computer

वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्यदायी जीवनमानासाठी या घ्या १८ टीप्स!!

लठ्ठपणा हा बऱ्याच शारीरिक समस्यांचे कारण बनतो. वाढणाऱ्या वजनामुळे अनेकजण त्रस्त असतात. मग सुरू होते डाएटिंग! बरेच जण मग युट्यूब आणि गुगल करून आपापला डाएट ठरवतात. कुणी जीएम डाएट ठरवतं, कुणी दिवेकर तर कुणी दिक्षीत!! काही दिवसांत पुन्हा ये रे माझ्या मागल्या होतो आणि परत परिस्थिती जैसे थे! अशामुळे एक नकारात्मकता येते. पण आज आम्ही कोणताही डाएट सुचवत नाही आहोत, तर या छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्यामुळे तुमचे वजन नक्कीच कमी व्हायला मदत होईल आणि यामुळे शारीरिक समस्याही बऱ्याच प्रमाणात कमी होतील.

१. तंतूमय पदार्थांचे सेवन:-

तंतूमय पदार्थ म्हणजेच चोथा याला मॉडर्न न्यूट्रिशन मध्ये फायबर म्हटले जाते.
भाज्या, फळे, त्यांच्या कोशिंबिरी यासारखे तंतूमय पदार्थ खाणे आरोग्यासाठी गरजेचे आहे.फळांचा रस न पिता फळे खावीत, डाळी, मोड आलेली कडधान्ये खावीत, दोन्ही जेवणात सॅलड, कोशिंबिरी यापैकी काहीतरी असावे. आहारात तंतूमय पदार्थ वाढवल्याने भरपूर पाणी पिणेही चांगले .

२. साखरेवर नियंत्रण:-

स्थूलपणा कमी करण्यासाठी आणि हेल्दी राहण्यासाठी कमी साखर, कमी तेल, मीठ कमी खाण्याचा सल्ला दिला जातो पण काही लोकाना सतत गोड खाण्याची सवय असते याला शुगर क्रेविंग म्हणतात. अनेकदा आपण हेल्दी म्हणून एखाद ज्युस, कोल्ड्रिंक, एनर्जी ड्रिंक यासारखे पेय घेतो पण त्यामधे साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यावेळी नारळपाणी, एखाद फळ किंवा घरच्या घरी तयार केलेले एखाद सरबत पिणे केव्हाही चांगलं. साखरे ऐवजी गूळ खाण्याला महत्त्व द्यावे. 

३. चालणे हा उत्तम व्यायाम:

चालणे हा एक उत्तम व्यायाम प्रकार आहे. 40 ते 45 मिनिटे चालल्यावर आपल्या जास्तीत जास्त कॅलरीज जळतात. चालण्याबरोबरच दोरी उड्या मारणे, छोटे छोटे व्यायाम प्रकार करणे,योगासने करूनसुद्धा करून आपण आपल्या कॅलरीज कमी करू शकतो.

४. प्रोटिन्सयुक्त नाश्ता:-

सकाळच्या नाश्त्या मध्ये एखाद दुसरे उकडलेले अंडे खाल्ले तर भूक लागत नाही. पण आतील पिवळा बलक खाणे टाळावे. अंडे हे प्रोटिन्सचे स्त्रोत आहे. ओट्स इडली, दूध घालून लापशी, बदाम अक्रोड आणि काळे मनूके हे ही सकाळच्या नाश्त्यासाठी घेऊ शकतो. सकाळचा नाश्ता हा परिपूर्ण असावा म्हणजेच संपूर्ण दिवस ही ऊर्जा टिकवून ठेवता येते. 

५. कॅलरीज सोबत वजन ही घटवा:-
प्रथिनं, चरबी आणि कर्बोदकं या तीन पोषक घटकांद्वारे शरीराला कॅलरी मिळतात. पाण्यात कॅलरीचं प्रमाण शून्य असलं, तरी त्याचा असा अर्थ अजिबात होत नाही, की पाणी तुमच्या शरीराला ऊर्जा देत नाही. याउलट पाणी हे शरीरात गेलेल्या अन्नामधून जी ऊर्जा तयार होते, ती सर्व पेशींपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम करतं. पाण्यात कॅलरी नसल्या, तरी पाणी हे आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवापर्यंत ऊर्जा पोहोचवण्याचं काम करतं. एवढंच नाही, तर पाणी हे कॅलरींचं विघटन करण्यासाठी आणि नष्ट करण्यातही खूप महत्त्वाची भूमिका बजावतं. म्हणून वजन कमी करत असणाऱ्या व्यक्तींना भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

६. खाण्यापूर्वी थोडा विचार करा

 खाण्यापूर्वी आपण हे का खातो आहे हे स्वत:ला विचारा. माइंडफुल इंटिंग साठी हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे.खाताना लॅपटॉप, टीव्ही बंद ठेवा. मोबाइल बाजूला ठेवा. यामुळे खाण्यावर लक्ष केंद्रित होण्यास मदत होते.सावकाश जेवावे . भराभर जेवल्यानं जेवण पटकन संपत असलं तरी यामूळे कमी वेळात जास्त खाल्लं जाते. 

७. डाएट फॅडच्या मागे लागू नका:-


वजन कमी करण्यासाठी अमूक एक पोषक तत्त्वच महत्त्वाचं असंही अनेक डाएट फॅड सांगतात. पण शरीराला वेगवेगळ्या पोषक घटकांची आवश्यकता असते. जसे की कर्बोदकं, प्रोटिन्स, फायबर आणि फॅटस हे घटक शरीरासाठी सारखेच महत्त्वाचे असतात. म्हणून आपण जे कोणते डाएट करत असाल त्यात सतत बदल करू नका.

८. कच्च्या पदार्थांचे सेवन:-

 काही पदार्थ असे असतात की जे आपण डाएट मध्ये घेत नाही. असे काही पदार्थ जे आपण  शिजवून न खाता ते कच्चेच खाणे फायद्याचे असते. जसे की ड्राय फ्रूटस, फळ, भोपळी मिरची, मोड आलेले मूग. यामधे भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात.

९. स्नॅक्स स्मार्ट:-

 वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करताना बटाटे चिप्स आणि जंक फूड खाणे बंद केले पाहिजे. पण मखाणे भाजून खाऊ शकतो. ड्राय फ्रूट भाजून, मटार हे ही भाजून घेऊ शकतो. भाजलेले चणे शेंगदाणा हे ही खूप चांगले पर्याय आहेत. 

१०. कमी स्टार्चयुक्त आणि कार्ब खाणे:-


वजन कमी करण्यासाठी साखर, स्टार्च/ कार्बोहायड्रेट कमी खाणे. कमी कॅलरी आहारामुळे वजन कमी होऊ शकते आणि जास्त काळ टिकवणे सोपे होते. कार्ब कमी करण्याबरोबर आपण भाज्या खाऊन आपली भूक शमवू शकतो.

११. चुकीची पद्धत अवलंबू नका:-

डाएटिंग न करताच लाइफस्टाइलमध्ये छोटे-छोटे बदल केल्यासही वजन कमी होऊ शकते. म्हणजेच मन दुसरीकडे कुठेतरी गुंतवून ठेवल्यास आपण खाण्याचा विचार दूर ठेऊ शकतो. जसे की वाचन करणे, इतर खेळांना प्राधान्य देणे. फिरायला किंवा चालायला जाणे इ. पण त्यासाठी चुकीच्या पद्धतीने खाऊ नका.

१२. स्वतः साठी वेळ काढा:-

 स्वतः साठी वेळ काढणे हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगले आहे. वजन कमी करण्यासाठी स्वतःला वेळ द्या. छंद जोपासा, आवडते काम करा. म्हणजेच स्वतःवर प्रेम करायला शिका. 

१३. लवकर निजे लवकर उठे:-

हा मंत्र आचरणात आणणे गरजेचा आहे. जसा अभ्यास गरजेचा आहे तसेच लवकर झोपले तरच आपण पूर्ण झोप घेऊन लवकर उठू शकतो. त्याचप्रमाणे आपले रोजची कामे वेळेमध्ये पूर्ण केल्यामुळे आपल्याला स्वतःला वेळ देऊ शकतो.

१४. रेस्टॉरंटमध्ये निवडक पदार्थ निवडा:-

आपण रेस्टॉरंटमध्ये  जातो आणि चटकदार पदार्थ खाऊन जिभेचे लाड पुरवतो. तसेच मॉलमध्येही अशीच अरबट-चरबट खरेदी करतो. हे टाळा आणि  अशाच गोष्टी खरेदी करा ज्याने तुमच्या शरीराला ऊर्जा मिळेल.

१५. लक्ष्य ठरवा:-

सर्वप्रथम आपण डाएट कशासाठी करतोय हे एकदा मनाला समजावा आणि लक्ष्य ठरवा. एकदा मनावर घेतले की डाएट फॉलो करू शकतो. त्यामुळेच तुमचे वजन आटोक्यात राहण्याचा प्रयत्न शरीर करते


 

१६.रोजची दिनचर्या ठरवा:

नेहमी चांगल्या दिनचर्येचे पालन केले पाहिजे. सकाळची सुरुवात योग सत्राने झाली पाहिजे. यानंतर तुमची इच्छा असल्यास तुम्ही स्विमिंग, वॉकिंग यासारख्या इतर फिटनेस अ‍ॅक्टिव्हिटी करू शकता. हे आपले संपूर्ण आरोग्य निरोगी व सुदृढ राखण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे. एका दिवसात कमीत कमी 30 मिनिटे तरी फिटनेस अ‍ॅक्टिव्हिटी केल्या पाहिजेत. यामुळे आपण खूप लवकर वजन कमी करू शकतो. व्यायाम करण्याचा प्रयत्न करा आणि यासाठी 60 मिनिटे जरूर द्या.

 
१७. प्रोत्साहन मिळवा:-

वजन कमी करण्यासाठी सुरुवात करताना आपल्या जवळच्या माणसांना सांगा. ते तुम्हाला नक्कीच प्रोत्साहन देतील. त्याच्या पाठबळावर तुम्ही पुढे जाऊ शकता. तुमचे जवळचे मित्र तुम्हाला यात मदत करू शकतात. जर असे कुणीच नसेल तर असे ऑनलाईन ग्रुप्स आहेत, जे तुम्हाला सकारात्मक राहण्यास मदत करतील.


१८. स्वतःला प्रेरित करा:-

स्वतःला सतत प्रेरित करा. स्वयंप्रेरणा खूप गरजेची असते.

शीतल दरंदळे

 

सबस्क्राईब करा

* indicates required