computer

दारू पिणं, झोपणं...अशा प्रकारांनी लोक तेव्हा वजन कमी करायचे ? वाचा वेटलॉसचे १० अघोरी उपाय !!

वजन कमी करण्यासाठी लोक काय काय करतात राव. उपाशी राहतात, कमी जेवतात, अमुक खातात, तमुक खातात. काहीवेळा वजन खूप जास्त असेल तर ऑपरेशन देखील करतात. नुकतंच शोभाबाईंच्या टोमण्याला (पॉझिटिव्हली) मनावर घेऊन दौलतराम जोगावत या पोलिसाने तब्बल ६५ किलो वजन कमी केलं. अशी उदाहरणं अनेक मिळतील राव. हल्ली स्लिम ट्रीम राहण्याचं फॅडच आलंय...

मंडळी आजच्या काळात वजन कमी करण्याचे वैज्ञानिक उपाय आले असले तरी एक काळ असा होता जेव्हा असे अद्यावत उपाय नव्हते. मग त्याकाळात माणसांनी काय केलं असावं ? त्याकाळातील जुगाड बघून तुम्हाला धक्का बसेल राव.

चला आज पाहूयात वजन कमी करण्यासाठी इतिहासातील १० अघोरी पद्धती....

१. कापूस खाणे

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण असाही एक ट्रेंड आला होता जेव्हा लोक कापूस खाऊन वजन कमी करायचे. कापूस फळांच्या रसात बुडवून तो खाल्ला जायचा. त्यामुळे व्हायचं असं की, कापसाने पोट अपोआप भरल्यासारखं वाटायचं आणि फळांच्या रसांनी शरीरास पोषण सुद्धा मिळायचं. पुढे जाऊन ही पद्धत बंद पडली. कारण, असं केल्याने आतड्यांमध्ये अडथळा निर्माण व्हायचा.

२. सिगरेट ओढणे

वजन कमी करण्यासाठीची ही पद्धत सर्वात विचित्र असावी. १९२० च्या काळात वजन कमी करण्यासाठी एक खास सिगरेट बाजारात आली होती. या सिगरेटमुळे भूक कमी होते आणि त्यामुळे आपलं वजन आटोक्यात राहतं अशी एक समजूत होती. पण सिगरेटमुळे इतर आजार होतात त्याचं काय ?

३. दारू पिणे

वजन कमी करण्यासाठी दारू प्या असं जर कोणी सांगितलं तर त्याला ‘येड्यात’ काढलं जाईल. पण १९६० च्या काळात लोकांनी या गोष्टीवर विश्वास ठेवला. रॉबर्ट कॅमरून नामक इसमाने लोकांना दिवसभरातील प्रत्येक जेवणानंतर दारू प्यायचा सल्ला दिला होता. त्याप्रमाणे त्याने पत्रके सुद्धा वाटली होती. लोकांचं वजन कमी झालं असेल की नाही याबद्दल शंका आहे पण दारू विकणारा नक्कीच मालामाल झाला असेल.

४. झोपणे

झोपल्यामुळे वजन कमी होतं अशी समजूत ७० च्या दशकात अमेरिकेत पसरली होती. अमेरिकेतील लोकप्रिय गायक एल्व्हिस प्रेस्ली याने सुद्धा या थेरपीचा उपयोग केला होता. झोप येण्यासाठी औषधं घेण्यापर्यंत लोकांची मजल गेली होती.

५. व्हिनेगर खाणे

'लॉर्ड बेरन' नामक एका प्रसिद्ध कवीने वजन कमी करण्यासाठी आपल्या जेवणात व्हिनेगरचा वापर वाढवला होता. खरं तर प्रमाणाबाहेर व्हिनेगर घ्यायला त्याने सुरुवात केली होती. त्याच्या तर पाण्यात सुद्धा व्हिनेगर असायचं राव. त्याचा हा जुगाड बघून त्याच्या चाहत्यांनी सुद्धा ही पद्धत अवलंबली.

६. अन्न न गिळणे

Horace Fletcher नावाचा एक तज्ञ माणूस होता. त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही एक घास १०० वेळा चावला पाहिजे. त्याच्या याच सिद्धांतावर त्याची वजन कमी करण्याची पद्धत अवलंबून होती. ‘वजन कमी करायचं असेल तर तुम्ही अन्न चावत राहा पण गिळू नका.’ असा अजब शोध त्याने लावला होता. त्याच्या मते अन्न चावत राहिल्याने त्यातून निघणारं जरुरी पोषण शरीराला मिळतं आणि तेच अन्न गिळलं नाही तर तुमचं वजन आटोक्यात राहतं.

७. आर्सेनिक विष

एक काळ होता जेव्हा आर्सेनिक नावाचं विष हे वजन कमी करणाऱ्या औषधांमध्ये समाविष्ट असायचं. त्याचं कारण म्हणजे आर्सेनिकच्या प्रमाणातील वापरामुळे वजन कमी होतं अशी समजूत होती. महिलांनी अशा औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर केला. वजन कमी करण्याच्या बेतात काहींनी औषध प्रमाणाबाहेर घेतलं आणि त्यांना आपला जीव गमवावा लागला.

८. किडा गिळणे

तुम्ही अगदी म्हणजे अगदी बरोबर वाचलत राव. १९०० च्या सुरुवातीच्या काळात लोकांमध्ये एक नवीन फॅड आलं होतं. वजन कमी करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा किडा गिळला जायचा. या किड्यांना ‘टॅप वॅम्स’ म्हणत. हा किडा वजन कमी करण्यासाठी आपल्याला मदत करतो असा गैरसमज त्याकाळी पसरला होता. खरं तर टॅप वॅम्स आपल्या पोटातील अन्न आणि पोषक द्रव्य शोषून तर घेतो पण त्याच्यापासून आपल्याला वेगळे आजार उद्भवतात. म्हणजे करायला जायचो एक आणि व्हायचं भलतंच !!

९. साबणाने अंघोळ करणे

साबणाने तर सगळेच अंघोळ करतात, मग यात नवीन काय ? राव हा ‘खास’ साबण १९२० साली आला होता. साबण उत्पादक कंपनीचा असा दावा होता की हा साबण तुमचं वजन कमी करून तुम्हाला चिरतरुण बनवतो. पण हा साबण खरच वजन कमी करायचा का ? नाही राव, काही पण काय विचारताय !!

१०. अन्न कमी वाईन जास्त

इसवी सन १५५८ साली Luigi Cornaro या व्यक्तीने सांगितले होते की ‘अन्न कमी खा’. तो स्वतः दिवसभरात फक्त ४०० ग्राम अन्नावर जगायचा. नंतरच्या काळात तर त्याने दिवसातून फक्त एक अंड खायला सुरुवात केली. त्याने अन्न जरी कमी खायला सांगितलं असलं तरी त्याने वाईन भरपूर पिण्याचा सल्ला दिला होता. (आता लगेच वाईनशॉप शोधू नका राव.)

तर मंडळी, तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर असं काहीही करून नका. डॉक्टरांना भेटा आणि वजन कमी करा. सोप्प हाय की नाय ?

 

आणखी वाचा :

मानवी इतिहासातील १५ बिनडोक शोध !!

सबस्क्राईब करा

* indicates required