नाट्यपंढरी, गणपती, कुस्ती, चालुक्यांची राजधानी, भडंग.. सांगली जिल्ह्याच्या आणखी काय विशेषता आहेत हे जाणून घ्या!!
सांगली जिल्हा हा खऱ्या अर्थाने विविधतेने नटलेला जिल्हा. या जिल्ह्याला नाट्यपंढरी म्हटले जाते. महाराष्ट्रात ज्यांना मानाचे स्थान आहे त्या नारायण श्रीपाद राजहंस म्हणजेच बालगंधर्व यांचा जन्म सांगलीचा. सीतास्वयंवर हे ऐतिहासिक ठरलेले नाटक याच ठिकाणी सादर करण्यात आले. या जिल्ह्यात वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना हा या जिल्ह्यात आशियातील सर्वात मोठा साखर कारखाना आहे. कधीकाळी एकाचवेळी चार मंत्रीपदे असल्याने राजकारणातही सांगलीचा दबदबा होता. नद्या, पशु, पक्षी, मंदिरे, असे सर्व काही ज्या सांगली जिल्ह्याचे वेगळेपण जपताना दिसतात, त्या सांगलीचे जिल्ह्याचे रूप आज आपण वाचणार आहात.सांगलीचा इतिहास तसा मोठा आहे. या जिल्ह्याने सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव आदी सत्तांचा काळ बघितला आहे. पुढे पेशवाईकाळ सुरू झाला तेव्हा सांगली स्वतंत्र संस्थान म्हणून नावारूपाला आहे. पटवर्धन घराणे इथले संस्थानिक झाले. आज कुंडल हे सांगली जिल्ह्यातलं गाव आहे, पण पूर्वी सांगलीच्या आसपासचा परिसर कुंडल म्हणून ओळखला जायचा. तेव्हाचे कुंडल हे चालुक्यांची राजधानी होती, यावरून सांगलीचे ऐतिहासिक महत्व लक्षात येऊ शकते. आताचे कुंडल ही क्रांतिसिंह नाना पाटील, जी. डी. लाड अशा स्वातंत्र्यसैनिकांची भूमी आहे. कुंडल गाव कुस्ती आणि कुस्तीगीरांसाठीही प्रसिद्ध आहे. शिराळा तालुक्यातल्या बिळाशी येथे सविनय कायदेभंग चळवळीवेळी मोठा सत्याग्रह झाला होता. वसंतरावदादा पाटील यांनीही इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. स्वातंत्र्य संग्रामातदेखील सांगलीचे योगदान मोठे होते हे इथे लक्षात येते.