'सोडावॉटर' म्हणजे काय? त्यात येणारे फसफसणारे बुडबुडे कशामुळे येतात?
रेल्वे स्टेशनवर उकाड्याने हैराण झालेल्या जीवाला शांत करणारा सोडा असो, जुन्या जमान्यातला गाड्यावर मिळणारा सोडा असो किंवा मग कॉकटेल-मॉकटेलमध्ये वापरला जाणारा सोडा.. अगदीच हाय-फाय इंग्रजीत बोलायचे झाले तर 'स्पार्कलिंग वॉटर'!! याच्याशिवाय बऱ्याच गोष्टींमध्ये मजा येत नाही. शास्त्रीय भाषेत सोडा म्हणजे कार्बोनेटेड वॉटर. पण म्हणजे नक्की काय, त्यात येणारे फसफसणारे बुडबुडे येतात ते कशामुळे? हेच आज आपण जाणून घेणार आहोत..
सोडावॉटर हे कार्बनयुक्त पाणी असते. यात कार्बनडायऑक्साईड वायू विरघळलेल्या स्वरूपात असतो. यालाच काहीजण 'सेल्टझर वॉटर' देखील म्हणतात. अर्थात यात फक्त कार्बनडायऑक्साईडच असतो असे नाही. या पाण्यात सोडियम बायकार्बोनेट, सोडियम सायट्रेट, पोटॅशियम बायकार्बोनेट इत्यादींसह इतरही काही खनिजे असू शकतात.
(साधे पाणी आणि कार्बनयुक्त पाणी)
जोसेफ प्रिस्टली हा 'सॉफ्ट ड्रिंकचा जनक' मानला जातो. त्यानेच १७६७ साली सोडा पाण्याचा शोध लावला. त्याने अपघातानेच बिअर वॉटरवर एक प्रयोग केला होता. त्याने हे पाणी चाखून बघितले तेव्हा त्याला पाण्यात कार्बनडायऑक्साईड मिसळण्याची एक पद्धत सापडली. त्याला ती आवडली म्हणून त्याने आपल्या मित्रांना ते पाणी दिले. अशा प्रकारे प्रथम कार्बोनेटेड पाण्याचा जन्म झाला. त्यानंतर प्रिस्टलीने कार्बोनाटेड पाण्यावर केलेल्या प्रयोगावरचा आपला शोधनिबंधही प्रकाशित केला. हा शोधनिबंधही चांगलाच गाजला आणि प्रिस्टलींना त्यांच्या या शोधाबद्दल १७७२ साली कोपली पदक मिळाले.
(जोसेफ प्रिस्टली)
त्यानंतरच्या काळात, म्हणजे १९२० व १९३०च्या सुमारास मध्ये सोडा सिफन प्रचंड लोकप्रिय होते. सोडा सिफन हा एक प्रकारचा बाटलीत बनवण्यात येणारा सोडा होता. या बाटल्यांचा वापर सामान्यतः काही बारमध्ये कॉकटेल्स-मॉकटेल्स बनविण्यासाठी केला जायचा. सोडा सिफनमध्ये वापरल्या जाणाऱ्या बाटलीला सोडा सिफन, सेल्टेझर बाटली किंवा सायफॉन्स सेल्टरझ बॉटल म्हणूनही ओळखले जायचे. या बाटलीला कार्बन किंवा सोडा पाण्यात मिसळण्यासाठी एक टोपण असते. या बाटलीत आधी थंड पाणी भरले जायचे आणि मग टोपणातून सोडा चार्जर आत टाकला जायचा. बाटली हलवली की सोडाचार्जरमधून कार्बनडायऑक्साईड थंड पाण्यात मिसळले जायचे. हेच पाणी ग्लासमध्ये ओतले की त्यात बुडबुडे दिसत आणि सोडा तयार होत असे.
सध्याच्या तंत्रानुसार कार्बनडायॉक्साईड गॅसचा उच्च दाब आणि कमी तापमान या दोन गोष्टींमुळे कार्बन पाण्यात विरघळतो आणि त्यायोगे कार्बॉनिक ॲसिड तयार होते. तापमान वाढले किंवा दाब कमी झाला, की हाच कार्बनडायॉक्साईड पाण्यातून बुडबुड्यांच्या स्वरुपात बाहेर पडतो. हे सगळं प्रकरण अतिदाबाखालचा कार्बनडायॉक्साईड पाण्यातून जाऊ दिला की साध्य होतं. अर्थात हे आम्ही जितकं सोपं करुन सांगत आहोत, तितकंच किचकटही आहे. जेव्हा सोडा बॉटल खूप जोरात हलवून उघडली जाते तेव्हा खूप प्रमाणात दाब तयार होतो आणि झाकण उघडल्या उघडल्या हा गॅस पाण्यात मिसळून खूप जोरात बाहेर पडतो व आवाजही होतो. सोडावॉटरमध्ये तयार होणारे लहान बुडबुडे कार्बोनेशनमुळे उद्भवतात. हे कार्बोनेशनने लोकांना आवश्यक ती उत्तेजना किंवा 'फिझ्झ' मिळते.
वाचकहो,माहिती कशी वाटली? शेयर करायला विसरु नका..
लेखिका: शीतल अजय दरंदळे