या सुंदर धगधगत्या निळ्या डोळ्यांमागे लपला आहे एक जनुकिय आजार !
बाहुलीच्या गाण्यात असलेले निळे डोळे किंवा परिकथेतल्या परीचे निळे डोळे आपल्याला मिळाले असते तर कित्ती छान झालं असतं असं लहानपणी सगळ्यांनाच वाटत असतं, आता वरचा फोटो बघा , सुंदर निळे डोळे असलेला हा मुलगा किती घाबरलेला दिसतो आहे. काय असेल या धास्तीचं भयाचं कारण,असा प्रश्न मनात उभा राहतोच.
कारण असं आहे की या मुलाचे डोळे एका आजारामुळे निळे झाले आहेत. या आजाराचं नाव आहे वाडेनबर्ग सिंड्रोम- हा एक जनुकीय आजाराचा प्रकार आहे.या जनुकीय बदलामुळे डोळ्यांचा रंग तर बदलतोच पण सोबत बहिरेपणाही येतो. त्याखेरीज त्वचेचा रंग बदलतो.
काहीजणांच्या डोळ्यांना वेगवेगळे रंग असतात म्हणजे एक डोळा निळा तर दुसरा तपकिरी किंवा काळा !
पेट्रस वाडेनबर्ग नावाच्या डोळ्यांच्या डॉक्टरने १९४७ साली या आजाराच्या लक्षणांची आणि कारणाची मिमांसा केली म्हणून हा आजार वाडेनबर्ग सिंड्रोम नावाने ओळखला जातो. तसा हा आजार संख्येने फारच कमी लोकांना होतो.१/४०००० असे त्याचे प्रमाण दिसून येते पण मध्यंतरी इंडोनेशिया जवळच्या बुटोन बेटावर एका आदिवासी जमातीच्या अनेकांना ही व्याधी जडल्याचे लक्षात आल्यानंतर थोडी खळबळ माजली होती.एकाच जमातीत मोठ्या प्रमाणात हा जनुकिय बदल का झाला असेल याचा उलगडा झालेला नाही.काही वर्षांपूर्वी कोर्शनाय पारीबासू नावाचा एक संशोधक या बेटावर संशोधनासाठी फिरत असताना त्याच्या नजरेस हे आदिवासी पडले आणि त्याने अनेक फोटो आंतरजालावर प्रकाशित केले. त्याफोटोंचे काही नमुने आज बघूया.