महाराष्ट्रातल्या या शहराने मिळवलाय जगातल्या सर्वात उष्ण ठिकाणाचा मान....

कसं काय मंडळी, उन्हात करपलात की नाही? यावर्षी पाऊस कमी पडणार किंवा उशिराने येणार असं म्हटलं जात आहे. सध्याचं तापमान बघता या बातम्या खऱ्या वाटू लागल्यात राव. मे महिन्याचा आज अखेरचा दिवस. पण पावसाची चिन्ह काही दिसत नाहीयेत.
मंडळी, आज बोभाटा हवामानावर का बोलतंय असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. त्याचं उत्तर फार महत्वाचं आहे. आपलं चंद्रपूर आहे ना, ते जगातलं सगळ्यात उष्ण ठिकाण म्हणून घोषित झालंय.
चंद्रपूर आणि नागपूर भागात तब्बल ४७ डिग्री तापमान मोजण्यात आलंय. चंद्रपुरात थोडं जास्तंच आहे. जास्त म्हणजे तब्बल ४७.८ डिग्री. मंडळी, चंद्रपूर आणि नागपूर एकमेकांशी उष्णतेच्या बाबतीत स्पर्धा करतायत असं दिसतंय. जगातल्या सर्वात उष्ण भागांच्या यादीत या दोन्ही शहरात रस्सीखेच सुरु आहे.
२८ मे रोजी पाकिस्तानच्या जाकोबाबाद आणि नागपूरचं तापमान ४७.५ सेल्सियस होतं. त्यामुळे ही दोन्ही शहरं दुसऱ्या क्रमांकावर आली आहेत. या सगळ्यांना मागे सोडून चंद्रपूरने कळस गाठलाय राव. आपण इथे आकडे बघून हादरतोय तर तिथे प्रत्यक्ष राहणाऱ्या लोकांची काय अवस्था असेल? गरम तव्यावर हात ठेवून पाहा. असो.
तर, २६ मे पर्यंत हा मान मध्यप्रदेशच्या खरगोन शहराकडे होता. त्यावेळी तिथलं तापमान ४७ डिग्री सेल्सिअस होतं. पुढे जाऊन तापमान ४६.६ डिग्रीवर आलं. यावेळी विदर्भ नवीन विक्रम करण्याच्या तयारीत होता.
मंडळी, जागतिक तापमान वाढ हा सध्या माणसापुढे असलेला सर्वात मोठा प्रश्न आहे. विदर्भात सूर्य जी आग ओकत आहे त्याचं कारण याच जागतिक तापमान वाढीत आहे.
हा प्रश्न जगभरात चर्चेत आहे. फ़िलिपाइन्सने यावर एक भन्नाट उपाय शोधून काढलाय. हा लेख वाचायला विसरू नका!