हातसडीचा की पांढरा ? कोणता तांदूळ तुमच्या आरोग्यासाठी चांगला आहे?
जेव्हा आरोग्यासाठी ‘चांगला’ तांदूळ निवडण्याची वेळ येते तेव्हा आपली सर्वाधिक पसंती ही तपकिरी तांदळाला म्हणजे हातसडीच्या तांदळाला असते. पांढरा तांदूळ म्हणजे आपण जो रोज खातो तो तांदूळ आणि तपकिरी तांदूळ म्हणजे कोंडा न काढलेला तांदूळ. दोन्हीही तांदूळ आहेत मग त्यांच्यात फरक का केला जातो.
आजच्या लेखातून आपण या दोन्ही प्रकारच्या तांदळात काय फरक आहेत हे समजून घेणार आहोत. सोबतच तुमच्या आरोग्यावर होणारे परिणामही जाणून घेणार आहोत.
तर, दोन्ही प्रकारच्या तांदळात शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या ‘स्टार्च’चं प्रमाण भरपूर असतं. पण या दोन्ही प्रकारांमध्ये काही बारीक फरक आहेत. हा तक्ता पाहा.
हातसडीच्या तांदळावरचा कोंडा काढला जात नाही त्यामुळे त्याच्यातील व्हिटामिन आणि खनिजं टिकून राहतात. हे दोन्ही प्रकारचे तांदूळ ज्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचतात त्यातून दोघात फरक निर्माण होतो. पांढऱ्या तांदळाचा कोंडा काढून तो साफ केला जातो. त्यांनतर अनेक प्रक्रियांमधून जाऊन तो बाजारात पोहोचतो. या प्रक्रियेत तांदळाचा रंग चकाकतो, पण पोषकतत्त्वे कमी होत जातात.
आता आपण खालील मुद्यांच्या आधारे दोन्ही मधला फरक जाणून घेऊया.
१. ग्लायसेमिक इंडेक्स
एखादं अन्न खाल्ल्यानंतर किती जलद गतीने रक्तशर्करा वाढते यावर ग्लायसेमिक इंडेक्स ठरतो. ग्लायसेमिक इंडेक्सचा आकडा जर जास्त असेल तर याचा अर्थ त्या अन्नाचं लवकरात लवकर पचन होऊ शकतं. हे लक्षात घेता असा सल्ला दिला जातो की जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा भूक कमी करायची असेल किंवा हृदयासंबंधी विकारांवर मात करायची असेल तर ग्लायसेमिक इंडेक्स कमी असलेलं अन्न खा.
विज्ञान असं म्हणतं की हातसडीच्या तांदळापेक्षा पांढऱ्या तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. इथे सर्वच पांढरे तांदूळ म्हटलेलं नाही कारण पांढऱ्या तांदळातही अनेक प्रकार आहेत आणि त्या प्रकारांनुसार ग्लायसेमिक इंडेक्स बदलतो.
२. कॅलरीज
कोणत्याही अन्नातील कॅलरीज म्हणजे उष्णांक हा फार महत्त्वाचा घटक असतो. यावरूनच त्या त्या अन्नाचा शरीरावर होणारा बरावाईट परिणाम समजतो. तांदळाच्या बाबतीत हातसडीच्या तांदळाचा उष्णांक हा पांढऱ्या तांदळापेक्षा काहीप्रमाणात जास्त असतो. याखेरीज कर्बोदके, मेद यांचही प्रमाण जास्त असतं. हे असलं तरी हातसडीचा तांदूळ खाल्याने लगेच वजन वाढत नाही हे मात्र खरं.
३. फायबर्स
फायबर्सबद्दल हातसडीचा तांदूळ बाजी मारून जातो. हातसडीच्या तांदळात फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाण भरपूर असतं. १०० ग्राम हातसडीच्या तांदळात १.८ ग्राम एवढे फायबर्स असतात. याउलट १०० ग्राम पांढऱ्या तांदळात केवळ ०.४ ग्राम इतकेच फायबर्स असतात.
४. विषारी द्रव्ये
अर्सेनिक हे विषारी द्रव्य जवळजवळ सगळ्याच अन्नपदार्थांमध्ये आढळतं, पण हे प्रमाण फारच थोडं असतं. हे प्रमाण वाढलं तर कॅन्सर, हृदयविकार आणि मधुमेह होऊ शकतो.
याबाबतीत हातसडीच्या तांदूळात अर्सेनिकचं प्रमाण जास्त असतं, पण तुम्ही जर इतर अन्नपदार्थांसोबत प्रमाणात खाल्लत तर हातसडीच्या तांदूळामुळे तुमच्या आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होणार नाही.
५. वजन कमी करणे.
संशोधन असं म्हणतं की हातसडीच्या तांदूळामुळे वजन कमी होतं. याला हातसडीच्या तांदूळात असलेले भरपूर प्रमाणातील फायबर्स कारणीभूत ठरतात.
६. मधुमेह
मधुमेहींसाठी हातसडीचा तांदूळ हा अत्यंत आरोग्यदायी असतो. कारण हातसडीच्या तांदूळात मोठ्याप्रमाणात फायबर्स आणि सोबत मॅग्नेशियम हे दोन घटक असतात. अभ्यासातून हे सिद्ध झालं आहे की हातसडीचा तांदूळ तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करतो. त्यामुळे टाइप टू प्रकारातील मधुमेहाचा धोका कमी करतो.
७. हृदयविकार
हातसडीच्या तांदळात आढळणारा लिग्नन हा घटक हृदयविकारांना दूर ठेवण्याचं काम करतो. लिग्ननमुळे रक्तातील मेदाचं प्रमाण कमी होतं, रक्तदाब कमी होतो, रक्तवाहिन्यातील जळजळ कमी होते.
जर तुम्हाला हृदयाशी संबंधित आजार असतील तर पांढऱ्या तांदळापेक्षा हातसडीचा तांदूळ केव्हाही उत्तम.
तर, हे दोन्ही प्रकार आपण समजून घेतलेले आहेत. आता तुम्हीच ठरवा तुम्ही कोणत्या प्रकारातील भात खाऊ इच्छिता.