computer

या माणसाने दिलं भारतात सगळ्यात पहिलं मत!! वाचा किस्सा पहिल्या मतदानाचा!

मंडळी, इतिहासात पहिल्या क्रमांकाला फार महत्व आहे. चंद्रावर गेलेला पहिला माणूस, अमुक अमुक पुरस्कार मिळालेला पहिला माणूस, अमुक एक विक्रम करणारी पहिली महिला, वगैरे. आम्ही आज अशाच एका पहिल्या व्यक्तीबद्दल सांगणार आहोत. या व्यक्तीने भारतातल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत पाहिलं मतदान केलं होतं. कोण आहे ती व्यक्ती ? चला जाणून घेऊया !!  

त्या पहिल्या मतदाराचं नाव आहे ‘श्याम सारन नेगी’. आज त्यांचं वय १०२ वर्ष आहे. यावर्षी जुलै महिन्यात त्यांना वयाची १०३ वर्ष पूर्ण होतील. १९५१ च्या भारतातल्या पहिल्या निवडणुकांपासून ते आजपर्यंत त्यांनी एकही निवडणूक चुकवलेली नाही. ते नियमित मतदान करतात, एवढंच नाही तर ते इतरांनाही मतदानाचं महत्व पटवून देतात.

मंडळी, पहिले मतदार असले तरी २००७ पर्यंत त्यांची कोणीही दाखल घेतलेली नव्हती. ते केवळ भारतातल्या वयोवृद्ध मतदारांपैकी एक होते. त्यांच्याकडे पाहिलं लक्ष गेलं ‘भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी’ मनीषा नंदा यांचं. त्या भारतातल्या ९० पेक्षा जास्त वयाच्या मतदारांची यादी बघत होत्या. तेव्हा त्यांची नजर नेगी यांच्यावर गेली. यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना नेगी यांच्या घरी भेट देण्यास सांगितलं.

मनीषा नंदा यांना नेगी हेच पहिले मतदार आहेत हे कसं माहित असा प्रश्न नक्कीच पडतो. तर त्याचं असं आहे की मनीषा नंदा जेव्हा PhD करत होत्या तेव्हा अभ्यासात नेगी यांचा उल्लेख आला होता.

मंडळी, ‘श्याम सारन नेगी’ यांना भारतातलं पहिलं मत द्यायची संधी कशी मिळाली हा किस्सा पण मजेशीर आहे.

त्याचं झालं असं की, मतदानाला पहिली सुरुवात झाली ती हिमाचल प्रदेश भागात. हिवाळा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला होता. हा भागच असा आहे की एकदा का बर्फवृष्टी सुरु झाली की सगळी कामं ठप्प पडतात. म्हणून मतदान हिवाळ्याच्या आधी पूर्ण होणं गरजेचं होतं. त्याप्रमाणे २५ ऑक्टोबर, १९५१ साली हिमाचल भागात भारतातलं पाहिलं मतदान पार पडलं. त्यावेळी नेगी हे सरकारी शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. मतदानाच्या दिवशी त्यांची नेमणूक मतदान केंद्रावर कर्मचारी म्हणून करण्यात आली होती.

स्वतः मतदान केंद्रावर काम करणार असल्याने त्यांनी मतदान करून मग काम सुरु करण्याची परवानगी मागितली. त्यांना तशी परवानगी मिळाली पण. अशा प्रकारे नेगी यांनी भारतातलं पाहिलं मतदान केलं. मतदान झाल्यावर त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली.

‘श्याम सारन नेगी’ हे सध्या ‘मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभाग’ मोहिमेचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. २००७ नंतर त्यांनी जे मतदान केलं त्यावेळचे व्हिडीओ पण निवडणूक आयोगाने प्रसारित केले होते. आज ते केवळ पहिले मतदाता न राहता भारतातले सर्वात वयोवृद्ध मतदाता पण झाले आहेत. 

सबस्क्राईब करा

* indicates required