computer

रेल्वेचे ब्रेक कसे काम करतात माहित आहे का ?

मंडळी, दसऱ्याच्या दिवशी अमृतसर मध्ये एक भयानक रेल्वे अपघात घडला. ६० पेक्षा जास्त लोक यात मृत्युमुखी पडले आहेत. रावण दहन बघत असताना रेल्वे ट्रॅकवर उभ्या असलेल्या लोकांवरून धावती ट्रेन निघून गेली. आता प्रश्न असा विचारला जात आहे की शेकडो लोक समोर दिसत असताना ट्रेनच्या ड्रायव्हरने ट्रेन का थांबवली नाही ? याच मुद्द्याला घेऊन सध्या या ड्रायव्हरची चौकशी चालली आहे. त्यामधून खरी गोष्ट काय ती समजेलच. पण हा एक नेहमीचा प्रश्न आहे. अनेकजण रेल्वे ट्रॅकवर अपघाताला बळी पडतात. पण लांबून येणारी ट्रेन समोर माणूस दिसत असतानाही थांबत नाही. का ?

याच प्रश्नाचं उत्तर घेऊन आज आम्ही आलो आहोत. आज समजून घेऊया रेल्वेचे ब्रेक काम कसे करतात ते.

ट्रेन मध्ये कोणत्या प्रकारचे ब्रेक असतात.

रेल्वे मध्ये एअर ब्रेक सिस्टम वापरली जाते. हीच सिस्टम अवजड बस किंवा ट्रक मध्ये असते. एअर ब्रेक सिस्टम मध्ये ‘कम्प्रेस्ड एअर’च्या (दाब देऊन बसवलेला हवेच्या) माध्यमातून चाकांची गती थांबवली जाते. हे कसं केलं जातं हे आता पाहूया.

चाकांना थांबवण्यासाठी ‘ब्रेक शु’ चा वापर केला जातो. ‘ब्रेक शु’ चाकांवर दबाव निर्माण करतो ज्यामुळे त्यांची गती कमी होते. यासाठी एका कम्प्रेस्ड एअर असलेल्या नायलॉनच्या पाईपला ‘ब्रेक शु’ बरोबर जोडलं जातं. या नायलॉनच्या पाईप मध्ये एअर प्रेशर कमी जास्त केल्याने गाडी थांबते किंवा पुढे सरकते. ट्रेन मध्ये दोन ब्रेक असतात एक म्हणजे इंजिनसाठी आणि दुसरा संपूर्ण ट्रेनसाठी. प्रत्येक डब्याच्या चाकांना ब्रेक बसवलेले असतात. हे सगळे ब्रेक्स ब्रेक पाईपद्वारे एकत्र जोडलेले असतात.

ब्रेक लावण्याची पद्धत कशी असते ?

(ब्रेक लीव्हर)

ब्रेक लावण्यासाठी ट्रेन मध्ये एक विशिष्ट ‘ब्रेक लीव्हर’ असतो. हा एक प्रकारचा दांडा असतो ज्याला फिरवल्यानंतर पाईप मधला हवेचा दाब कमी होऊ लागतो आणि ब्रेक शु आवळले जातात. ब्रेक लिव्हर विशिष्ट पद्धतीने फिरवला जातो. एका ठराविक प्रमाणापेक्षा जास्त फिरवल्यानंतर इमर्जन्सी ब्रेक लागतात. आपण जेव्हा रेल्वेची चेन खेचतो तेव्हा खरं तर आपण इमर्जन्सी ब्रेक लावत असतो.

ट्रेन ड्रायव्हर ब्रेक कधी लावतो ?

इतर ड्रायव्हर्स प्रमाणे ट्रेनच्या ड्रायव्हरच्या हातात आपल्या मर्जीप्रमाणे ब्रेक लावण्याचे अधिकार नसतात. यासाठी एक वेगळी पद्धत घालून दिली आहे. समजा एक ट्रेन साधारण १६० किलोमीटर प्रती तासाच्या गतीने धावत आहे आणि ट्रेन ड्रायव्हरला समोर २ पिवळे सिग्नल दिसले, तर तो लगेच ट्रेनची गती कमी करतो. पुढे जर असे आणखी पिवळे सिग्नल मिळत राहिले तर ड्रायव्ह रट्रेनची गती आणखी कमी करत जातो. पण जेव्हा लाल सिग्नल मिळतो तेव्हा मात्र काहीही करून त्याला ट्रेन थांबवावीच लागते. लाल सिग्नलवर ट्रेन न थांबवणे गंभीर गुन्हा समजला जातो.

समोर माणूस दिसत असूनही ट्रेन थांबत का नाही.

मंडळी, इमर्जन्सी मध्ये जसे की रूळ तुटलेला असेल किंवा दुरून कोणीतरी रूळ पार करताना दिसत असेल तर ट्रेन ड्रायव्हरला इमर्जन्सी ब्रेक लावण्याचा अधिकार असतो. समजा ड्रायव्हरला रेल्वे रुळावर कोणी तरी दिसलं आणि त्याने इमर्जन्सी ब्रेक लावले, तरी ट्रेन जवळजवळ ८०० ते ९०० मीटर पर्यंत जाऊनच थांबेल. म्हणजे जर ड्रायव्हरला लांबवर कोणीतरी रुळावर दिसलं तरच त्याचा जीव वाचणं शक्य आहे. पण अनेकदा असं होतं की, अचानक कोणीतरी ट्रेनच्या समोर येतं. अशावेळी ड्रायव्हरला ब्रेक लावण्यासाठी वेळच मिळत नाही. शिवाय इमर्जन्सी ब्रेक दाबल्याने निर्माण झालेल्या टॉर्क मुळे गाडी रुळावरून खाली येऊ शकते. गाडीची लांबी हा इथे महत्वाचा भाग असतो.

ब्रेक लावण्याच्या कार्यप्रणालीकडे एकदा बघितलं तर काही मीटर वर असलेला माणूस ट्रेन खाली चिरडण्यापासून वाचवणं हे ड्रायव्हरच्या हातात नसतं हेच दिसून येईल.

मंडळी, तर अशा प्रकारे ट्रेनचेब्रेक्स काम करतात. शक्यतो रेल्वे रूळ पार करणं टाळा कारण कदाचित ब्रेक लावलेले असतानाही ट्रेन तुम्हाला वाचवू शकणार नाही.

 

आणखी वाचा :

चादरी, ब्लँकेट्स, टॉवेल्स, खिडक्या, नळाच्या तोट्या...पाहा बरं भारतीयांनी रेल्वेच्या किती कोटींवर डल्ला मारलाय ?

टर्मिनस, सेन्ट्रल, जंक्शन मधला फरक माहित्ये का ?

रेल्वेच्या डब्यावर हे नंबर का असतात भाऊ ? काय आहे या मागील लॉजिक ?

नागपूरकरांनो, नागपूर रेल्वे स्थानकाबद्दल या गोष्टी माहित आहेत का ?

मुंबईकरांनी असं काय केलं की कोणालाच विश्वास बसला नाही ??

'काला बकरा' ते 'सिंगापूर रोड' - भारतातील ११ म‌जेदार‌ रेल्वे स्टेशन्स‌ !!

सबस्क्राईब करा

* indicates required