computer

बदलत्या भारताचे ११ खरे हिरो...यातील किती जणांची कामे तुम्हाला माहित आहेत?

एक अतिप्राचीन संस्कृती असलेला देश आणि जगाला बुद्ध, विवेकानंद, गांधी यांचे तत्वज्ञान देणारा देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. कष्ट करण्याची तयारी, प्रामाणिकपणा आणि चिकाटी, अशा गुणांचे दर्शन भारतीय जनमानसातून होत असते. आजच्या काळातही या गुणांना वेगळ्या प्रकारे उजाळा देऊन भारताचे नाव जागतिक पटलावर उज्वल करणारे भारतीय आहेत. ज्यांनी आपल्या त्याग, करुणा आणि कष्टातून भारतीयत्वाचा प्राण जपला आहे. आजच्या या लेखातून आपण अशाच काही भारतीयांची माहिती घेणार आहोत ज्यांनी आपल्या कामातून सर्वांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे.

१. सोनू सूद –

कोव्हीड-१९ मुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्याची वेळ आली आणि गाव-घर सोडून दूरवर शहरात कामाला राहिलेल्या कामगारांना आपला गाव, आपले घर आणि आपली माणसं खुणावू लागली. हाताला काम असताना शहर आसरा देऊ शकते पण काम नसताना आपण शहरासाठी ओझं ठरू शकतो या भावनेनी या कामगारांना अचानक पोरकं वाटू लागलं. पायी चालत जाणाऱ्या या कामगारांची सोनू सूद या व्हिलनने पहिल्यांदा दखल घेतली आणि गावी पोहोचवण्याची जबाबदारी देखील. सोनू सूदला आपण चित्रपटातून व्हिलनच्या रुपात पहिले असले तरी त्याच्यातील खरी हिरोगिरी आपल्याला या काळात पाहायला मिळाली. हजारो लोकांना त्याने त्यांच्या घरापर्यंत सुखरूप पोहोचवले. त्यानंतरही सोनूने अनेक असहाय्य, गरीब, गरजू लोकांना लागेल ती मदत केली. गरजू लोकांना मदत करणे हाच जणू त्याच्या आयुष्याचा उद्देश आहे. म्हणूनच समाजातील बहुसंख्य लोक त्याच्याकडे रिअल हिरो म्हणून पाहतात.

२. जादव पायेंग

आसामच्या या सुपुत्राने गेली दोन दशकाहून अधिक काळ स्वतः खपून ओसाड जमिनींना हिरवाई दान केली आहे. वयाच्या सोळाव्या वर्षापासून जादव वृक्षारोपण करताहेत. नुसतेच झाडे लावत नाहीत तर त्यांची पोटच्या पोराहूनही अधिक काळजी घेतात. वृक्षारोपण करणे, वृक्ष जगवणे आणि त्यांना हवे ते पुरवणे हाच त्यांच्या आयुष्याचा उद्देश आहे. आपल्या या झपाटलेपणातून त्यांनी अनेक जंगले वसवली आहेत. ही जंगले म्हणजे भारतातील प्राण्यांसाठी हक्काचा अधिवास बनली आहेत. भारतीय गेंडे, हरीण, माकडे, शेकडो पक्षी या ठिकाणी गुण्यागोविंदाने नांदतात. या दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांना त्यांचा हक्काचा अधिवास मिळवून देणाऱ्या जादव पायेंग हे खरे पर्यावरणतज्ञ आहेत. संपूर्ण भारताला सुजलाम सुफलाम करण्याच्या उद्देशाने त्यांनी आजही आपले काम सुरूच ठेवले आहे.

३. मैथिली राज

मिथिली राज भारताच्या महिला क्रिकेट संघाची कप्तान आहे. क्रिकेट हा खासकरून पुरुषांचा खेळ म्हणून ओळखला जातो. अशा खेळात आणि भारतासारख्या पुरुषप्रधान देशात मैथिलीने आपल्या कर्तृत्वाने हे दाखवून दिले की महिलांनी ठरवले तर त्या कुठेही मुसंडी मारू शकतात आणि स्वतःचे क्षमता, कतृत्व सिद्ध करू शकतात. तिच्या जगण्याचा एकच उद्देश आहे, आपल्या मनाचे खरे करणे. म्हणून तर पुरुषी समजल्या जाणाऱ्या खेळात तिने अनेक इतिहास रचले आहेत. त्यातही मुलीनी करिअरसाठी कुठले क्षेत्र निवडले पाहिजे याचे काही ठोकताळे ठरलेले आहेत. त्यापलीकडे विचार करायचा म्हंटले की संघर्ष अटळच. पण, मिथिलीने या सगळ्या समाजांना धक्का देत आपला ठसा उमटवला.

४. आनंद आहुजा –

आनंद अहुजा हे भारतीय उद्योग जगातील एक चमकदार नाव आहे. आनंद अहुजा यांनी भाने सारखा एक देशी ब्रँड सुरु केला. भारतीय वस्त्रोद्योग विश्वात या स्वतःच्या ब्रांड सोबत त्यांनी चांगलाच जम बसवला आहे. वेज-नॉनव्हेज सारख्या स्निकर ब्रँडची सुरुवातही त्यांनीच केली. भारतात स्निकर संस्कृती रुजण्याआधी त्यांनी केलेला हा प्रयोग यशस्वी ठरला. त्यांनी सुरु केलेल्या या दोन्ही व्यवसायांची खासियत म्हणजे आधुनिकता आणि पारंपारिकता यांचा मध्य साधण्याचा प्रयत्न. आहुजा यांच्याकडे भारतातील तरुण व्यावसायिकांचे एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून पाहिले जाते.

५. अंजली लामा –

इंडियन फॅशन इंडस्ट्रीत आपले नाव करणारी पहिली तृतीयपंथी. लॅक्मेच्या फॅशन शो मध्ये तिने पहिल्यांदा मॉडेलिंग केले. लिंगभाव समानतेच्या दिशेने हे एक चांगले आणि सकारात्मक पाऊल म्हणावे लागेल. ज्या लोकांना समाज आजही तुच्छतेने पाहतो, त्यातील एका व्यक्तीने मिळवलेले हे यश स्पृहणीय आहे. यामुळे तृतीयपंथी व्यक्तींकडे पाहण्याच्या दृष्टीतही फरक पडेल अशी अशा आहे. अंजली लामाचे हे यश एका नव्या पर्वाचे संकेत देत आहे. फॅशन शो सारख्या क्षेत्रात सर्वमावेशक दृष्टीकोन स्वीकारला जात असेल तर निश्चितच एक नवी नांदी आहे.

६. शिरीष आपटे

महाराष्ट्रातील दुष्काळ हा दिवसेंदिवस चिंतेचा विषय होत आहे. अमीर खानचा वॉटर कप महाराष्ट्र भर गाजत आहे. पण, शिरीष आपटे महाराष्ट्रातील मृत झरे, ओढे, आणि नद्यांना जीवनदान देण्याचे काम करत आहेत. विदर्भातील पाणी टंचाईचा प्रश्न तीव्र होत असताना शिरीष आपटे यांनी तेथील वर्षानुवर्षे आटलेल्या मालगुजरी तळ्यांना पुन्हा पुनर्जीवित केले. अलीकडच्या कित्येक वर्षात त्यांनी सातत्याने प्रयत्न करून असे २१ तळी बांधली आहेत. पाणी प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची चाललेली धडपड निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.

७. डॉ. म्हापूसकर

स्वच्छ भारत अभियानाचा आज सगळीकडे गाजावाजा होत आहे. भारतातील खेड्यापाड्यांचा विचार केला तर आजही या गावात कचरा व्यवस्थापन हा शब्दच परिचित नाही. ठिकठिकाणी आढळणारे उकिरडे आणि त्यातून ओसंडणारा कचरा, त्यात प्लास्टिकची भर यामुळे भारतातील निसर्ग संपन्न गावे एकमदच ओंगळवाणी वाटत होती. अशा अवस्थेत म्हापूसकरांनी गावकऱ्यांमध्ये स्वच्छतेचे महत्व रुजवले, आपले गाव स्वच्छ सुंदर ठेवणे आपली जबाबदारी कशी आहे हे पटवून दिले. आज अनेक गावांचे रूप त्यांच्या या अथक प्रयत्नामुळे पालटत आहे.

८. इशिता मालवीय

इशिता मालवीय ही भारतातील पहिली महिला सर्फर आहे. सर्फबोर्डच्या सहाय्याने लाटांवर स्वार होणे हे तिचे काम. मुळची कर्नाटकातील असलेली इशिता यासाठीचे प्रोफेशनल ट्रेनिंग कोर्स देखील देते. अनेक शाळांना भेटी देऊन मुलांमध्ये याविषयी अधिक माहिती पोहोचवण्याचे काम ती करते आहे. यासाठी तिने शाका सर्फिंग क्लब सुरु केला आहे. सर्फिंगची आवड असणाऱ्या अनेक व्यक्ती स्वतःहून या क्लबच्या सदस्य बनत आहेत.

९. बीना राव

देश बदलण्याच्या गप्पा तर सगळेच मारतात, पण त्यासाठी काम किती जण करतात? बिना राव ही अशी व्यक्ती आहे जी नुसत्या गप्पा मारून देश बदलत नाही यावर विश्वास ठेवते आणि त्यासाठी प्रत्यक्ष काम करते. शिक्षण हे कुठल्याही काळात परिवर्तनाचे महत्वाचे साधन आहे. म्हणूनच बिना झोपडपट्टीतील मुलांना विनामुल्य चांगले शिक्षण देण्यासाठी झटते आहे. एकट्या मुंबईतच तिच्या या कामामुळे ५००० विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलून गेले आहे. आज तिच्या सोबत आणखी ४० स्वयंसेवक काम करत आहेत आणि शिक्षणाची गंगा या झोपडपट्ट्यापर्यंत पोहोचवण्यासाठी धडपडत आहेत. या मुलांना चांगले शिक्षण मिळाले तर नक्कीच भारताचा चेहरामोहरा पालटून जाईल.

१०. नेझी आणि डिव्हाईन

रॅप म्युझिकचे आज भारतातही अनेक चाहते आहेत. नेझी (नावेद शेख) आणि डिव्हाईन (व्हिवियन फर्नांडिस) आपल्या कवितेतून आणि शब्दातून जग बदलण्याची भाषा करत आहेत. रॅप म्युझिकचा प्रसार करून आणि त्याद्वारे नव्या पिढीच्या भावना व्यक्त करता याव्यात म्हणून हे दोघेही धडपडत आहेत. त्यांचे संगीत आणि त्यांच्या शब्दातून ते एका नव्या भारताचे स्वप्न साकारत आहेत.

११. ज्योत्सना सिट्लिंग –

हिमालयातील पर्यावरणाचे रक्षण करण्याचा ध्यास घेतलेल्या ज्योत्सनाला इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हिमालयातील डोंगर रंगामध्ये राहणाऱ्या लोकांना एकत्र करून तिने परिसर स्वच्छ करण्याचे काम सुरु केले. या परिसरातून तिने लोकांच्या मदतीने ५० टन कचरा गोळा करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावली. आजही तिचे हे स्वच्छतेचे काम सुरूच आहे.

भारत बदलतो आहे, कारण भारताला बदलवणारे असे कितीतरी हात कुठे ना कुठे काम करत आहेत. अनेकांच्या प्रयत्नातून एक नवा भारत घडत आहे. इथे आम्ही यातील काही लोकांचा उल्लेख केला आहे. ही यादी अजूनही अपूर्ण आहे. तुम्हाला जर या यादीत भर घालता येण्यासारखी नावे माहित असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा. 

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required