computer

सामन्यातील असामान्य - भाग ३: वयाच्या १५ व्या वर्षी बलात्कार होऊनही असंख्य मुलींसाठी लढणारी रणरागिणी !!

सुनीता कृष्णन नावाच्या एका सामान्य स्त्रीने जे काही सहन केले आहे ते सहन करून जगणे देखील कठीण आहे. पण या महिलेने सामान्य परिस्थितीतून जे असामान्य काम करून दाखवले त्यासाठी त्यांना हजारवेळा सलाम केला तरी कमी असेल.

१९७२ साली जन्मलेल्या सुनीता कृष्णन यांची ओळख समाजसेविका म्हणूनच आहे. त्यांना लहानपणापासून समाजसेवेची आवड होती. त्या लहानपणी आजूबाजूला राहणाऱ्या गरीब मुलांची मदत करत असत. अवघ्या वयाच्या १२व्या वर्षी त्यांनी लहान मुलांसाठी शाळा सुरू केली होती.  

सध्या त्या प्रज्वला नावाची एनजीओ चालवतात. त्या लैंगिक शोषणाच्या विळख्यात अडकलेल्या महिला आणि मुलींचे रक्षण आणि त्यांचे पुनर्वसन करण्याचे काम करतात. आजवर त्यांनी या विळख्यातून सोडवलेल्या मुलींची संख्या थोडीथोडकी नाहीतर तब्बल २२ हजारपेक्षा जास्त आहे.

सुनीता कृष्णन यांची कहाणी जगासमोर तेव्हा आली जेव्हा त्या कौन बनेगा करोडपती शोच्या कर्मयोगी एपिसोडमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्या शोच्या प्रोमो व्हिडिओमध्ये सुनिता यांनी स्वतःची जी कहाणी सांगितली ती ऐकून कुठल्याही संवेदनशील मनाच्या माणसाच्या काळजात चर्रर्रर्र झाल्याशिवाय राहत नाही.

त्या सांगतात की अवघ्या १५ वर्षांच्या वयात त्यांच्यावर ८ लोकांनी बलात्कार केला. ते लोक एवढ्यावर थांबले नाहीत त्यांनी सुनीता यांना प्रचंड मारहाण केली. त्याचा परिणाम म्हणून त्यांना एका कानातून ऐकू येणे कमी झाले. हा शारीरिकच नाहीतर मानसिकरित्या देखील प्रचंड मोठा धक्का होता. पण एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर पडत त्यांनी समाजाच्या सेवेचे व्रत हाती घेतले.

त्यांचे महिलांना लैंगिक शोषणातून मुक्त करण्याचा प्रवास देखील अतिशय खडतर राहिला आहे. त्यांच्यावर तब्बल १७ वेळा जीवघेणे हल्ले झाले आहेत. त्यांच्यावर रिक्षात हल्ला झाला होता. तसेच त्यांच्यावर ऍसिड हल्ला आणि विष देऊन मारण्याचे प्रयत्न देखील झालेले आहेत. सुनीता तरी सर्व संकटांना मात देत आज खंबीरपणे लढत आहेत.

सुनीता सांगतात, 'जोवर माझा शेवटचा श्वास आहे, तोवर ज्या मुलींना लैंगिक अत्याचाराचा सामना करावा लागतो त्यांच्यासाठी माझे आयुष्य मी जगत राहीन.'

त्यांच्या याच कामगिरीचा गौरव म्हणून २०१६ साली त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्या मदर तेरेसा पुरस्काराच्या देखील मानकरी आहेत. तसेच त्यांचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये देखील नोंदवले गेले आहे.

अशा या महान भारतीय महिलेला बोभाटाचा सलाम !!

सबस्क्राईब करा

* indicates required