computer

ड्रग ॲडिक्ट ते सर्वात प्रसिद्ध सुपरहिरो आयर्नमॅन: रॉबर्ट डाऊनी ज्युनियरच्या भरारीची गोष्ट माहित आहे?

अमेरिकेने बरेच सुपरहिरोज जगभर लोकप्रिय केले. काल्पनिक तर खरेच, पण तरी या पात्रांनी फॅन्स आणि त्याचं प्रेम मिळवलंय. यातल्या कुठल्या सुपरहिरोने सर्वात जास्त प्रेम मिळवले असा प्रश्न जर लोकांना विचारला तर जास्त लोकांचे उत्तर कदाचित आयर्न मॅन असेल. मार्व्हलच्या सिनेमा सिरीजमधलं सर्वाधिक लोकप्रिय पात्र म्हणजे आयर्न मॅन!! या आयर्न मॅनची भूमिका साकारणारा रॉबर्ट डाऊनी ज्युनियर याचा आज वाढदिवस. जगभर आरडीजे नावाने प्रसिद्ध असलेला रॉबर्ट डाऊनी ज्युनियर आज सुपरस्टार असला तरी त्याचा प्रवास हा प्रचंड खडतर होता. ड्रग ऍडिक्ट, तुरुंग, लग्न मोडणे अशा सर्व संकटांतून बाहेर निघत आजचा सुपरस्टार आरडीजे तयार झाला आहे. आजच्या त्याच्या वाढदिवशी त्याची गोष्ट बोभाटा तुमच्यासाठी घेऊन आले आहे. 

या रॉबर्ट डाऊनी ज्युनियरची गोष्ट पण एखाद्या सिनेमासारखीच आहे. हा मुळात जन्माला आला तोच एका सिनेनिर्मात्याच्या घरी.  श्रीमंत घरी जन्माला आला तरी त्याच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. थोडक्यात तुलना करायची तरे त्याची कहाणी ही काहीशी संजय दत्तसोबत मिळतीजुळती म्हणावी लागेल. तर, अभिनय करिअरची सुरवात तर रॉबर्टने  फक्त ५ वर्षांचा असतानाच केली. त्याच्या वडिलांचाच सिनेमा होता: पाऊंड! वर्ष होतं १९७०. या सिनेमासोबत त्याने बालकलाकार म्हणून सुरुवात केली आणि मग त्याचं बालपण बालकलाकार म्हणून काम करण्यातच गेलं. पुढे १९८३च्या दरम्यान त्यानं थिएटरमध्ये एक नाटक केलं. तेही खूप चाललं नाही. सॅटरडे नाईट लाईव्ह या कार्यक्रमात काम करणारा तो सगळ्यात कमी वयाचा अभिनेता होता. पण या शोचा रिव्ह्यू लिहिताना एका मासिकानं त्याच्यावर सर्वात वाईट अभिनयाचा शेरा मारला. एकूणात, या रॉबर्टरावांचं करिअर काही चांगलं चाललं नव्हतं. या सगळ्या प्रकरणात तो मुख्य भूमिकेत असेल असा असा सिनेमा यायला १९८७साल उजाडलं.  तो होता जॉन ह्यू या निर्मात्याचा द पीक-अप आर्टिस्ट नावाचा सिनेमा!! 

पूर्वपत्नी डेबोरा फाल्कनरसोबत..

त्याचं करिअर असं कसंबसं चालत असतानाच त्याच्या आयुष्यात असलेल्या ड्रग्ज या एका गोष्टीने मात्र त्याचे आयुष्य एका भयंकर वळणावर आणून ठेवलं होतं. रॉबर्टचे वडील स्वत: ड्रग ॲडिक्ट होते. त्यात त्यांनी आपल्या शराबी सिनेमासारखं रॉबर्ट ज्युनिअरला तो ६ वर्षांचा असल्यापासून ड्रग्ज द्यायला सुरुवात केली होती. तो जसजसा मोठा होत गेला तसतसं अर्थातच त्याचं व्यसन वाढत गेलं. १९९० साली या ड्रग्ज प्रकरणी त्याला अटक करण्यात आली. त्यावेळी त्यानं न्यायाधीशांसमोर त्याला असलेले व्यसन स्पष्टपणे सांगितले होते. 

पुढे १९९६साली रॉबर्टला पुन्हा एकदा ड्रग्ज आणि बंदूक बाळगली म्हणून अटक करण्यात आली. यावेळी तो तब्बल तीन वर्षांसाठी तुरुंगात गेला. तिथून तो सुधारून येईल ही अपेक्षा देखील फोल ठरली. त्याला ड्रग्जच्या व्यसनातून मुक्त करण्यासाठी ट्रेनिंग द्यायला सुरुवात झाली. मात्र या ट्रेनिंगमुळेही त्याच्यात काही फरक झाला नाही. त्यानं गायिका आणि अभिनेत्री देबोरा फॉल्कनरसोबत लग्न केलं होतं. तेसुद्धा या सगळ्या प्रकरणात मोडलं. 

हाच सर्व प्रवास सुरू असताना २००४साली आरडीजेच्या आयुष्यात सुझान लेविन आली. ही एका सिनेमानिर्मिती कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट होती. तिच्या सोबतीत रॉबर्टला मात्र आपल्या चुकांची जाणीव होऊ लागली. २००५ साली त्यांनी लग्न केले. तसेच आरडीजेचे ड्रग्जचे व्यसन देखील सुटले. सुझान लेविन त्याच्या आयुष्यात यायच्या काहीच दिवस आधी तो तुरुंगातून सुटून आला होता. त्याचवर्षी त्याचा आयर्न मॅन हा सिनेमा रिलीज झाला. 

मार्व्हलच्या सिरीजमधलं आरडीजेचे आयर्न मॅन नावाचं पात्र तुफान हिट ठरलं. त्यानं पुढं शेरलॉक होम्स पडद्यावर रंगवला, तसेच इतर अनेक यशस्वी सिनेमे दिले. पण त्याने इतर काहीही न करता फक्त आयर्न मॅनचं पात्र केलं असतं तरी चाललं असतं एवढा तो अजरामर झाला आहे. आज त्याला आरडीजे म्हणून कमी आणि आयर्न मॅन किंवा टोनी स्टार्क म्हणून जास्त ओळखलं जातं. 

एका श्रीमंत बापाच्या घरात जन्माला येऊन, पुढे स्वतःच्या हाताने स्वतःच्या आयुष्याची वाताहत केलेला आणि सहा वेळा तुरुंगात जाऊन आलेला आरडीजे आयुष्यात पुनरागमन करतो आणि कोणी विचार देखील करू शकणार नाही या उंचीला जाऊन पोहचतो, यापेक्षा जास्त प्रेरक गोष्ट दुसरी कुठली असू शकते? आजच्या दिवशी आयर्नमॅन उर्फ टोनी स्टार्क उर्फ रॉबर्ट डाऊनी ज्युनियरला वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा!!

सबस्क्राईब करा

* indicates required