकोणत्या आजारांवर प्रभावी औषध आहे? आयुर्वेद काय म्हणतो?
भारतातल्या स्वयंपाकघरात सहजपणे सापडणाऱ्या मिरीने एकेकाळी तेव्हा माहिती असलेल्या जगभरातल्या तमाम लोकांना आपल्या नादाला लावलं होतं. संपूर्ण युरोपातल्या घराघरातल्या बल्लव आणि सुगरिणींसाठी मिरी हा स्वयंपाकातला अत्यंत आवश्यक घटक आहे. रोमन लोकांनी भारतासोबत सोने आणि मिरी यांचा समसमा व्यापार केल्याचं सांगतात, म्हणजे एक किलो मिरीसाठी रोमनांनी एक किलो सोनं दिलेलं आहे म्हणे! यातली अतिशयोक्ती सोडली तरी स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गुणवत्तेबरोबरच मिरीमध्ये औषधी गुणवत्ताही ठासून भरलेली आहे. म्हणूनच आज आपण या मूळतः आपल्या भारतीय उपखंडामध्ये म्हणजे प्रामुख्याने कोकण प्रांत, केरळ्, मलेशिया, इन्डोनेशिया, सिंगापूर, जावा, बाली अशा स्थानी उत्पन्न होणाऱ्या मिरीच्या औषधी गुणधर्मांची माहिती करून घेऊ.
लॅटिन भाषेत मिरीला पायपर नायग्रम (Piper nigrum) असं नाव आहे. या नावामधला नायग्रम किंवा नायग्रा (निग्रा) म्हणजे काळा रंग आणि पायपर हा मिरीच्या संस्कृतमधल्या पिप्पली या नावाचा अपभ्रंश आहे. या अनुषंगाने मिरीची इतर संस्कृत भाषेतील तसेच भारतीय भाषांतली नावं समजून घेणं योग्य होईल.
मिरीची नावे –
संस्कृतमध्ये मिरी प्रामुख्याने मरिच या नावाने ओळखली जाते. याचं पुढे मिरी झालेलं आहे. याबरोबरच ग्रंथांमध्ये मिरी खालील वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते.
• कटुक (चवीला कटु अर्थात तिखट असल्यामुळे)
• श्याम, कृष्ण (काळ्या रंगाची असल्यामुळे)
• पलित, तीक्ष्ण, उष्ण (गुणाने तीक्ष्ण-उष्ण असल्यामुळे)
• सुवृत्त, वृत्तफल, कोल (आकाराने वाटोळी असल्यामुळे)
• शाकांग (स्वयंपाकात शाक-भाजीमध्ये वापर होत असल्यामुळे)
• यवनेष्ट (यवनांमध्ये म्हणजे रोमन लोकांमध्ये प्रिय असल्यामुळे)
• पल्लीजभूषण, धर्मपत्तन (अत्यंत लोकप्रिय असल्यामुळे)
• कृमिहर (जन्तांवर उपयोगी पडत असल्यामुळे)
त्याशिवाय ती हिन्दीमध्ये कालीमिर्च, गोल मिर्च, मिरिच या नावांनी, बंगालीमध्ये गोलमरिच, गुजरातीमध्ये मरी, तामिळमध्ये मिलागु, तेलुगूमध्ये मिरियालु, अरबीमध्ये फिलफिल अस्वद आणि फारसीमध्ये फिलफिल स्याह (स्याह = काळ्या रंगाचे) या नावांनी ओळखली जाते. इंग्लिशमध्ये मिरी ब्लॅक पेपर या नावाने प्रसिद्ध आहे.
काही संस्कृत ग्रंथांमध्ये पांढरी मिरी म्हणून एक स्वतंत्र द्रव्य सांगितलेलं आहे. काही ग्रंथांनी पांढरी मिरी हा काळ्या मिरीचाच एक प्रकार असल्याचे सांगितले आहे. असं असलं तरी, काळ्या मिरीची वरची काळ्या रंगाची आणि अत्यंत तिखट अशी साल काढून टाकली तर मिरीचा आतला दाणा पांढुरक्या रंगाचा दिसतो. त्यालाच पांढरी मिरी म्हणतात. काळी मिरी पाण्यात किंवा ताकामध्ये भिजवूनही तिची साल काढतात आणि पांढरी मिरी बनवतात मात्र साल काढलेली ही मिरी कमी तीक्ष्ण आणि कमी तिखट असते. पांढरी मिरी पांढरेपणामुळे सित, सितमरिच, सितवल्लिज, धवल, शुभ्रमरिच या नावाने ओळखली जाते.
स्वरूप –
मिरीचं झाड म्हणजे खूप मोठी वाढू शकणारी वेल असते. साधारणपणे तिला आंबा, नारळ, सुपारीसारख्या मोठ्या वृक्षांवर चढवतात. वेलीच्या फांद्यांच्या गाठीजवळून मुळं फुटून ती वृक्षांना धरतात आणि त्यांचा आधार घेत चढतात. मिरीची पानं विड्याच्या पानांसारखी दिसतात. ती लांबीला सुमारे १० ते १२ सेंमी आणि रुंदीला साधारण ५ ते ७ सेंमी असतात. गडद हिरव्या रंगांच्या पानांच्या पृष्ठभागावर शिरा ठसठशीतपणे दिसून येतात. मिरीला ग्रीष्म ऋतूमध्ये फुले येतात आणि ती लहानशी, भुऱ्या रंगांची असतात. मिरवेलीला पावसाळ्यादरम्यान फळे येतात म्हणजेच वेल गोल मिऱ्यांच्या गुच्छांनी लगडते. कच्च्या असताना या मिऱ्या हिरव्या असतात. पिकल्यावर लाल रंगाच्या होतात आणि वाळल्या की काळ्या दिसतात.
गुणधर्म –
मिरी चवीला अत्यंत तिखट आणि गुणाने उष्ण, तीक्ष्ण आहे. ती कफ आणि वात दोषांचं शमन करते, तर पित्त दोष वाढवते. मिरीचे विविध रोगांमध्ये बाहेरून आणि पोटात घेऊन काय परिणाम होतात, त्यांची आपण आता माहिती घेऊ.
बाह्य उपयोग –
• ताज्या म्हणजे निर्माण होऊन फार काळ न झालेल्या पुटकुळ्या, रांजण्वाडया, गळवे यांसारख्या रोगांमध्ये मिरीचा लेप उपयोगी पडतो. हा लेप गरम, सूज कमी करणारा, वाढलेल्या दोषांचं पचन करणारा, रक्त प्रवाहित करवणारा आणि वाढलेल्या मांसादिकांना खरवडणारा असल्यामुळे पामा, चामखीळ, नायट्यासारख्या निरनिराळ्या त्वचारोगांवर घातला जातो. त्वचारोगांच्या लक्षणांनुसार आवश्यकतेप्रमाणे मिरपूडीचा तेलातूनही लेप केला जातो. या लेपाने वेदना आणि सूज दोन्ही कमी होतात.
• रातांधाळेपणा, डोळ्यातील वाढणाऱ्या मांसावर, बुब्बुळांवरील अपारदर्शक पडदयावर मिऱ्यांचा मधात उगाळून योग्य प्रकारे सावधपणे अंजन करण्याचे विधान केलेले आहे. मात्र या उपायांना वैद्यकीय देखरेखीखाली करणेच योग्य. तसे न केल्यास अशा कृती नुकसान करवणाऱ्या होतात, याची नोंद घ्यावी.
• दातदुखी आणि किडलेल्या दातांसाठी मिरपूड दन्तमंजनासारखी वापरतात आणि मिरीच्या काढ्याने चुळा भरतात.
• घसा दुखत असल्यास, घशाला सूज आलेली असल्यास, घशात कफाचा त्रास होत असल्यास घशातील सूज आणि वेदना कमी करण्यासाठी, कफाचा त्रास दूर करण्यासाठी मिरीच्या काढ्याने गुळण्या करतात, मिरी तोंडात ठेवून चघळतात.
• सन्यास अर्थात आधुनिक वैद्यकामध्ये कोमा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या व्याधी-अवस्थेमध्ये मिरीचे चूर्ण नाकामध्ये फुंकण्याचा म्हणजे प्रधमन-नस्याचा उपाय सांगितलेला आहे.
पोटामध्ये घेऊन होणारे उपयोग –
• पचनसंस्था:
मिरी तीक्ष्ण आणि उष्ण असल्यामुळे भूक वाढवते. अन्नपचनाला मदत करते. मिरी तोंडातला आणि पोटामधला कफ दूर करते. जिभेवरच्या कफाचा चिकटा दूर झाल्यामुळे मिरी खाल्ल्यानंतर अन्नपदार्थांची चव व्यवस्थित कळते. मिरीमुळे यकृताला उत्तेजना मिळते आणि त्यामुळे पाचक स्राव योग्य प्रमाणात स्रवतात. यामुळे चांगल्याप्रकारे अन्नपचन होऊ लागतं. मिरी जंतांवर खूप उपयोगी पडते. जेवणात मिरी घेतल्यास जंत होण्याची सवय मोडते. कफासारखी बुळबुळीत शौचाला होत असेल तर मलाचा चिकटा दूर करून प्रकृती सुधारण्यासाठी मिरपूडयुक्त ताकाचा जेवणामध्ये घेण्याचा उपचार सांगितला आहे. याशिवाय भूक न लागणे, अपचन होणे, पोट फुगणे, पोटात वायू धरणे, पोटदुखी अशा रोगांमध्ये मिरपूड लिंबाचा रस किंवा ताकाबरोबर प्यायल्यास चांगला उपयोग होताना दिसतो.
• श्वसनसंस्था:
सर्दी, पडसें, खोकला, दम लागणे अशा श्वासाशी संबंधीत रोगांमध्ये मिरी चांगला परिणाम दाखवते. दम्याच्या रोगात वाढलेला आणि घशामध्ये अडकलेला कफ काढण्याचे काम मिरी योग्यप्रकारे करते.
• मज्जासंस्था:
मिरी, वात-नाड्यांच्या अशक्तपणामध्ये आणि वात-नाड्यांमधून संदेशांची देवाण-घेवाण करताना काही अडथळा येत असल्यास, त्यामुळे अवयवांमध्ये स्तब्धता येत असल्यास, वापरली जाते. ती वात-नाड्यांना उत्तेजना आणि बल देते.
• त्वचा:
मिरीचे अधिक प्रमाणात सेवन केल्यास घाम येतो. याद्वारे त्वचेची रन्ध्रे मोकळी होतात. या गुणामुळे मिरे तापामध्ये वापरले जाते. विशेषतः खूप जुन्या कफयुक्त तापामध्ये मिरी वापरतात. त्वचारोगांमध्ये मिरीचा वापर केला जातो. मिरीचा उपयोग खाज कमी करण्यासाठी केला जातो.
मिरी हे आपल्या स्वयंपाकघरामध्ये हमखास असणारा पदार्थ आहे. साध्या आणि छोट्याशा या मिरीमध्ये अन्नपदार्थ चविष्ट बनवण्याबरोबरच चांगले औषधी गुणधर्मही आहेत. आवश्यकतेप्रमाणे या गुणांचा वापर आता आपण सहज आणि निश्चितपणे करून घेऊ शकू, असा मला विश्वास वाटतो.
लेखक : डॉ. प्रसाद अकोलकर