computer

इतिहासाला कलाटणी देणाऱ्या हत्या - जगाच्या इतिहासाची सारी समीकरणेच बदलणारा राजपुत्राचा खून!!

"इतिहासाच्या पानांवर आपली भलीबुरी मोहोर उमटवणाऱ्या अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या हत्यांच्या कथा आम्ही घेऊन येत आहोत. त्यांनी घेतलेल्या विशिष्ट पावित्र्यामुळे त्यांना अनेक विरोधक निर्माण झाले आणि त्यातूनच त्यांची हत्या करण्यात आली. प्रवृत्तीला विरोध करा; व्यक्तीला नको असं कितीही सांगितलं तरी ते प्रत्यक्षात येत नाही हेच वेळोवेळी अधोरेखित होत राहिलं. या हत्यांनी कायकाय घडून आलं, जगाचा इतिहास कसा बदलवला आणि मुळात या हत्या घडल्याच का, या सगळ्यांचा ऊहापोह करणारी ही लेखमालिका!!"

"सोफी, सोफी डार्लिंग, मरू नकोस. निदान आपल्या मुलांसाठी तरी तुला जिवंत राहायला हवे.'' स्वतःच्या मानेत गोळ्या घुसलेल्या असताना राजपुत्र फर्डिनांड सोफीला - आपल्या बायकोला कळवळून म्हणत होता. पण सोफीकडून काहीही प्रतिसाद नव्हता. तो मिळणारही नव्हता. गॅव्ह्रिलो प्रिन्सिप नावाच्या तरुणाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर काही वेळातच सोफी आणि फर्डिनांड या दोघांचाही मृत्यू झाला. पण मुळात हे का आणि कसे घडले?

पहिले महायुद्ध सुरू झाले त्याचे निमित्त किंवा तात्कालिक कारण हे या ऑस्ट्रियन राजपुत्राचा - आर्चड्यूक फ्रान्झ फर्डिनांड याचा - खून असे सांगितले जाते. पण ही हत्या घडली त्याची पाळेमुळे बरीच खोल रुजलेली होती.

त्यासाठी आपल्याला १८७८ पर्यंत मागे जावे लागेल. युरोपात त्यावेळी तीव्र सत्तास्पर्धा होती. जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रिया ही तुलनेने तेव्हाची बलाढ्य राष्ट्रे जास्तीत जास्त भूप्रदेश आपल्या ताब्यात असावा म्हणून झटत होती. तशातच बोस्निया या प्रांतावर ऑस्ट्रियाचा अंमल १८७८ मध्ये प्रस्थापित झाला. पूर्वी ऑटोमन साम्राज्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या बोस्निया-हर्झगोव्हिनाच्या लोकसंख्येपैकी अंदाजे ४० टक्के सर्ब, ३० टक्के मुस्लिम आणि २० टक्के क्रोएट होते, उर्वरित लोक इतर जातींचे होते. या प्रांतावर डोळा असलेला अजून एक देश होता - सर्बिया. वास्तविक सर्बियात सुरुवातीला ऑबरेनोविक नावाच्या घराण्याची सत्ता होती, तेव्हा त्यांनी ऑस्ट्रियन-हंगेरियन साम्राज्याशी चांगले संबंध ठेवले होते. पण मे १९०३ मध्ये हे चित्र बदलले. सर्बियाच्या रॉयल आर्मीने राजघराण्याविरोधात बंड करून राजाराणीला ठार केले आणि ऑबरेनोविक घराण्याची सत्ता उलथवून टाकली. यानंतर तेथे नवीन आलेली राजवट ऑस्ट्रिया-हंगेरी साम्राज्याच्या विरोधात होती. आता सर्बियाला राज्यविस्ताराची स्वप्ने पडू लागली. त्यातून त्यांची शेजाऱ्यांशी भांडणे व्हायला लागली. ऑस्ट्रिया - हंगेरीच्या ताब्यात असलेल्या बोस्निया - हर्झेगोव्हिना या प्रदेशावर आपला ताबा मिळवायचे मनसुबे सर्बिया रचू लागला. त्यावेळी राष्ट्रवादी म्हणवणारे अनेक गट तेथे उदयाला आले.

यापैकीच एक गट म्हणजे यंग बोस्निया नावाचा स्थानिक क्रांतिकारी गट. गॅव्ह्रिलो प्रिन्सिप हा या गटाचा सदस्य होता. बोस्नियाला ऑस्ट्रियाच्या तावडीतून मुक्त करणे आणि स्लाव्ह लोकांचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणे हे या गटाचे मुख्य उद्दिष्ट होते. या सगळ्यांना ब्लॅक हॅन्ड नावाची गुप्त दहशतवादी संघटना मदत करत होती. ही संघटना प्रत्यक्षात सर्बियन लष्कराच्या जवळची होती.

त्यावेळी ऑस्ट्रियाचा राजपुत्र होता आर्चड्यूक फ्रान्स फर्डिनांड आणि त्याची बायको होती सोफी. वास्तविक ही सोफी काही राजघराण्यातील नव्हती. १९०० मध्ये तिच्या प्रेमात आकंठ बुडून फर्डिनांडने सोफीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्याला सगळ्यांचाच विरोध पत्करावा लागला. अगदी राजघराण्यातील नसली तरी सोफी एका खानदानी कुटुंबातून आलेली होती. पण हे लग्न राजेसाहेबांना मान्य नव्हते. त्यामुळे तिच्या आणि फर्डिनांडच्या मुलांना राजघराण्याचे वारसदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले. सोफीला इतरही अनेक क्षुल्लक गोष्टींमधून अपमान सहन करावा लागत असे. शाही मेजवानीच्या वेळी तिला महालात सगळ्यांच्या नंतरच प्रवेश मिळत असे, त्याहीवेळी तिच्याबरोबर कुणी सहायक नसे आणि जेवणाच्या टेबलावरदेखील तिच्या नवऱ्यापासून तिला दूर बसवले जाई. अगदी कुठल्याही सार्वजनिक समारंभातही आपल्या पतीच्या शेजारी बसण्याची मुभा तिला नव्हती. याला अपवाद एकच : जेव्हा तो लष्करी कर्तव्यावर असेल तेव्हा.

सोफीशी लग्न होऊन आणि स्वतःची मुले बेदखल होऊनदेखील फर्डिनांड स्वतः राजघराण्याचा वारस होता. शिवाय तो ऑस्ट्रियन लष्कराचा इन्स्पेक्टर जनरल होता. त्यामुळे त्याला राजाने बोस्निया हर्झेगोव्हिना येथे जून १९१४ च्या लष्करी सराव मालिकेला हजर राहण्यासाठी पाठवायचे ठरवले. फर्डिनांडचा तसा सर्बियावर रागच होता. त्याच्या लेखी ते लोक चोर, खुनी, गावंढळ, आणि डुकरासारखे घाणेरडे होते. मनातून मात्र तो सर्बियाला जरा घाबरून होता. या टापूमध्ये आधीच अशांत असलेली परिस्थिती आणखी बिकट होईल या भीतीने त्याने बोस्नियादी प्रांत आपल्या राज्याला जोडायला पूर्वी विरोधही केला होता. असे असूनही फर्डिनांडने राजाची विनंती मान्य केली. त्यानिमित्ताने का होईना, त्याला उघडउघड आपल्या बायकोशेजारी बसण्याची संधी मिळणार होती.

फर्डिनांड लष्करी सरावाला हजर राहणार हे सर्वत्र पसरले आणि इकडे यंग बोस्नियन्सने त्याची हत्या करण्याचा कट रचला. मे महिन्यात गॅव्ह्रिलो प्रिन्सिप आपल्या सहकाऱ्यांसह सर्बियाची राजधानी बेलग्राड येथे गेला. तिथे त्यांना ब्लॅक हँडच्या सदस्यांकडून सहा हातबॉम्ब, चार अर्ध-स्वयंचलित पिस्तूले आणि सायनाइडच्या सुसाईड कॅप्सूल्स मिळाल्या. बेलग्राड पार्कमध्ये त्यांनी त्यांच्या पिस्तुलांसह सराव केला. नंतर ते बोस्निया-हर्झेगोव्हिनाला परतले. सीमेवरून शस्त्रांची तस्करी करण्यासाठीही त्यांना ब्लॅक हॅन्डनेच मदत केली.

फर्डिनांड आणि सोफी बोस्निया-हर्झेगोव्हिना दौऱ्यावर जाण्यासाठी निघाले, तेव्हा त्यांना त्यांची ट्रिप रद्द करण्यासाठी अनेक इशारे मिळाले होते. त्यामुळे फर्डिनांडला संभाव्य धोक्याची जाणीव झाली होती. बोस्निया-हर्झेगोव्हिनाची राजधानी सारायेवोच्या जवळ एका स्पा टाऊनमध्ये त्यांनी दोन दिवसांच्या लष्करी सरावाला हजेरी लावली. सोफीने यादरम्यान काही शाळा आणि अनाथाश्रम यांना भेटी दिल्या. एका संध्याकाळी या जोडप्याने तेथील बाजारालाही भेट दिली. त्यावेळी रस्त्यावरील अनेक लोकांची गर्दी त्यांच्याकडे खेचली गेली. त्यांच्यात प्रिन्सिपदेखील होता. पण त्यावेळी लोकांचे त्यांच्याशी इतके सभ्यतेचे, सौहार्दपूर्ण वर्तन होते की कुणाला शंकाही आली नसती.

अशातच २८ जून हा दिवस उजाडला. त्या दिवशी फर्डिनांड आणि सोफी सारायेवोला जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढले. सारायेवोला आल्यानंतर हे जोडपे एका ओपन टॉप कारमध्ये बसले. त्यांच्यापुढे असलेल्या कारमध्ये सहा विशेष प्रशिक्षित अधिकाऱ्यांसाठीची जागा होती. परंतु त्यामध्ये केवळ चारच लोक होते. असेही संपूर्ण प्रवासात ऑस्ट्रो-हंगेरियन अधिकाऱ्यांनी त्यांच्या सुरक्षेपेक्षा त्यांच्या खाण्या-पिण्याकडेच अधिक लक्ष दिले होते.

दरम्यान, सात तरुण बोस्नियन्स त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत होते. त्यांची गाडी कोणत्या मार्गाने जाणार याची त्यांना कल्पना होती. जेव्हा आपले लक्ष्य नजरेच्या टप्प्यात आले आहे असे त्यांना वाटले तेव्हा त्यांच्यातील एकाने कारवर बॉम्ब फेकला, पण त्याचा नेम चुकला. त्यांच्या स्फोटात दोन सैन्यअधिकारी आणि काही लोक जखमी झाले. परंतु फर्डिनांड आणि सोफी बचावले.

एवढे होऊनही फर्डिनांड बधला नाही. त्याने आपले नियोजित कार्यक्रम तसेच पुढे सुरू ठेवायचे ठरवले. ते संपल्यानंतर त्याने रुग्णालयात जाऊन जखमी अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा आग्रह धरला. परत त्यांच्यावर कुणी हल्ला करू नये म्हणून सुरक्षेचे काही उपाय निश्चित करून त्यांच्या गाड्यांचा ताफा भरधाव निघाला. रुग्णालयापर्यंत सरळ जायचे असा प्लॅन करण्यात आला. पण कुठेतरी कम्युनिकेशनमध्ये गफलत झाली. एका वळणापाशी राजपुत्र फर्डिनांड असलेली गाडी उजवीकडे वळली. त्यावेळी त्यांच्या ताफ्यातील एका गाडीत असलेल्या गव्हर्नरने त्या ड्रायव्हरला हाक मारून गाडी थांबवायला आणि मागे वळायला सांगितले. त्यावेळी नेमका प्रिन्सिप गाडीजवळ होता. त्याचे लक्ष्य त्याच्या नजरेच्या टप्प्यात होते. कुणाला काही कळायच्या आत त्याने पिस्तुलाचा चाप ओढला. पिस्तुलातून सुटलेली एक गोळी सोफीच्या पोटात शिरली. दुसरी फर्डिनांडच्या मानेत घुसली. काही वेळातच दोघांचाही मृत्यू झाला.

यानंतर काही वेळात प्रिन्सिपला पकडले गेले. हळूहळू त्याचे इतर सहकारीही पोलिसांच्या ताब्यात आले. प्रिन्सिपची देहदंडाच्या शिक्षेतून सुटका झाली खरी, पण जास्त आयुष्य त्याच्या नशिबातच नसावे. कैदेत असतानाच वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी तो क्षयरोगाने मरण पावला.

मात्र या घटनेने ऑस्ट्रिया आणि सर्बिया यांचे संबंध पूर्ण बिघडले. इतके, की ऑस्ट्रियाने सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले. पुढे जर्मनी आणि रशिया यांनी अनुक्रमे ऑस्ट्रिया आणि सर्बिया यांना मदत देऊ केली. हळूहळू संपूर्ण युरोप या युद्धाच्या खाईत लोटला गेला आणि महाभयंकर असे युद्ध घडले.

ही हत्या जर झाली नसती तर परिस्थितीला कदाचित वेगळे वळण मिळाले असते. तुम्हाला काय वाटते?

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required