सेक्रेड गेम्स मधलं 'गोची' काय प्रकरण आहे ?
सेक्रेड गेम्सचा दुसरा भाग बघितल्यानंतर तुमच्या मनात अनेक अनुत्तरीत प्रश्न असतील. त्यापैकी एका प्रश्नाचं उत्तर देण्याचा आम्ही आज प्रयत्न करणार आहोत.
प्रश्न आहे, “हे ‘गोची’ काय प्रकरण होतं ?”
मंडळी, सेक्रेड गेम्समध्ये गुरुजीच्या भेटीपासून सुरु होणारं हे गोची प्रकरण कथेसाठी फार महत्वाचं आहे, पण गोची नेमकं काय आहे हेच आपल्याला शेवट पर्यंत समजत नाही.
तर, आधी गोची शब्दाचा अर्थ जाणून घेऊया. गोची हा ‘बम्बय्या’ भाषेतील शब्द आहे, ज्याचा अर्थ होतो ‘भानगड’. आता थोडं सेक्रेड गेम्स आठवा. हा शब्द पहिल्यांदा येतो तो गणेश गायतोंडेच्या तोंडी. गुरुजी त्याला लाल रंगाचं पेय देतात आणि तो म्हणतो “ये क्या गोची है ?” म्हणजे ही काय भानगड आहे.
या सीन नंतर त्या लाल पेयाला गोची नाव पडतं, पण गोची शब्द आणि ते पेय याचा काहीही संबंध नाही. खरं तर ‘गोची’बद्दल सेक्रेड गेम्समध्ये फारसे तपशील नाहीत. गोची हे ड्रग (अंमलीपदार्थ) आहे हे मात्र आपल्याला लगेच समजतं.
तर, खऱ्या आयुष्यात हे गोची प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया.
गोची हे काल्पनिक असलं तरी त्याच्याशी साधर्म्य असलेले ड्रग्ज अस्तित्वात आहेत. गोचीचा परिणाम काय होतो हे थोडं आठवून पाहा. गणेश गायतोंडे आणि सरताज या दोघांनाही गोची दिली जाते तेव्हा त्यांच्या विस्मृतीत गेलेल्या गोष्टी त्यांना पुन्हा आठवतात. त्यांच्या विचारांवर देखील परिणाम होतो. आनंद, दुःखं, शरम, अशा वेगवेगळ्या भावना प्रकट होतात.
या परिणामांचा विचार केला तर गोची ड्रग्जची कल्पना आयवास्का ड्रग्जवरून आलेली दिसते. आयवास्का हे दक्षिण अमेरिकेतील अमेझॉनच्या खोऱ्यातील पेय आहे. अमेझॉनच्या भागात मिळणाऱ्या वेगवेगळ्या वनस्पतींपासून ते तयार केलं जातं. यात दोन अशा वनस्पती असतात ज्यांच्यात सायकेडेलिक म्हणजे आभासी प्रतिमा, उत्तेजन निर्माण करणारे गुणधर्म असतात.
आयवास्काचा परिणाम हा माणसाप्रमाणे बदलतो, पण काही समान परिणाम हे दिसून येतात. आपण अनुभवलेले भूतकाळातील अनुभव पुन्हा एकदा आठवू लागतात आणि आपल्या रोजच्या विचारप्रणालीत बदल होतो. आयवास्कामुळे अत्यंत त्रासदायक घटनांबद्दलही माणूस विचार करू लागतो. ज्या गोष्टींना आपण विसरलेलो असतो, ज्या गोष्टी आपल्या मनात खोल दडपलेल्या असतात त्या बाहेर येऊ लागतात.
विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं, तर आयवास्का हा स्मृतींना साठवून ठेवणाऱ्या मेंदूच्या amygdale भागाला उत्तेजित करतो. हा भाग खासकरून क्लेशदायक आठवणींना साठवून ठेवत असतो.
या वर्णनावरून तुम्हाला गोची आणि आयवास्का यांच्यातील साधर्म्य लगेच लक्षात येईल.
आता गम्मत अशी आहे की आयवास्का ने व्यसन लागत नाही. सेक्रेड गेम्स मध्ये सरताजला गोचीचं व्यसन लागलेलं दाखवलं आहे. याचा एक अर्थ असा होतो की कथेत लेखकाने/दिग्दर्शकाने सोईप्रमाणे गोचीचे गुणधर्म बदललेत.
तर मंडळी, ही फक्त एक थियरी आहे. गोची म्हणजे एक काल्पनिक पेय आहे एवढंच त्यातील सत्य. खऱ्या आयुष्यात अशी गोची प्यायला जाऊ नका, नाही तर गोची होईल.