computer

तिहार कारागृहाच्या कैद्यांना आलेले ६ विचित्र अनुभव !!

तिहार कारागृह म्हणलं की काय आठवत? भारतातील सगळ्यात मोठे कारागृह आणि तिथले खतरनाक कैदी. मोठ्या गुन्ह्यांमध्ये पकडलेले प्रमुख कैदी तिहार कारागृहात असतात. हत्याकांड, किंवा देशविरोधी कारवाया करणारे अपराधी तिथे वर्षानुवर्षे शिक्षा भोगत असतात. अनेकांना तिथे फाशीही झाली आहे. सगळ्यात खतरनाक कैदी असलेल्या कारागृहात अजून काही खतरनाक असू शकेल काय? त्यांनाही कोणाची भिती वाटत असेल का? तर याचं उत्तर हो असं आहे. तर आजच्या या लेखात आपण वाचूया तिहारच्या कैद्यांना आलेले काही गूढ अनुभव. ह्या गोष्टींवर बोभाटाचा विश्वास नाही. केवळ गमतीदार गोष्टी या एकाच अर्थाने आम्ही त्या इथे देत आहोत. 

१.

एका 3 खून केलेल्या गुन्हेगाराला असा भयानक अनुभव आला की त्याची भीतीने गाळण उडाली. त्याच्या म्हणण्यानुसार त्याला जेल क्रमांक ३ मध्ये दीड वर्षांसाठी पाठवले होते. तिथे त्याला काही भुताटकीच्या गोष्टी सांगण्यात आल्या, त्याला वाटले मला मुद्दाम घबरवण्यासाठी इतर कैदी हे करत असतील. पण काही दिवसानंतरच त्याला रात्रीचे विचित्र आवाज आले. एका रात्री तर त्याला कोणीतरी थोबाडीत मारल्याचेही जाणवले.

२.

अनेक कैद्यांनी अशाही तक्रारी केल्या आहेत की, तिथे रात्री काहीतरी असं काही भयानक घडतं की सकाळी सगळ्यांना प्रचंड डोकेदुखी सुरू होते. रात्री नक्की काय घडतं हे मात्र कोणालाही आठवत नाही. कधीकधी तर इतकी वाईट परिस्थिती होते की डॉक्टरांना बोलवावे लागते.

३.

अनेक जणांना असे मानतात की ज्या कैद्यांना तिथे फाशी दिली गेली आहे त्यांचे आत्मे तिहारमध्ये फिरतात. कैद्यांनी सांगितले की त्यांनी १९८४ साली फाशी मिळालेल्या मकबूल भट ला त्या आवारात पाहिले आहे. हाच अनुभव अफजल गुरूबद्दल आला आहे. त्याला २०१३ साली फाशी मिळाली होती.

४.

जेल क्रमांक ३ ही सगळ्यात भयानक किंवा भुताटकीने भरलेली जागा मानली जाते. त्या जेलजवळच गुन्हेगारांना फाशी देण्याची जागा आहे. तिथे काही कैद्यांनी इतर कैद्यांचे खूनही केले आहेत. ते म्हणतात खून त्यांच्याकडून कुठल्यातरी अज्ञात शक्ती कडून करवून आणले गेले. बऱ्याच जणांनी तिथे काही बोलण्याचे, किंचाळीचे आवाजही ऐकले आहेत. कोणी अज्ञात शक्ती कैद्यांचे झोपेत पांघरुणही ओढून घेते व सामानाचीही नासधूस करते.

५.

बराक क्रमांक ६ मध्ये महिला कैद्यांनीही पहाटे २ वाजता तिथे कोणी अज्ञात शक्ती ओरडत, किंचाळत फिरताना पहिली आहे. असं म्हणतात, ती कोणी स्त्री आहे जी रडत असते.

६.

१६ डिसेंबरला घडलेल्या दिल्ली निर्भय बलात्कार प्रकरणातल्या आरोपींना तिहारमध्ये फाशी दिली गेली. यानंतर अनेकांना विचित्र अनुभव आले. अशोक बाजे या गुन्हेगाराला एक रात्री कोणीतरी त्याच्या छातीवर बसून त्याचा जीव घेत आहे असा अनुभव आला. त्या व्यक्तीचा चेहरा त्याला नीट दिसल्यावर त्याला लक्षात आले, की ती व्यक्ती मुकेश सिंग होती. मुकेश सिंग हा निर्भय बलात्कार प्रकरणातल्या ४ आरोपीपैकी एक होता. त्याला दिल्ली बलात्कार प्रकरणात फाशी देण्यात आली होती.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required