२७ वर्षांच्या CEO ची कमाल....४ वर्षात आपल्या स्टार्टअपला बनवले यूनिकॉर्न !!

आज आम्ही एक यशोगाथा घेऊन आलो आहोत. २७ वर्षांच्या अंकिती बोसने व्यवसाय जगतात नवीन उंची गाठून एक नवीन उदाहरण तयार केलंय. तिने अवघ्या ४ वर्षांच्या अवधीत मानाचं यूनिकॉर्न स्टेटस मिळवलं आहे. हे स्टेटस मिळवणारी ती एकमेव भारतीय महिला आहे.
काय असतं हे यूनिकॉर्न स्टेटस ? अंकिती कोणता व्यवसाय करते ? चला जाणून घेऊया.
अंकिती ‘झिलींगो’ या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची सहसंस्थापिका आहे. अमेझॉन, फ्लिपकार्ट प्रमाणे ‘झिलींगो’ कंपनी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते. भारतीयाची कंपनी असली तरी ही कंपनी भारतीयांसाठी नाही बरं का. अंकितीने ही कंपनी विशेष करून दक्षिण आशियाई देशांसाठी तयार केली आहे. याचं कारण विचारल्यावर ती म्हणाली की झिलींगो येण्यापुर्वीच भारतात अमेझॉन, फ्लिपकार्ट कंपन्या कार्यरत होत्या. दक्षिण आशियाई देशात या प्रकारचं प्लॅटफॉर्म उपलब्ध नाही.
अंकितीने दक्षिण आशियाई देशाचा केलेला हा अभ्यास खरा होता. झिलींगो बाजारात आल्यानंतर थायलंड, फिलिपाईन्स, इंडोनेशियातील लोकांनी झिलींगोला उचलून धरलं. आज झिलींगोने दक्षिण आशियाई बाजारपेठेत आपला दबदबा तयार केलाय.
झिलींगोची स्थापना कशी झाली ?

अंकिती बँककॉकला फिरायला गेली असताना तिने तिथल्या लोकांचं फॅशन प्रेम पाहिलं. मग तिने विचार केला की इथल्या लोकांसाठी फॅशन प्लॅटफॉर्म का सुरु करू नये. तिच्या या कल्पनेला साथ दिली सॉफ्टवेअर इंजिनियर ‘ध्रुव कपूर’ याने. ध्रुव कपूरलाही स्वतःचा स्टार्टअप सुरु करायचा होता. अंकितीने आपली कल्पना त्याला सांगितली. त्याला ती कल्पना आवडली. पुढच्या ४ महिन्यातच त्यांनी आपापल्या कामाचा राजीनामा देऊन झिलींगोची स्थापना केली. कंपनी स्थापन करताना दोघांनी पदरचे ३०,००० डॉलर्स खर्च केले. आज या कंपनीचं ३०६ मिलियन डॉलर्स एवढं भांडवल केवळ फंडिंग मधून उभं राहिलेलं आहे.
यूनिकॉर्न स्टेटस काय आहे ?
यूनिकॉर्न ही एक संज्ञा आहे. या संज्ञेचा वापर त्या स्टार्टअप कंपनीसाठी केला जातो ज्यांची उलाढाल १ अब्ज डॉलर्स च्या घरात आहे. अंकितीची झिलींगो कंपनी ९७० डॉलर्स पर्यंत पोहोचली असून लवकरच ती १ अब्जचा आकडा गाठेल यात शंका वाटत नाही. अंकिती हा स्टेटस मिळवणारी भारतातली पहिली महिला ठरणार आहे. ती ज्या क्षेत्रात काम करते तिथे पुरुषांची मक्तेदारी चालते, पण अंकितीने नवीन उदाहरण तयार करून हा समज दूर केला आहे.
तर मंडळी, भारतीय माणसाने अवघ्या ४ वर्षात भारताबाहेरची बाजारपेठ काबीज केल्याचं हे एक दुर्मिळ उदाहरण म्हणता येईल. या उदाहरणाने स्टार्टअपची स्वप्न पाहणाऱ्यांना नक्कीच बळ मिळेल.