महाराष्ट्रातल्या या शहरात भारतातला पहिलावहिला 'घुबड महोत्सव' भरतोय....कुठे आहे हे ठिकाण ??
घुबड म्हटलं की तुम्हाला काय आठवतं ? हॉरर फिल्म्स किंवा भूत बंगल्यातला वटवाघुळांच्या शेजारी बसलेला काळा घुबड. किंवा मग लहानपणीची ती स्टोरी. घुबडाला दगड फेकून मारला की तो दगड पकडतो आणि घासू लागतो. त्याबरोबर आपण बुटके होत जातो. हिंदी मध्ये मूर्ख माणसाला ‘उल्लू’ सुद्धा म्हणतात. या बिचाऱ्या पक्षाला ज्या ज्या गोष्टींशी जोडलं गेलं तो तसा खरच आहे का ? तर अर्थात नाही. तो नको त्या गोष्टींशी कसा जोडला गेला हा संशोधनाचा भाग आहे. मात्र या पक्षाबद्दल आता जनजागृती होताना दिसतेय. अशाच जनजागृतीसाठी पुण्यात पहिलावहिला ‘घुबड फेस्टीव्हल’ भरणार आहे.
पुण्याची पक्षी संशोधक संस्था इला फाउंडेशनने हा महोत्सव भरवणार आहे. २९ ते ३० नोव्हेंबर दरम्यान जेजुरीच्या जवळ असलेल्या ‘इला हॅबिटेट’ पिंगोरी येथे या महोत्सवाला सुरुवात होईल. ‘इला हॅबिटेट’ हे मुळात प्राणी, वनस्पतींनी समृद्ध आहे. अशा समृद्ध वातावरणात हा महोत्सव पार पडेल.
मंडळी, घुबाडांसाठीचा हा देशातील पहिला महोत्सव ठरणार आहे. इला फाउंडेशनने घुबड पक्षासंदर्भात लोकांमध्ये असलेले समज गैरसमज दूर करण्यासाठी या महोत्सवाचं आयोजन केलंय.
मंडळी, आजच्या काळातही या पक्षाभोवती असलेली अंधश्रद्धा दूर झालेली नाही. इला फाउंडेशनच्या सतीश पांडे यांनी सांगितल्या प्रमाणे एका वर्षात तब्बल ७८,००० घुबड मारले जातात. पिसांसाठी किंवा त्यांच्यापासून औषध तयार करण्यासाठी घुबडांना मारून त्यांची तस्करी होते. काहीवेळा सामान्य माणसं अंधश्रद्धेमुळे त्यांचा बळी देतात. अशा अघोरी प्रकारामुळे या पक्षाचं अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे.
राव, या महोत्सवाला लहान मुलांनी हजर राहावं म्हणून जंगी तयारी केली जात आहे. गाणी, पोस्टर्स, चित्र, कविता, नाटुकली, इत्यादी या महोत्सवात सदर करण्याचं आवाहन शाळांना करण्यात आलंय. खेड्यासोबत शहरातल्या शाळांनी यात भाग घ्यावा यासाठी प्रयत्न होतायत. आश्चर्य म्हणजे महोत्सवाला आता पासूनच भरगोस प्रतिसाद मिळतोय.
या महोत्सवात चर्चासत्र सुद्धा असणार आहेत. सामान्य माणसांना पक्षीशास्त्रज्ञ, तज्ञ व्यक्ती, फोटोग्राफर्स, सिने क्षेत्रातल्या मंडळींसोबत बोलता येणार आहे.
राव, घुबड पक्षी म्हटल्यावर आजवर भीती वाटायची पण आता त्याची सामान्य बाजू समजून घेऊया. महोत्सवाची कल्पना आम्हाला तरी भन्नाट वाटली. आता तुम्ही सांगा, तुम्हीं जाणार का या महोत्सवाला ?