वर्दीतल्या दुर्गा: उत्तर प्रदेशची पहिली महिला आयपीएस ऑफीसर 'कांचन चौधरी भट्टाचार्य'
कांचन चौधरी भट्टाचार्य हे असे नाव आहे ज्यांनी पोलीस खात्यात काम करून खात्याला एक नवी ओळख मिळवून दिली. या भारतातील दुसऱ्या महिला आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी केवळ गुन्हेगारांच्या मनात केवळ भीती निर्माण केली नाही, तर पोलिस सेवेत असताना त्यांनी अनेक स्तुत्य कामे केली. उत्तर प्रदेशातील त्या पहिल्या महिला IPS, पहिल्या महिला DIG आणि पहिल्या महिला IG आहेत. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी खूप महत्वाची कामगिरी केली. २०१९ मध्ये त्यांचे निधन झाले, पण त्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते.
कांचन चौधरी मूळच्या हिमाचल प्रदेशातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होत्या. त्यांनी अमृतसरमधून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आणि दिल्ली विद्यापीठाच्या आयपी कॉलेजमधून इंग्रजी विषयात एमए केले. त्यांनी १९७३ मध्ये आयपीएस परीक्षा दिली आणि देशातील दुसऱ्या महिला आयपीएस बनल्या. त्यांच्या वडिलांवर झालेला अन्याय कांचन व त्यांची बहीण कविता यांनी डोळ्यांसमोर पाहिला होता. म्हणून दोघींनी आयुष्यात काहीतरी मोठे करून दाखवायची शपथ घेतली. त्यांची बहीण कविता चौधरीने 'उडान' मालिकेद्वारे तिच्या वडिलांवरील झालेला अन्याय संपूर्ण देशाला दाखवला, तर कांचन चौधरी यांनी आयपीएस अधिकारी बनून पोलिसात नाव कमावले. कांचन यांच्या कामाची प्रेरणा कविता यांना दूरदर्शनच्या 'उडान' मालिकेसाठी मिळाली होती. १९९० मध्ये कविता यांनी स्वतः त्या मालिकेत काम केले होते.
कांचन या लखनौच्या मलिहाबादमध्ये कार्यरत होत्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक कठीण प्रकरणे हाताळली. १९८७ मध्ये सात वेळा राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियन सईद मोदीची हत्या आणि १९८९ मध्ये रिलायन्स-बॉम्बे डाईंग ही दोन्ही संवेदनशील प्रकरण त्यांनी खूप हुशारीने हाताळले. एवढेच नाही तर उत्तर मलिहाबाद येथे एसीपी असताना एकाच वर्षात भयानक डाकूंना गुडघे टेकण्यास भाग पाडले होते. त्या १९७५ ते १९७८ पर्यंत लखनौच्या एसपी आणि एसएसपी होत्या. बरेलीमध्ये त्या डीआयजी होत्या. सीबीआयमध्येही त्यांनी मोठ्या पदावर काम केले. १५ जून २००४ रोजी उत्तराखंडच्या पहिल्या महिला डीजीपी बनून त्यांनी नवा इतिहास लिहिला. त्यावेळी पोलिसांचे नाव बरेच बदनाम झाले होते पोलिसांची दहशत जनतेच्या मनात होती. कांचन यांनी ते ओळखले व २६ जूनच्या पहिल्या आढावा बैठकीत त्यांनी पोलिसांना ' सुधारा किंवा घरी जा' असे स्पष्ट शब्दात सांगितले. त्यानंतर तेथील जनतेसाठी पोलिसांची वागणूक खूप सुधारली. कांचन यांनी यूपी आणि उत्तराखंड कॅडर घेण्यापूर्वी मुंबईत सीआयएसएफमध्ये काम केले.
२००४ मध्ये त्यांनी मेक्सिकोमध्ये झालेल्या इंटरपोल बैठकीत भाग घेतला. त्यांनी अफगाणिस्तानलाही भेट दिली. ३३ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. १९९७ मध्ये त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले. २००४ मध्ये त्यांना राजीव गांधी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांनी काही काळ राष्ट्रीय मानवाधिकार आयोगातही काम केले. पोलीस सेवेतून निवृत्त झाल्यानंतर कांचन चौधरी यांनीही राजकारणात प्रवेश केला. २६ ऑगस्ट २०१९ मध्ये त्यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी दिर्घआजाराने निधन झाले.
धाडस आणि शौर्यासाठी नेहमी चर्चेत राहणाऱ्या कांचन चौधरी यांनी ३३ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक गुंडांना धडकी भरवली तसेच पोलीस खात्याची प्रतिमाही सुधारली. त्यांच्या कार्याला सलाम!
लेखिका: शीतल दरंदळे