भारतीय चित्रपटात 'इंटरव्हल' का असतो राव ? कुठून झाली याची सुरुवात ??
मंडळी, भारतीय चित्रपटात कथा सांगण्याची एक वेगळी पद्धती आहे. आपल्याकडे सहजपणे हिरो हिरोईन सुरेल गाणी म्हणतात, एका झटक्यात स्वित्झर्लंडला जाऊन नाचूनही येतात, कितीही गोळ्या लागल्या तरी आपल्याकडचा हिरो मरतच नाही. भारतातल्या लोकांची चित्रपट बघण्याची अशी ही हटके पद्धत आहे. अशीच पद्धत चित्रपट दाखवण्याच्या बाबतीतही आहे. हॉलीवूड किंवा अन्य देशातल्या सिनेमांमध्ये इंटरव्हल नावाचा प्रकार नसतो, पण भारतात इंटरव्हल नसेल तर लोक भर चित्रपटातून उठून निघून जातील. आज आपण याच गोष्टीवर चर्चा करणार आहोत.
भारतातल्या चित्रपटात इंटरव्हल का असतो आणि इंटरव्हलचा भारतातल्या चित्रपटांवर काय परिणाम झाला आहे.
मंडळी, तुम्हाला माहित असेलच पूर्वी फिल्म्स रीळच्या सहाय्याने दाखवल्या जायच्या. एक रीळ दाखवून झाली की दुसरी रीळ लावण्यासाठी थोडा वेळ जायचाच. ह्या वेळेत लोकांना जो ‘ब्रेक’ मिळायचा त्यालाच इंटरव्हल म्हणतात. तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे पुढे हार्ड ड्राईव्हज आले. या हार्ड ड्राईव्हज मध्ये चित्रपट अपलोड केलेला असायचा. चित्रपट मार्केट मधून निघून गेल्यावर ही हार्ड ड्राईव्हज चित्रपट निर्मात्यांना परत केली जायची. आजच्या काळात तर सिनेमा थेट उपग्रहाद्वारे दाखवला जातो.
सांगण्याचं तात्पर्य एवढंच की रीळचा जमाना संपला तिथेच इंटरव्हलची गरज संपली. पण झालं असं की रीळ इतिहास जमा होईपर्यंत इंटरव्हल/इंटरमिशन संकल्पना भारतीय चित्रपटांचा अविभाज्य भाग बनली होती. त्यामुळे रीळ गेल्या पण इंटरव्हल कायम राहिला.
इंटरव्हलमुळे दोन गोष्टी झाल्या. एक तर भारतीय सिनेमांची लांबी वाढली आणि दुसरी बाब म्हणजे जगभर ज्या पद्धतीने चित्रपटाच्या कथा सांगितल्या जातात त्यापेक्षा अगदी वेगळ्या पद्धतीने भारतात कथा सांगितली जाऊ लागली.
इंटरव्हालमुळे भारतीय चित्रपटाच्या कथाच मुळात इंटरव्हलचा भाग गृहीत धरून लिहिल्या जातात. म्हणजे बघा, हॉलीवूडच्या फिल्म्स मध्ये सुरुवात, मध्य आणि शेवट या पद्धतीने कथा लिहिली जाते तर भारतीय चित्रपटात इंटरव्हलच्या अगोदर कथेची ओळख, पात्रांची समस्या (जो हॉलीवूड मध्ये चित्रपटाचा ‘मध्य’ असतो.) आणि कथेने गाठलेली उच्च पातळी असा प्रकार असतो तर इंटरव्हलच्या नंतर समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न, मिळालेलं उत्तर आणि शेवट असा भाग असतो.
इंटरव्हलच्या गरजेमुळे हॉलीवूडच्या फिल्म्स अर्ध्यावर थांबवल्या जातात. ‘धोबी घाट’ हा ‘इंटरव्हल’ नसलेला पहिला भारतीय चित्रपट होता. पण धोबी घाटच्या स्क्रीनिंगच्या वेळीही इंटरव्हलसाठी चित्रपट अर्ध्यातच थांबवण्यात आला होता.
तर मंडळी, अशा प्रकारे भारतीय सिनेमा हा आपल्यातच एक वेगळेपण घेऊन उभा राहिला आहे. इंटरव्हल हा प्रकार त्याचाच एक अविभाज्य भाग आहे.