computer

घरचा आयुर्वेद : दालचिनीचे हे सर्व आयुर्वेदिक फायदे तुम्हांला माहित आहेत का?

कोणत्याही समारंभामध्ये जेवणात पुलाव आहे हे आपल्याला ताटावर बसण्यापूर्वीच ज्या सुगंधामुळे कळतं तो असतो दालचिनीचा! हल्लीच्या काँटिनेंटल क्युझीनमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या सिनॅमन ब्रेड्स, सिनॅमन रोल्स, सिनॅमन ॲपल पाय अशा व्यञ्जनांमध्ये त्यांना त्यांचा वैशिष्ट्यपूर्ण सुवास देणारा घटक म्हणजे सिनामन म्हणजेच दालचिनी. आज आपण या दालचिनीतल्या औषधी गुणांबद्दल चर्चा करू.

नामावली -

सिनामन झायलोनिका (Cinnamonum zeylonica) या शास्त्रीय नावाने ओळखली जाणारी दालचिनी भारतीय उपखंडामधील महत्त्वाची वनस्पती आहे. हिचा उद्गम जरी सिंहलद्विपामध्ये सांगण्यात येत असला तरी ती दक्षिण भारत, हिमालयाचा तराई भाग, ब्रह्मदेश आणि चीनमध्येही तयार होते. आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये दालचिनीचे विस्तृत वर्णन येते. ग्रंथांमध्ये तिला त्वक् या नावाने अधिक संबोधलेले आहे. बहुधा दालचिनीच्या झाडाची साल वापरात येत असल्यामुळे हे नाव दिले गेले असावे. दालचिनीची इतर नावंही जाणून घेऊ.

• त्वक् या नावाप्रमाणेच झाडाची साल वापरत असल्याने दालचिनीला त्वग्, वरांग, तनुत्वक्, तनुक, शकल, त्वच्, वल्कल, गुरुत्वक् ही नावं दिलेली दिसतात.

• दालचिनी हे नाव मुळात संस्कृतमधील दारुसिता म्हणजे गोड लाकूड या नावावरून आल्याचं कळतं. याच अर्थाची त्वक्स्वाद्वि, गुडत्वक् ही नावं दालचिनीला दिलेली दिसतात.

• दालचिनीच्या सुगंधामुळे बहुगंध, गंधवल्क, हृद्य, भृंग, उत्कट, मनःप्रिय, रामप्रिय अशी नावं दिलेली दिसतात.

• सिंहलद्विपामध्ये मोठ्या प्रमाणावर तयार होत असल्याने दालचिनीला सैहल असे नावही दिल्याचे दिसते.

• दालचिनीच्या सुगंधाने मुखवासासारखा परिणाम घडत असल्यामुळे तिला मुखशोधन, मुखशोध्य, प्रिय, चोच ही नावं दिलेली आढळतात.

• दालचिनीच्या वैशिष्ट्यपूर्ण पानांमुळे तिला लटपर्णी, लाटपर्ण अशी नावं दिलेली सापडतात.

याशिवाय मराठी आणि हिन्दीमध्ये दालचिनी, बंगालीमध्ये दारुचिनी, गुजरातीमध्ये तज, तमिळमध्ये कारुया, तेलुगुमध्ये सानुलिफु, अरबीमध्ये दारसिनी, फारसीमध्ये दारचिनी आणि इंग्लिशमध्ये सिनॅमन या नावांनी दालचिनी ओळखली जाते.

दालचिनीच्या वृक्षाचे स्वरूप –

दालचिनीचा वृक्ष मध्यम उंचीचा असतो. तिची साल बाहेरून धूसर वर्णाची, तर आतून तांबडी असते. झाडाचा गाभा तांबूस रंगाचा असतो. दालचिनीची पानं त्वचेप्रमाणे जाडसर, बारीक लव असलेली असतात. ती पर्ण संरचनेमध्ये एकमेकांसमोर उगवतात. पानांचा वरचा भाग तकतकीत असतो आणि त्यावर ३ ते ५ शिरा स्पष्ट दिसतात. दालचिनीला वसंत ऋतुमध्ये धुरकट रंगाची फुलं येतात. फळे जांभळट रंगाची आणि लांबीला सुमारे ८ ते १२ सेमी असतात.

उत्पत्तीस्थानामुळे व्यवहारामध्ये बाजारात ३ प्रकारची दालचिनी मिळते.

• भारतीय दालचिनी जाड, तुलनेने कमी तीक्ष्ण असते. हिच्या पानांना तमालपत्र म्हणतात. भारतीय दालचिनी बाजारात तज या नावाने ओळखली जाते.

• चीन, ब्रह्मदेश आणि सिंगापूरमधून येणारी दालचिनी, ही बाजारात चिनी या नावाने ओळखली जाते. ही मध्यम तीक्ष्ण आणि मध्यम सुगंधी असते.

• सिंहली दालचिनी ही सगळ्यात चांगली मानतात. ही सर्वात पातळ, अव्वल सुगंधी आणि चवीला अत्यंत गोड असते.

उपयोग –

दालचिनी गुणाने उष्ण असल्यामुळे वात आणि कफाच्या विकारांमध्ये उपयोगात आणली जाते. ती पित्तवर्धक आहे. पण जी दालचिनी चवीला चांगली गोड असते, ती पित्ताचं शमन करते. दालचिनीचा औषधी वापर बाह्य आणि पोटात घेऊन अशा दोन्ही प्रकारे केला जातो.

बाह्य उपचार –

-दालचिनी तीक्ष्ण आणि उष्ण गुणाची असल्यामुळे सर्दीने डोकेदुखी होत असेल तर दालचिनीचा कपाळावर पाण्यातून लेप केला जातो.

-वांगेसारख्या त्वचारोगांवर दालचिनीचा पातळ लेप केल्यास उपयोग होतो.

-दातदुखीमध्ये किंवा दातांमध्ये पोकळ्या निर्माण झाल्या असतील तर त्यावर २ ते ४ थेंब दालचिनीचं तेल कापसाच्या बोळ्यात टाकून भारतात, त्यामुळे वेदना कमी होते.

-वेदनायुक्त सूज असल्यास दालचिनीचा लेप केला जातो.

-विंचवाच्या दंशावर दालचिनीचे तेल उतारा म्हणून वापरतात.

-लैंगिक दुर्बलतेमध्येही दालचिनीच्या तेलाचा बाह्योपचार केला जातो.

पोटात घेऊन उपचार –

दालचिनीचा उपयोग निरनिराळ्या रोगांमध्ये केला जातो. काही वेळा इतर औषधी वनस्पतींच्या बरोबरीने दालचिनी वापरून चांगले औषधी परिणाम घेतले जातात. यांची माहिती आता बघू.

• पाचनसंस्थान –

दालचिनी तीक्ष्ण, उष्ण आणि परिणामाने कटू असल्यामुळे ती पाचकाग्नी वाढवते. अन्नपचनामध्ये साहाय्यक होते. पोटातील वाताला खालून बाहेर पडण्यास उद्युक्त करते. ती यकृताला उत्तेजना देते. अग्निमांद्य, अरुचि, आमदोष, पोटदुखी यामध्ये दालचिनी चांगल्यापैकी उपयोगी पडते. जंताच्या विकारातही दालचिनी वापरतात. तोंडाचा चिकटा दूर करण्यासाठी, मुखदुर्गंधीचा नाश करण्यासाठी, दात बळकट करण्यासाठी दालचिनी चघळतात. मळमळ होऊन वान्ती होईल असं वाटत असेल तर दालचिनी चघळल्यास ती भावना नष्ट होते. मुदतीच्या तापामध्ये दालचिनीचे तेल वापरल्यास आतडयातील जखमांमध्ये चांगले परिणाम दिसतात.

• श्वसनसंस्थान –

दालचिनी कफाचा नाश करते. हिचा वापर फुप्फुसांतील रक्तस्राव थांबवण्यासाठी, तिथल्या जखमा भरून येण्यासाठी आणि दुर्गंधी नाशनासाठी केला जातो.

• रक्तवहसंस्थान –

दालचिनी सुगंधी असल्याने हृदयाला बल्य आणि उत्तेजक आहे. ही रक्ताला शुद्ध करणारी आणि रक्तकणांना वाढवणारी आहे. त्यामुळे हृदय दौर्बल्यआणि रक्ताच्या विकारांमध्ये दालचिनीचा उपयोग केला जातो.

• मूत्रवहसंस्थान –

दालचिनी आपल्या उष्ण-तीक्ष्णत्वाने मूत्रपिंडाला उत्तेजित करते, मूत्राचे प्रमाण वाढवते. कफ आणि मेद विकारांमध्ये दालचिनीचा वापर करण्याने मूत्राचे प्रमाण वाढून कफाचे आणि मेदाचे प्रमाण कमी करता येते.

• प्रजननसंस्थान –

दालचिनी गर्भाशयाचा संकोच करवते. त्यामुळे गर्भाशय सैल पडले असता अशोक सालीबरोबर दालचिनीचा योग करून वापरला जातो. लैंगिक दौर्बल्यामध्येही दालचिनी आणि साखर वापरतात.

दालचिनी हे भारतात उत्पन्न होणारे आणि मसाल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे पण तितकेच औषधी गुणधर्म असलेले औषधी द्रव्य आहे. स्वयंपाकघरामध्ये सहज उपलब्ध असलेल्या दालचिनीचे औषधी उपयोग समजून घेऊन आवश्यकतेप्रमाणे तिचा वापर करणं हे आपलं कर्तव्यच आहे, नाही का?

 

लेखक : डॉ. प्रसाद अकोलकर

सबस्क्राईब करा

* indicates required