'टायटॅनिक'बद्दल या १० गोष्टी माहित आहेत का ??
मंडळी टायटॅनिक सिनेमा तुम्ही पाहिलाच असेल. भव्य टायटॅनिक जहाज आणि त्यावर घडणारी जॅक आणि रोझ यांची प्रेमकहाणी डोळे विस्फारायला लावते. लिनोनार्दो डिकॅप्रीओ आणि केट विंसलेट यांनी आपापल्या भूमिकांचे सोने केले आहे. ज्या जहाजावर ही कहाणी घडते ते टायटॅनिक जहाज १४ एप्रिल १९१२ रोजी बुडाले. हे जहाज कधीच बुडू शकत नाही असा त्याच्या निर्मात्यांचा दावा होता. पण नियतीच्या मनात काय असते ते कुणाला कळणार? एका हिमनगाला धडकून टायटॅनिक समुद्राच्या तळाशी गेले हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आज जवळपास १००हून अधिक वर्षानंतरही टायटॅनिकबाबत लोकांच्या मनात उत्सुकता आहे. आजही अनेकजण समुद्राच्या तळाशी जाऊन टायटॅनिकचे अवशेष पाहून येतात. आजच्या लेखात आम्ही सांगणार आहोत या फार कमी लोकांना माहीत असलेली या जहाजाबद्दलची काही विशेष माहिती.. चला तर मग जाणून घेऊया…
1. टायटॅनिक हे त्या काळचे सर्वात मोठे प्रवासी वाहतूक करणारे जहाज होते. त्याची लांबी तब्बल २८९ मीटर्स इतकी होती. आणखी एक विशेष बाब म्हणजे, त्या काळातली एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणारी ती जगातली सर्वात मोठी मानवनिर्मित वस्तू होती.
2. टायटॅनिकची बांधणी करण्यासाठी तीन हजार लोक मेहनत करत होते. याला पूर्ण करण्यासाठी तीन वर्षे लागली.
3. अधिकृत आकडेवारी नुसार टायटॅनिक वर २,२२५ लोक प्रवास करत होते. त्यात १३१७ हे प्रवासी होते तर ९०८ लोक जहाजाचे कर्मचारी होते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे एवढ्या लोकांपैकी फक्त ७१३ जणांचे जीव वाचवण्यात यश मिळाले.
4. जहाजात १५००० बिअरच्या आणि १०००० वाईनच्या बाटल्या प्रवाशांसाठी राखीव होत्या. पहिल्या वर्गाच्या प्रवाशांना जेवणात ११ कोर्सचा मेन्यू दिला जायचा. या मेन्यूमध्ये मासे, मटण, वेगवेगळे गोड पदार्थ, चीज, इत्यादी खाद्यपदार्थ समाविष्ट असायचे.
5. टायटॅनिकच्या पहिल्या वर्गाच्या तिकिटाची किंमत आजच्या हिशोबाने पाहिली तर ती दरडोई ९०,००० युरो इतकी महाग होती.
6. या जहाजाच्या दुर्दैवी अपघातामधून जे लोक वाचले त्यांनी सांगितलेल्या कहाण्या मनाला चटका लावतात. एक बिझनेसमन प्रवासी बेंजामिन यांनी सांगितल्यानुसार जेव्हा प्रवाशांना समजलं की जहाज बुडणार आहे, तेव्हा त्यांनी मरणाला सामोरे जाण्याची तयारी केली. त्यासाठी त्यांनी ठेवणीतले चांगले कपडे परिधान केले. काही जणांनी मरण्यापूर्वी गाणी गायली. कुणी सिगारेट तर कुणी मद्यपान करून मरणाचे स्वागत केले.
7. सिनेमात दाखवल्याप्रमाणे टायटॅनिकवर खरोखरच काही प्रेमकहाण्या घडल्या आहेत. त्यात इसीडॉर आणि त्याची पत्नी इडा यांची कहाणी प्रसिद्ध आहे. जेव्हा बोट बुडू लागली तेव्हा बायका आणि मुलांना सर्वप्रथम लाईफबोटमध्ये जाण्याची संधी दिली गेली. मात्र इव्हा आपल्या पतीला सोडून जाण्यास तयार झाली नाही. सोबत जगलो, आता सोबतच मरू असे तिचे म्हणणे होते. तिच्या हट्टामुळे इसिडॉरला लाईफबोटमध्ये आमंत्रित करण्यात आले परंतु त्याने इतर महिला-बालकांना संधी मिळावी म्हणून ती ऑफर नाकारली. शेवटी त्या पतीपत्नीने एकत्रच मरण पत्करले.
8. टायटॅनिकवरून वाचलेली शेवटची जिवंत व्यक्ती होती मिलविना डीन नावाची बाई. टायटॅनिक बुडाले तेव्हा तिचे वय फक्त २महिन्याचे होते. मिलविनाचा मृत्यू वयाच्या ९७ व्या वर्षी २००९ मध्ये झाला.
9. आज टायटॅनिक जहाज दोन तुकड्यांच्या रुपात समुद्राच्या तळाशी चिरविश्रांती घेत आहे. ही जागा न्यू फाउंडलँडच्या किनाऱ्यापासून ३७० मैल दूर आहे. समुद्राच्या पृष्ठभागाखाली अडीच मैल खोलवर टायटॅनिकचे अवशेष आहेत. या खोल जागी प्रकाश पोहोचू शकत नाही आणि कुठलाही प्राणी जिवंत राहू शकत नाही.
10. या घटनेवर टायटॅनिक सिनेमा बनवला गेला. या सिनेमाचे एकूण बजेट हे खुद्द टायटॅनिक जहाजापेक्षा कितीतरी जास्त होते. टायटॅनिक जहाज बनवायला ७५ लाख डॉलर्स खर्च झाले होते तर सिनेमा बनवायला २० करोड डॉलर्स लागले. कमाईच्या बाबतीत टायटॅनिक सिनेमा जगात पहिल्या स्थानावर होता. नंतर आलेल्या ‘अवतार’ सिनेमाने याचे रेकॉर्ड तोडले.
लेखक : अनुप कुलकर्णी.
आणखी वाचा :
शनिवार स्पेशल : टायटॅनिक बरोबर जलसमाधी मिळालेल्या १० अमुल्य गोष्टी !!