ॲम्बी व्हॅली: १०,६०० एकरांवर उभारलेलं अतिश्रीमंतांचं राजेशाही शहर नक्की कशामुळे ओस पडलंय?
सहारा ॲम्बी व्हॅली. भारतातल्या अतिश्रीमंत लोकांचं राजेशाही शहर. ही टाऊनशिप नवीन होती तेव्हा इथे कुठेही 'भारत' दिसत नसे. दिसत असे तो फक्त 'इंडिया'. भारतातलं अत्यंत सुनियोजित, आधुनिक शहर अशी त्याची ओळख होती. ५०० पेक्षा जास्त आरामदायी बंगल्यांनी सजलेल्या या नगरीतील घरांच्या किंमती सामान्यांचे डोळे पांढरे करणाऱ्या होत्या. होय.. आठ करोडपासून पुढे किंमत असलेली घरं विकत घेण्याची स्वप्नं तुम्ही-आम्ही बघू शकतो का? (Aamby valley)
आज मात्र हे सर्व महागडे आलिशान बंगले ओस पडले आहेत. सुंदरशा रंगीबेरंगी फुलझाडांची झालर असलेल्या पायवाटा मोठमोठ्या खड्ड्यांनी विद्रूप बनल्या आहेत. एखाद्या नितळ चेहऱ्याच्या सौंदर्यवतीचा चेहरा मुरुमांनी भरल्यावर तिला पाहून जी हळहळ वाटेल तशीच आता या टाऊनशिप कडे पाहिल्यावर वाटते. असं काय झालं, ज्यामुळे एवढ्या सुंदर जागेचा आणि त्या भोवती गुंफलेल्या स्वप्नांचा इतका विचका झाला? थोडं मागे जाऊन पाहू.
या टाऊनशिपचा जन्म २००६ मधला. लोणावळा परिसरात तब्बल १०,६०० एकर एवढ्या क्षेत्रफळावर ही सिटी साकारली. मुंबई, पुण्यापासून कारने अवघ्या दोन तासांत गाठता येईल अशा ठिकाणी. खास हायफाय लोकांसाठी तयार केलेल्या पाश्चात्य शैलीचे डिझाईन असलेल्या राजेशाही थाटाच्या वास्तू ही इथली खासियत. बाकी या नगरीचं कोडकौतुक काय वर्णावं महाराजा! भारतातली पहिली हिल सिटी, फक्त खाजगी विमानांसाठीच बनवलेला पहिला विमानतळ, १३०० गज लांबीची धावपट्टी, वॉटर एअरक्राफ्टच्या लँडिंगसाठी बांधलेला वॉटर डोम यांमुळे भारतातला हा त्या काळातला एकमेवाद्वितीय प्रकल्प म्हणून ओळखला जात होता. याशिवाय चकाचक उपाहारगृहं, करमणूकीची साधनं, इंटरनॅशनल स्कूल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, हॉस्पिटल्स अशा जागतिक दर्जाच्या सुखसोई येथे होत्या. परत सर्वकाही मॉडर्न. नुसतं मॉडर्नच नाही तर ज्याला स्टेट ऑफ द आर्ट म्हणतात तसं, अत्याधुनिक.
इथे २५६ एकर एवढ्या प्रचंड जागेवर गोल्फचं मैदान होतं. जोडीला गोल्फ अकॅडमीही. फॅशन शोज, सिनेमांचं शूटिंग, फॅन्सी पार्ट्या ही इथली जीवनशैली होती. ही सगळी मायानगरी साकारणाऱ्या कंपनीचं नाव होतं सहारा इंडिया. होय, तीच ती कुप्रसिद्ध सहारा कंपनी. १९७६ मध्ये सुरू झालेल्या या कंपनीने तीस वर्षांत फार मोठी मजल मारली होती. सगळं छान चाललं होतं. सहारा हे एक महाप्रचंड साम्राज्य होतं तेव्हा. मालकीची अनेक हॉटेल्स आणि दिमतीला सुदूर विणलेलं माध्यमांचं जाळं हे त्यांचं मुख्य भांडवल होतं. त्यांची कमर्शियल एअरलाइनसुद्धा होती. एका आयपीएल टीमची मालकी, फॉर्म्युला वन टीमचे स्टॉक्स, भारतीय क्रिकेट आणि हॉकी संघाची स्पॉन्सरशिप अशी या कंपनीची घोडदौड सुरू होती. या कंपनीचा मालक होता सुब्रतो रॉय. पेज थ्री सर्कल मध्ये सुब्रतोचं नाव ठळकपणे समोर यायचं ते त्याने आयोजित केलेल्या इव्हेंट्स आणि पार्ट्यांमुळे.
पण त्याचे दिवस फिरले. २०१० मध्ये एक घोटाळा उघड झाला आणि त्याने सुब्रतो रॉय, सहारा, ॲम्बी व्हॅली या सगळ्यांचेच ग्रह फिरले. सुब्रतोने अवैध मार्गांनी २४,००० करोड एवढी संपत्ती गोळा केल्याचं उघड झालं. हे पैसे त्याने चेक किंवा डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून न घेता कॅशच्या स्वरूपात सुमारे ३ करोड लोकांकडून घेतले होते. या तीन कोटी जनतेमध्ये प्रामुख्याने मध्यमवर्गीय आणि त्याखालच्या स्तरातले लोक होते. सुब्रतो रॉयने त्यांना विविध प्रकारची आमिषं दाखवत त्यांच्याकडून हे पैसे गोळा केले होते. चौकशी सुरू झाली तेव्हा या व्यवहारांचे कुठलेही पुरावे सहाराला देता आले नाहीत. त्यानंतर सहारा साम्राज्याची आणि ॲम्बी व्हॅलीची उतरती कळा सुरू झाली.
२००९ मध्ये सहाराने एक आयपीओ बाजारात आणण्याची योजना आखली होती. कोणतीही कंपनी जेव्हा लोकांकडून पहिल्यांदाच भांडवल गोळा करण्याच्या उद्देशाने बाजारात आपले शेअर्स आणते, तेव्हा ती आयपीओ सादर करते. याला इनिशियल पब्लिक ऑफर असं म्हटलं जातं. हा आयपीओ बाजारात आणताना सहाराने एक अहवालही सादर केला होता. पण या अहवालातल्या ६४० क्रमांकाच्या पानावर एक गडबड होती. ही टॅक्सशी संबंधित गडबड होती. त्यानुसार सहाराच्या दोन कंपन्यांनी गुंतवणूकदारांकडून करोडो रुपये गोळा केले होते आणि या गुंतवणूकदारांना त्या बदल्यात खोटी आश्वासनं दिली गेली होती. या अहवालावरून इंदोरच्या एका सीएने नॅशनल हाऊसिंग बँक या बँकेला एक पत्र लिहिलं. त्यामध्ये सहाराच्या या घोटाळ्यामध्ये बँकेने लक्ष घालावं अशी त्यांनी विनंती केली होती. बँकेने ही मागणी सेबीकडे पाठवली. तपास केल्यानंतर असा घोटाळा खरोखरच घडल्याचं सेबीच्या लक्षात आलं. त्यामुळे सेबीने सहारा समूहावर लोकांकडून कोणत्याही स्वरूपात पैसे घेण्यावर बंदी घातली आणि सहाराला २४००० करोडहून अधिक रक्कम गुंतवणूकदारांना परत करायला सांगितलं. यामुळे प्रचंड खळबळ माजली.
सहाराने वर्तमानपत्रातून सेबी आणि सरकार यांच्यावरच आरोप केले. (मीडिया पहिल्यापासून सहाराच्या पाठीशी होताच!) कंपनी सुप्रीम कोर्टात गेली. पण तिथेही झटका बसला. सुप्रीम कोर्टाने सेबीचीच बाजू घेतली. वर त्या २४,००० करोडवर १५ टक्के व्याजही देण्याचा सहाराला आदेश दिला. त्यासाठी केवळ ९० दिवसांची मुदत दिली. आगीतून बाहेर पडून फुफाट्यात सापडल्यासारखी सहाराची स्थिती झाली. पण ते गप्प बसले नाहीत. त्यांनी अजून एक डाव खेळला. त्यांनी सेबीला ५,००० कोटी दिले. पण उरलेले पैसे परत देण्याचं ते नाव घेईनात. उरलेला पैसा आपण परस्पर गुंतवणूकदारांना परत केल्याचं त्यांनी सेबीला सांगितलं. आता सेबी पण चिडली. ज्यांना पैसे परत दिले त्या गुंतवणूकदारांचा तपशील सेबीने सहाराकडे मागितला.
यानंतर या नाटकाचा अजून एक प्रवेश समोर आला.सहाराने शुद्ध थापा मारायला सुरुवात केली. बहाणे तर असे की शेंबड्या पोराचाही विश्वास बसणार नाही. खूप पेपर वर्क आहे, उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे कर्मचारी सुट्टीवर गेले आहेत अशी कारणं सहाराने द्यायला सुरुवात केली. त्यानंतर उपकार केल्यासारखी कागदपत्रं तर पाठवली. पण ती सुसंगत क्रमवारी न लावता वाटेल तशी लावली, जेणेकरून त्यावरून कसलाही अर्थबोध होऊ नये. ही कागदपत्रंही त्यांनी वेळ उलटून गेल्यानंतर पाठवली. १२७ ट्रक्स मधून ३१ हजार खोक्यांमधून ही कागदपत्रं पाठवली गेली. या कागदपत्रांमध्ये गुंतवणूकदारांचा तपशील असला तरी तो गोंधळात टाकणारा, संशयास्पद असा होता. आठ हजार लोकांचा पत्ता कधीच न सापडण्यासारखा होता.
या सगळ्यांचा परिणाम? सुब्रतो राॅयला अटक. त्याच्याबरोबर अशोक रॉय चौधरी आणि रविशंकर दुबे हे त्याचे साथीदारही कोठडीमध्ये रवाना झाले. ॲम्बी व्हॅलीमधली मालमत्ता विकायला सहारा समूहाला सांगण्यात आलं. त्यांना ते करता आलं नाही. मग कोर्टाने ॲम्बी व्हॅलीचा लिलाव करायचं ठरवलं. ३७,००० कोटी रुपये किमतीची बोली रक्कम लावण्यात आली. पण कोणीही समोर आलं नाही.
आजही ॲम्बी व्हॅलीचं हे प्रकरण न्यायालयात निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे. त्याचं भवितव्य अनिश्चित आहे. सुब्रतो रॉय मात्र पॅरोलवर बाहेर आहे. ही केवळ एका माणसाच्या अपयशाची गोष्ट नाही, तर त्याच्यामुळे देशोधडीला लागलेल्या अनेकांची कर्मकहाणी आहे. एका सुंदर रमणीय शहराची केवळ एका माणसाच्या हव्यासापोटी कशाप्रकारे वाट लागते याचं हे जिवंत उदाहरण आहे.