हा अभिनेता दिसणार आहे कपिल देवच्या भूमिकेत !!
अजहर, धोनी–दी अनटोल्ड स्टोरी, सचिन–अ बिलियन ड्रीम्स या क्रिकेटर्सच्या आयुष्यावर आधारित चित्रपटांच्या रांगेत आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे. राव, १९८३ साली आपण पहिला वर्ल्डकप जिंकलो. तो दिवस अख्खा देश कधीच विसरणार नाही. आता याच ऐतिहासिक दिवसावर नवा सिनेमा येऊ घातला आहे. तूर्तास सिनेमाचं नाव “’८३” असल्याचं म्हटलं जात आहे.
आता तुमच्या मनात अनेक प्रश्न आले उगवले असतील....थोडं थांबा राव...आम्ही एका एका प्रश्नाचं उत्तरं देतो.
काय आहे चित्रपट ?
असं म्हटलं जातंय की जसा धोनीचा आणि सचिनचा होता तसा हा चित्रपट ‘चरित्रपट’ टाईप नसणार आहे. १९८३ सालच्या वर्ल्डकपचा दिवस आणि त्याच्या अवतीभवती फिरणारी कथा यात पाहायला मिळेल.
मुख्य भूमिकेत कोण ?
हा आहे महत्वाचा प्रश्न. १९८३ चा वर्ल्डकप म्हटलं की कपिल देव येणारच. या महत्वाच्या भूमिकेत कोण असेल ब्वा? तर चक्क ‘रणवीर सिंह’ दिसणार आहे भाऊ!! रणवीर सिंह सारखा एनर्जीने भरलेला अभिनेता कपिल देवच्या भूमिकेला न्याय देईल असं तूर्तास तरी वाटतंय आणि खुद्द कपिल देव यांनाच रणवीरवर विश्वास आहे.
चित्रपटाचा दिग्दर्शक कोण ?
एक था टायगर, बजरंगी भाईजान, ट्यूबलाईट सिनेमांचे दिग्दर्शक कबीर खान या चित्रपटचं दिग्दर्शन करणार आहे. हा सिनेमा फॅन्टम या अनुराग कश्यपच्या निर्मिती संस्थेअंतर्गत तयार केला जाईल.
कबीर खानचे आधीचे (ट्यूबलाईट सारखे) सिनेमे पाहता हा सिनेमा फिल्मी तर होणार नाही ना? अशी शंका येते . पण ‘फॅन्टम’ सारखी संस्था निर्मिती करणार म्हणजे कथेत अस्सलपणा असेल अशी आशा आपण बाळगू शकतो.
मंडळी, भारताला पहिला वर्ल्डकप मिळवून देणारी घटना आपल्या सर्वांसाठी स्पेशल आहेच, पण आता हा प्रसंग पडद्यावर कसा साकारला जातोय हा उत्सुकतेचा भाग असेल.