computer

कावळ्यांची मैत्रीण...ही लहानगी कावळ्यांना खाऊ देते आणि बदल्यात तिला कावळ्यांकडून काय काय मिळते पाहा!!

लहानपणी जे मित्र आयुष्यात येतात ते सर्वात जास्त जवळचे असतात, मग ते शेजारी राहणारे असोत किंवा शाळेतले. आणखी एक जवळचा दोस्त म्हणजे प्राणी. तुम्ही अनुभवले असेलच, की लहान मुलांची प्राण्यांशी किंवा पक्षांशी किती पटकन मैत्री होते. लहान मुलांचे निरागस मन कदाचित प्राणी मित्रांना वाचता येत असेल. आज आम्ही अश्याच एका गोड मुलीची गोष्ट सांगणार आहोत. ही मुलगी पक्षांची मैत्रीण आहे. ती बागेत पक्ष्यांना खाऊ देते आणि त्या बदल्यात पक्षी तिला भेटवस्तू आणून देतात. हे काल्पनिक कथा नाही, तर खरोखरंच घडले आहे.

सिएटलमधील एका मुलीची ही कथा. तिचं नाव गाबी आहे. २०११ पासून जेव्हा ती फक्त ४ वर्षांची होती तेव्हा पासून तिची आणि कावळ्यांची मैत्री झाली. एकदा ती शाळेत जाताना डब्यातून काही खाद्यपदार्थ खाली पडायचे. आणि तेव्हा कावळे तिच्याभवती जमले. तिला खूप गंमत वाटली. तिने त्यांना अजून खायला दिले. रोजच्या रोज आता कावळे खाण्याच्या आशेने तिच्याभोवती गर्दी करायचे. तिचा भाऊही सोबत असायचा. जशी ती मोठी होऊ लागली तेव्हा ती खास डब्यात खाऊ घेऊन येऊ लागली आणि कावळेही तिची वाट पाहू लागले. त्यांनी कधी तिला त्रास दिला नाही.

जेव्हा लिसाला म्हणजे गाबीच्या आईला कळले की तिला पक्ष्यांची आवड आहे. तेव्हा तिला खूप खूप छान वाटले. नंतर २०१३ पासून त्यांनी घराच्या अंगणातच पक्षांसाठी बर्ड-फीडर ठेवणे सुरू केले. तिथे त्यांना अंघोळीसाठी आणि पिण्यासाठी पाणी ठेवणेही सुरू केले. गाबी रोजच्या रोज सकाळी कावळ्यांसाठी खायला शेंगदाणे, फुटाणे, कॉर्न, डॉगफूड ठेवू लागली. आणि मग तिच्या मित्रांना हाका मारू लागली. थोड्याच वेळात कावळे जमायचे आणि खाऊ फस्त करून पाणी पिऊन तिथून उडून जात. पण यात विशेष गोष्ट अशी आहे की हे कावळे काही न काही वस्तू त्या फिडर मध्ये ठेवतात.  

गाबी म्हणते ती वस्तू म्हणजे मला कावळ्यांनी दिलेली भेटवस्तू आहे. त्या वस्तू म्हणजे अगदी साध्या असतात पण गाबी त्या प्रेमाने जपून ठेवते. तिने या वस्तूंचा संग्रह केला आहे आणि तो संग्रह तिला सोन्याहून मौल्यवान आहे. या संग्रहात कधी बटन, छोटासा काचेचा रंगीत तुकडा, छोटा बॉल, निळया कागदाची क्लिप, पिवळा मणी, लेगोचा तुकडा, गुळगुळीत खडे अश्या कितीतरी बारीकसारीक वस्तू आहेत. तिने याची वर्गवारी करून ते किती वाजता कोणत्या तारखेला मिळाले याची नोंदही केली आहे. तो संग्रह दाखवताना गाबी म्हणते, "तुम्ही हा पहा पण लांबूनच. याला हात लावू नका" तिला तिचा भेटवस्तूंचा संग्रह खूप प्रिय आहे. तिला जेव्हा विचारले जाते की तुला सर्वात आवडलेली भेटवस्तू कोणती तेव्हा ती एक छोटासा धातूचा तुकडा दाखवते ज्यावर "Best" लिहिले आहे. ती खुदकन हसून म्हणते, " ते माझे बेस्ट फ्रेंड आहेत, म्हणून त्यांनी मला दिले". अजून एक हृदयाच्या आकाराचा मणी दाखवत ती म्हणते, " त्यांचे माझ्यावर खूप प्रेम आहे". 

या भेटवस्तू दाखवताना तिचा चेहरा उजळून जातो. हा संग्रह वाढतच आहे. गाबी खूप भाग्यवान आहे असे सगळेजण म्हणतात. पक्षीतज्ञ म्हणतात, " पक्षी माणसांच्या जवळ खाण्याचा अपेक्षेने येतात आणि रोजच्या सहवासाने विश्वास ठेवतात. त्यांना जेव्हा विश्वास वाटतो की माणूस त्यांना इजा पोहोचवणार नाही तेव्हा ते ओळखही ठेवू शकतात."

गाबी आणि तिच्या पक्ष्यांची मैत्री किती गोड आहे ना! तुमच्या लहानपणीचा असा कोणी प्राणी किंवा पक्षी दोस्त होता का? कुठली आठवण असेल तर नक्की कमेंट करून सांगा.


लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required