computer

पुणे शहर महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर होणार? या २३ गावांचा पुण्यात समावेश होतोय...

मुंबई आणि पुणे दोन्ही महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाची शहरे आहेत. एक राज्याची राजधानी तर दुसरी सांस्कृतिक राजधानी. या दोन्ही शहरांत राहणाऱ्या लोकांसाठी स्वतःचे शहर म्हणजे अभिमानाचा विषय. मुंबइकर आणि पुणेकर बऱ्याचवेळा कोणते शहर अधिक भारी यावरून भिडत असतात. आता त्यांना भांडण्यासाठी अजून एक कारण मिळाले आहे.

महाराष्ट्र सरकारने पुणे महानगरपालिका क्षेत्राजवळील २३ गावे महानगरपालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतल्याने पुणे आता भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर ठरले आहे. पुण्याने आता ५१६.१८ चौरस किलोमीटर भुभागासहीत ४४० चौरस किलोमीटरच्या भुभाग असलेल्या मुंबईला मागे टाकले आहे. याचबरोबर पुणे आता भारतातील सातवे सर्वात मोठे शहर सुद्धा असणार आहे.

पुण्यात नव्याने जोडण्यात आलेल्या गावांमध्ये म्हाळुंगे, सुस, बावधान बुद्रुक, किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे- धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नर्हे, होळकरवाडी, औताडे- हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सनसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, वाघोली या गावांचा समावेश आहे.

पुणेकर आता जेव्हा भौगोलिकदृष्टया आम्ही कसे मोठे आहोत हे सांगतील तेव्हा मुंबईकराना सांगण्यासाठी एक मुद्दा हातात असेल, तो म्हणजे पुणे जरी वाढले असले तरी मुंबईचा वार्षिक बजेट आजही पुण्यापेक्षा पाचपट आहे. यंदा पुण्याचा बजेट ८,३७० कोटी एवढा असेल, तर मुंबईचा ३९,०३८ कोटी एवढा. यावरून पुण्याला आर्थिक बाबतीत मुंबईची बरोबरी गाठायला अजून मोठा वेळ आहे हेच खरे.

महापालिकेत समाविष्ट होणाऱ्या या गावांची नावे वाचली तर या गावांमध्ये आधीच मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झालेले दिसून येते. आता या गावांमधील शाळा, दवाखाने तसेच इतर गोष्टी महापालिकेकडे वर्ग करण्यात येतील. तसे पाहायला गेले तर ही गावे पुण्यापासून आता वेगळी राहिलेली नाहीत.

पुणे महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट झाल्यावर मात्र या गावांना आधी ग्रामपंचायती अंतर्गत ज्या गोष्टी मिळत होत्या त्याच आता महापालिकेंतर्गत मिळतील. पंचायतींच्या सोयीसुविधा आणि पालिकेच्या सोयीसुविधा यात बराच फरक पडत असतो. घरपट्टी सारख्या गोष्टींमध्ये देखील बदल होत असतात. पुणे जिल्ह्यात जागांना सोन्याचा भाव आहे. या गावांमधील जमिनीचे भाव गावे पालिकेत समाविष्ट झाल्यावर बदलतील. 

महाराष्ट्रात मुंबईनजिक ठाणे, पनवेल, कल्याण डोंबिवली असे शहरे आणि पुण्याजवळ पिंपरी चिंचवड ही शहरे अधिकाधिक वाढत आहेत. नव्या कंपन्या उभारण्यापासून ते नवीन वसाहती निर्माण होण्यापर्यंत याच शहरांची निवड होत असल्याने ही शहरे भरभराटीला येत आहेत, पण त्याच सोबत पाण्यापासून ते जमिनीपर्यंत अनेक गोष्टींची टंचाई आहे. याच कारणाने इतर शहरांपेक्षा या शहरांमध्ये अधिक महागाई दिसते. नगरे मोठी होऊन महानगरे झाल्यामुळे जशी सुबत्ता येते तशीच त्यापाठोपाठ अनेक चुकीच्या गोष्टी पण वाढीस लागत असतात. पुणे मुंबई बरोबरच इतर शहरांमध्ये पण विकासाचा आलेख वाढला तर पुण्या- मुंबईवरील भार कमी होण्यास उलट मदत होईल.

तुमच्या या विषयी प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंटबॉक्समध्ये जरूर कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required