केरळ मध्ये भारतीय सैन्याने असं काम केलं की सगळा देश त्यांना सलाम करत आहे...
मंडळी, केरळ सध्या एका भयानक नैसर्गिक संकटात आहे. जोरदार पाऊस, भूस्खलन, महापुरामुळे केरळमध्ये आणीबाणीची परिस्थिती ओढवली आहे. तब्बल ४५ पेक्षा जास्त लोकांचा यात जीव गेलेला आहे. अशा परिस्थितीत केरळच्या नागरिकांच्या मदतीला भारतीय सैन्य धाऊन आलेलं आहे. नेहमीप्रमाणेच सैन्याने त्यांच्या अफलातून कामगिरीतून सर्वांची मान उंचावली आहे.
चला तर जाणून घेऊया सैन्याने केलेल्या कामाबद्दल.
मल्लापुरम भागात पुरामुळे संपूर्ण रोड वाहून गेला होता. मधून वाहणाऱ्या नदीने वाहतूक ठप्प पडली होती. यावर उपाय म्हणून भारतीय सैन्यातील इंजिनियर टास्क फोर्सने तब्बल ४० फुट पूल तयार केला आहे. राव, केरळ मधली स्थिती बघितली तर भक्कम पूल बांधणं शक्य नाही म्हणून पूल बांधण्यासाठी सैन्याने चक्क स्थानिक साधनांचा वापर केला आहे. पुरामुळे जी झाडं पडली, त्यांची ओंडकी वाहून आणून हा पूल बांधण्यात आला आहे. पूल बांधण्यासाठी सैन्याच्या मदतीला स्थानिक लोकही धावून आले होते.
वरून पडणारा पाऊस आणि खालून वाहणारी नदी. अशा परिस्थितीत सैन्याने तातडीने हा पूल बांधून तयार केला. असाच आणखी एक पूल वायनाड जिल्ह्यात बांधला आहे. तब्बल ८०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी या पुलाचा वापर केला गेला.
मंडळी, भारतीय सैन्याने केलेल्या कामाचं हे तर एक छोटसं रूप आहे. केरळमधल्या पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवणं, रस्ते दुरुस्ती, रस्ते बांधणी, पूल बांधणी इत्यादी कामे आज सैन्याद्वारे युद्ध पातळीवर सुरु आहेत. नौसेना, वायुदल आणि नॅशनल ‘डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स’ एकत्र येऊन काम करत आहे. भारतीय सैन्याने या मदत कार्याला ‘ऑपरेशन सहयोग’ नाव दिलंय.
मंडळी, असाच प्रसंग २०१४ साली जम्मू काश्मीरच्या पूंछ भागात आला होता. तेव्हा सैन्याने अवघ्या २४ तासात नवीन पूल बांधून तयार केला होता. इतकंच नव्हे, तर मुंबईमध्ये एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर नवीन पुलाच्या उभारणीसाठी सैन्यालाच बोलावण्यात आलं होतं. फेब्रुवारीमध्ये हा पूल तयार झाला असून आज त्याचा वापरही होत आहे
भारतीय सैन्याने अशा आणीबाणीच्या प्रसंगी दाखवलेलं शौर्य खरंच कौतुकास्पद आहे. भारतीय सैन्याला बोभाटाचा सलाम !!!
आणखी वाचा :
आर्मी आली मुंबईकरांच्या मदतीला !!
भारतीय सेनेच्या प्रमुखांच्या हॅटचा पट्टा ओठांखाली का असतो ? उत्तर लपलंय थेट इंग्रजांच्या काळात !!
कारगिल विजय दिवस : कारगिल विजयाचे ५ अज्ञात वीर !!
देशाचा वीर जवान...९ गोळ्या लागूनही जिवंत !!