computer

१७ वर्षांची मेहनत फळाला...रिचर्ड ब्रॅन्सन ठरलेत खासगी स्पेसशिपद्वारे अंतराळ प्रवास करणारे पहिले मानव!!

आजपर्यंत अंतराळवीर व्हायचे स्वप्न पूर्ण करणे म्हणजे फक्त त्या क्षेत्रातील अभ्यासक, तज्ञा, शास्त्रज्ञांना शक्य होते. इतर कोणीही अंतराळात जायचा अनुभव घेतला नाही. परंतु रविवारी संध्याकाळी अब्जाधीश रिचर्ड ब्रॅन्सन यांनी व्हर्जिन गॅलॅक्टिक स्पेसशिपने अंतराळात प्रवास केला. असं करणारे ते जगात पहिलेच व्यावसायिक बनले आहेत. रिचर्ड ब्रॅन्सन हे  ब्रिटनच्या व्हर्जिन समूहाचे मालक आहेत. असे खासगी स्पेसशिपद्वारे अंतराळ प्रवास करणारे ते पहिले आहेत. गेली १७ वर्षे या मोहिमेची आखणी केली जात होती. विशेष म्हणजे जेफ बेझोस यांच्याआधी ब्रॅन्सन यांनी अंतराळात जायचा अनुभव घेतला.

त्यांच्याबरोबर या स्पेसशिपमध्ये आणखी २ वैमानिक आणि चारजण होते. त्यात भारतीय वंशाच्या शिरीषा बंडला याही होत्या. ब्रॅन्सन यांच्या ‘व्हर्जिन गॅलॅक्टिक’ कंपनीच्या व्हीएसएस युनिटी नावाच्या अंतराळ यानाने न्यू-मेक्सिको येथून उड्डाण केले. जमिनीपासून सुमारे १३ किलोमीटर अंतरावर असताना त्यांचे यान मुख्य विमानापासून वेगळे झाले आणि इंजिन प्रज्ज्वलित होऊन ते सुमारे ८८ किलोमीटर उंचीवर पोहचले. तिथे त्यांनी पाच मिनिटं गुरुत्वाकर्षण विरहित अवस्था अनुभवली. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. स्पेसशिप उतरून परत येण्यासाठी एकूण सुमारे एक तास लागला. यानंतर स्पेसशिप आपल्या तळावर परत आले. रिचर्ड ब्रॅन्सन यांनी त्यांचा अनुभव आणि व्हिडीओ सर्वांसोबत शेयर केला आहे. ब्रॅन्सन यांनी पूर्ण व्हर्जिन गॅलॅक्टिक टीमचे कौतुक केले आणि ते म्हणाले की हे १७ वर्षांच्या मेहनतीचे फळ आहे. त्यांनी सर्व टीमसोबत हा आनंद साजरा केला.

ब्रॅन्सन हे लवकरच वयाची ७० वर्षे पूर्ण करणार आहेत. त्यांचे अगदी लहानपापासूनच अंतराळात जायचे स्वप्न होते. २००४ साली त्यांनी व्हर्जिन गॅलॅक्टिकची स्थापना केली. व्हर्जिन गॅलॅक्टिकने हॉट एअर बलून सारख्या अनेक साहसी मोहीम आखल्या आहेत. अंतराळात जाण्यासाठी आखलेल्या या मोहिमेच्या वेळी  झालेल्या एका अपघातात वैमानिकाचा मृत्यू झाल्याने ही मोहिम थांबली होती. ही घटना २०१४ साली घडली होती. परंतु परत पूर्ण टीम कामाला लागली. २०१८-१९ मध्ये याच्या ३ यशस्वी चाचण्या झाल्या. यानंतरच ही मोहीम आखली गेली.

अंतराळ मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी ही मोहीम महत्वाची मानली जाते. यावर्षी व्हर्जिन गॅलॅक्टिकने आणखी अंतराळ मोहिमा आखल्या आहेत. २०२२ पासून वर्षाला ४०० मोहिमा आखण्याचे उद्दिष्ट आहे. या सर्व मोहिमा खासगी असल्याने अनेकांना त्यांचे अंतराळात जायचे स्वप्न पूर्ण करता येईल. 

अंतराळात जायचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण  आजपर्यंत ६०० तिकीट ६० देशांत विकली गेली आहेत. यात अनेक हॉलिवूड सेलिब्रिटी देखील आहेत. या तिकिटांची किंमत तब्बल २,००,००० डॉलर्स ते २,५०,००० डॉलर्स इतकी आहे. म्हणजे भारतीय रुपयांत म्हणायचे झाल्यास तब्बल १,४८,९०,२०० रुपये! 

बेझोस हे २० जुलैला त्यांच्या ब्लू ओरिजिन न्यू शेफर्ड रॉकेटमधून उड्डाण करणार आहेत. सध्या या अब्जाधीशांची अवकाशात जाण्याची स्पर्धा लागलेली दिसत आहे. अजूनही बरेच जण तिकीट खरेदी करून फिरून येतील. ही तिकिटांची किंमत पाहून सर्वसामान्यांना अजूनतरी ही मोहीम खूप दूर वाटते. त्यामुळे फोटो आणि व्हिडीओ पाहणेच जास्त सोपे, काय म्हणता?

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required