१९३८ साली सर्वांना उपलब्ध झालेल्या टिटॅनस म्हणजेच धनुर्वाताच्या व्हॅक्सिनचा इतिहास म्हणजे शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रमाचा इतिहास आहे
टिटॅनस म्हणजे धनुर्वात हा तसा बाकीच्यांच्या तुलनेत कमी ग्लॅमरस आजार. याच्या व्हॅक्सिनच्या कधी जाहिराती येत नाहीत की इतर व्हॅक्सिनेशन मोहीमांसारखं टिटॅनसचं इंजेक्शन वाजतगाजत दिलं जात नाही. एखादं गंजकं ब्लेड लागलं किंवा जुन्या लोखंडी कपाटाचा पत्रा लागला की लोकांना टीटीच्या इंजेक्शनची आठवण येते. त्यापासून मिळालेली रोगप्रतिकारक शक्ती २ वर्षांपर्यंत टिकते. अर्थात धनुर्वात हा रोग दुर्लक्ष करण्याइतपत सहजपणे घ्यावा असाही नाही. प्रेग्नन्सी, शस्त्रक्रिया, अपघात अशा विविध केसेसमध्ये संभाव्य जंतुसंसर्ग टाळण्यासाठी टीटीचं इंजेक्शन घेतलं जातं. या टीटीच्या प्रवासाची ही गोष्ट.
धनुर्वात हा रोग मानवाला फार प्राचीन काळापासून माहीत असलेला रोग. हिप्पोक्रिटस या ग्रीक वैद्याचा स्वतःचा मुलगा या रोगामुळे मरण पावल्याची नोंद आहे. हा रोग मुख्यतः प्रसूत झालेल्या स्त्रिया, नवजात बालकं आणि जखमी सैनिक यांना होत असे.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काही वर्षांपर्यंत मानव संसर्गजन्य रोगांच्या बाबतीत पूर्णतः असहाय्य होता. रोगांच्या साथी येऊन माणसं किडामुंग्यांप्रमाणे मरत. गावंच्या गावं उद्ध्वस्त होत. धनुर्वाताची 'स्टोरी' काहीशी वेगळी होती. धनुर्वाताच्या सूक्ष्मजंतूंचा शोध लागण्यापूर्वी हा रोग प्रयोगशाळेत 'उत्पन्न' केला गेला होता. अँटोनियो कार्ल व रोटोन या शास्त्रज्ञांनी १८८४ मध्ये या रोगामुळे मरण पावलेल्या एका रुग्णाच्या चेहऱ्यावरच्या जखमेतला पू सशांच्या शरीरात सोडल्यावर त्या सशांना हा रोग होतो हे सिद्ध केलं होतं. आर्थर निकोलीअर या शास्त्रज्ञानेही हेच दाखवलं होत. त्याच्या मते हा रोग जखम झालेल्या ठिकाणी वाढ होत असलेल्या सूक्ष्मजीवांमुळे तयार होणाऱ्या स्ट्रिक्निन नावाच्या विषामुळे होत होता. नंतरच्या काळात कितासातो शिबासाबुरो या जपानी शास्त्रज्ञाने धनुर्वात, प्लेग या रोगांसाठीचे जिवाणू आणि इतर काही जिवाणूंचे प्रकार शोधून काढले. यामुळे या रोगांवर इलाज करण्यासाठीच्या संशोधनाला गती मिळाली. त्याआधी जपानमध्ये वैद्यकीय उपचारांसाठी चिनी औषधोपचारांचा वापर होत असे. सन १६०३ ते १८६८ या कालखंडात डच व्यापारी मोहिमांच्या निमित्ताने या देशाला पाश्चात्त्य वैद्यकीय ज्ञानाची ओळख झाली. मात्र १८६८ पर्यंत म्हणजेच मेईजी राजसत्तेच्या पुनरुज्जीवनापर्यंत या देशाने पाश्चात्त्य औषधांना फारसं स्वीकारलं नव्हतं. याच कालखंडातलं एक प्रमुख नाव म्हणजे कितासातो शिबासाबुरो.
कितासातो यांनी जपानच्या आरोग्य विभागात काही काळ काम केलं होतं. पुढे त्यांना १८८५ ते १८९२ या काळात जर्मनीमध्ये प्रख्यात जिवाणूशास्त्रज्ञ रॉबर्ट कॉख यांच्या मार्गदर्शनाखाली शिकण्याची संधी मिळाली. इथेच त्यांना जिवाणूशास्त्र अर्थात बॅक्टेरिओलॉजी या विषयाचं सखोल ज्ञान मिळालं.
या काळात एमिल व्हॉन बेअरिंग हा त्याचा साथीदार होता. त्या दोघांनी मिळून या जिवाणूंपासून स्रवणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या विषांमुळे धनुर्वाताची विशिष्ट लक्षणं आढळतात हे शोधून काढलं. १८८९ मध्ये कितासातोला धनुर्वाताच्या जिवाणूचं पहिलं कल्चर तयार करण्यात यश मिळालं. त्याने त्यासाठी जखमेतील पस ८०० डिग्री से. तापमानापर्यंत ४५ ते ६० मिनिटे तापवला आणि या रोगाचे सूक्ष्मजंतू शुद्ध स्वरूपात अलग केले. पुढच्याच वर्षी त्याने आणि बेअरिंगने अजून एक शोध लावला, तो म्हणजे धनुर्वाताच्या जिवाणूमुळे जे विष तयार होतं त्या विषाचा परिणाम झालेल्या प्राण्याच्या रक्तात प्रतिविष म्हणजेच अँटीटॉक्सिन तयार होतं. हे प्रतिविष असलेला रक्तरस (सिरम) दुसऱ्या प्राण्याच्या शरीरात सोडला तर त्या प्राण्याच्या शरीरात धनुर्वाताविरुद्धची प्रतिकारशक्ती विकसित होते. या पद्धतीला सिरम थेरपी असं नाव आहे.
विशिष्ट प्रतिपिंडांच्या (अँटीबॉडीज) मदतीने या जंतूमुळे निर्माण होणाऱ्या विषाचा परिणाम नाहीसा होतो असं लक्षात आल्यावर अँटीसिरम विकसित करण्यात आलं. त्यामुळे निर्माण होणारी इम्युनिटी काही आठवडे टिकत असे. १८९७ मध्ये एडमंड नोकार्ड नावाच्या संशोधकाने माणसांमध्ये पॅसिव्ह इम्युनायझेशन(इतर प्राण्यांच्या शरीरात आधीच तयार झालेल्या अँटीबॉडीज मानवी शरीरात सोडणं) केल्यास रोगापासून संरक्षण मिळतं हे दाखवून दिलं. याचा वापर करून पहिल्या महायुद्धादरम्यान अनेक जखमी सैनिकांना वाचवता आलं. १९२० च्या दशकात फॉर्मल्डीहाईड नावाचं रसायन आणि उष्णता यांच्या साहाय्याने धनुर्वाताच्या विषाचा प्रभाव कमी होतो हे सिद्ध झालं. त्यातून १९२४ मध्ये टिटॅनस टॉक्साईड म्हणजेच टीटी तयार केलं गेलं. अशा अनेक टप्प्यांमधून टिटॅनस व्हॅक्सिनची निर्मिती झाली.
सुरुवातीला या व्हॅक्सिनची चाचणी केल्यावर रक्तातील अँटिबॉडीजमध्ये वाढ झाल्याचं आढळून आलं. १९३८ मध्ये या व्हॅक्सिनला व्यावसायिक पातळीवर बाजारपेठेत आणलं गेलं. यानंतर दोन वर्षांत ते डांग्या-खोकला आणि घटसर्प यांना जोडलं गेलं. दुसऱ्या महायुद्धादरम्यान जखमी झालेल्या सैनिकांवर उपचार करण्यासाठी या व्हॅक्सिनचा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला.
आता डांग्या खोकला-घटसर्प- धनुर्वात यांवरील व्हॅक्सिन हे ट्रिपल व्हॅक्सिन (त्रिगुणी लस) म्हणून सर्वदूर ओळखलं जातं. लहान मुलांच्या इम्युनायझेशन शेड्युलमध्ये याचा समावेश आहे.
आज जपानमध्ये कितासातो शिबासाबुरो यांचं नाव वैद्यकीय क्षेत्रात आदराने घेतलं जातं. टोकिओमधील संसर्गजन्य रोगांवर संशोधन करणाऱ्या संस्थेलाही त्यांचंच नाव आहे. कोणे एके काळी दैवी आपत्ती मानून त्याला शरण गेलेल्या मानवाला आता त्यावर हमखास इलाज मिळाला आहे, याचं श्रेय या महान संशोधकाला आहे.
स्मिता जोगळेकर