हा आहे खानदेशचा गली बॉय....या ८ वर्षांच्या मुलाने खानदेशला वेड लावलंय राव...
आजच्या काळात सोशल मीडिया अनेकांसाठी वरदान ठरलाय. आधी फक्त फेमस होणं ही मूठभर लोकांची मक्तेदारी होती. खेड्यापाड्यात आणि लहान शहरांमध्ये राहणाऱ्यांसाठी टीव्हीवर येणे, प्रसिद्ध होणे म्हणजे स्वप्न असायचे. आता तो जमाना गेला मंडळी!! आता तुमच्यात स्किल असेल तर घरबसल्या फेमस पण होता येते, आणि भरभक्कम कमाई पण करता येते. जसजसा सोशल मीडिया प्रभावी होत आहे, तसतसा टीव्हीचा प्रभाव कमी होत आहे. आधी रिऍलिटी शोजमध्ये मोठ्या शहरातली आणि पैसे बाळगून असणाऱ्यांची मुलंच दिसायची. पुढे जाऊन बॉलीवूडमध्ये करियर करण्याची शक्यता पण त्यांचीच असायची. आपल्या खेड्यापाड्यांतल्या लोकांमध्ये दाबून क्षमता भरलेली असते, पण त्यांना व्यासपीठच मिळत नाही ना राव!!
मागे गल्ली बॉय सिनेमा लोकांनी तुफान डोक्यावर घेतला. कारण पण तसंच होतं, धारावीच्या झोपडपट्टीत राहणारा २२ वर्षाचा मुराद यु ट्युबच्या मदतीने स्वतःच्या स्किलला वाट मोकळी करून देतो आणि भल्या भल्या रॅपर्सची कशी भंबेरी उडवतो. असा तो सिनेमा!! भारतातील लहान शहरात राहणाऱ्या, खेड्यात राहणाऱ्या तरुणांचा मुराद हा प्रतिनिधी आहे. मंडळी, क्षमता आहे पण संधी नाही म्हणण्याचे दिवस आता गेले. तुमच्यात स्किल असेल तर सोशल मीडिया नावाचे जगातील सर्वात मोठे व्यासपीठ तुमच्या हातात आहे. इंटरनेटमुळे विषमता मोडीत निघत आहे. त्याचे अनेक उदाहरणे आता पुढे यायला लागली आहेत.
सध्या खान्देशात असाच एक पठठ्या धुमाकुळ घालतोय. याचे वय माहित आहे? फक्त ८ वर्ष!!
धुळे जिल्ह्यातील शिरपुरचा हा छोटू चौथीत शिकतो. त्याचे नाव आहे कुणाल आल्हाटे!! वडील पॅरालिसिसमुळे काम करू शकत नाहीत आणि मोठा भाऊ बँडमध्ये काम करतो. शिरपूरमधल्या या सर्वसाधारण कुटूंबाचे दिवस तसे म्हटले तर बरे चालले होते. पण एके दिवशी कुणाल त्याच्या नातेवाईकांकडे नंदुरबार तालुक्यातल्या नगावला आला आणि त्याचे नशीब खुलले. खान्देश इतर अनेक गोष्टींबरोबरच अहिराणी लोकगीतांसाठी प्रसिध्द आहे. सध्या खान्देशात सचिन कुमावत यांचे 'सावन ना महिना मा तुला प्यार करना ये' तुफान हिट आहे. खान्देशात कुठलेच लग्न सावन ना महिना शिवाय पूर्ण होत नाही. कुणाल पण मित्रांसोबत सावन ना महिना म्हणत होता. गाणे म्हणत बसलेल्या कुणालचा विडिओ नगावच्या तरुणांनी सहज म्हणून शूट केला आणि युट्युबवर टाकला. बघता बघता कुणालचा विडिओ वायरल झाला. अवघा ८ वर्षाचा हा छोटू थेट खान्देशात सेलेब्रिटी झाला.
मंडळी, त्याच्या कुटुंबाने स्वप्नात विचार केला नसेल कि आपल्या या लहानग्या पठ्ठ्यामुळे आपल्याला टीव्हीवर येण्याची संधी मिळेल. कुणालची मुलाखत टीव्हीवर प्रसिद्ध झाली. कॉपीराईटचा विषय नसल्याने अनेक चॅनेल्सनी कुणालचा विडिओ त्यांच्या चॅनेल्सवर अपलोड केला. त्याचा गाण्याचा विडिओ वेगवेगळ्या चॅनल्सवर ५० हजार ते ७ लाखांच्या दरम्यान पाहिला गेला आहे. सर्व चॅनल्सचा हिशोब केला तर जवळपास २० लाख लोकांनी कुणालचा विडिओ बघितला आहे. त्याच्या खास शैलीत 'चुडी लयना ये' ला 'तोडी लयना ये' म्हणणे अनेकांना वेड लावत आहे. कुणालची परिस्थिती हलाखीची आहे हे समजल्यावर माजी मंत्री अमरीश पटेल यांनी त्यांच्या इंलिश स्कुलमध्ये कुणालाला मोफत प्रवेश दिला आहे. कुणाल आता जिथे जातो तिथे लोकं त्याच्याकडे कुतूहलाने बघतात. एवढासा छोटू पूर्ण खान्देशात ओळख मिळवत आहे म्हटल्यावर त्याच्या नातेवाईकांनासुद्धा त्याचा अभिमान वाटतो.
मंडळी, कुणाल अवघ्या वयाच्या ८ व्या वर्षी स्वतःच्या कलागुणामुळे प्रसिद्ध झाला. लहान मुलांच्या रिऍलिटी शोमध्ये जाणे कुणालसारख्या मुलांच्या स्वप्नात सुद्धा नसते. पण यु ट्युबमुळे सर्वसामान्यांसाठी जगाची दारे उघडी झाली आहेत.
कुणाल लहानपणापासून गाणे म्हणत आहे. पण हा मुलगा इतका फेमस होईल हा विचार कुणीच केला नव्हता. त्याच्या एका व्हिडिओने मात्र बंदे मे दम है सिद्ध केले. पुढे जाऊन त्याला गायनाच्या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होतील. सहज म्हटलेले गाणे एवढे प्रसिद्ध होत आहे म्हटल्यावर गायन शिकून त्यात करियर केल्यास त्याला त्यात चांगले करियर तो करू शकतो.
तुम्हांला कुणालचं गाणं कसं वाटलं? तुमच्याही आसपास असा कुणी लपलेला हिरा असेल तर त्याच्याबद्दल कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा.
लेखक : वैभवराजे पाटील.