या जपानी आजोबांनी चक्क एक्सेल वापरून ही अप्रतिम चित्रे काढली आहेत?
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/excel18.jpg?itok=kIrOaPkc)
मायक्रोसॉफ्ट एक्सेलवर काम करणं हे जगातल्या सगळ्यात कंटाळवाण्या कामांपैकी एक काम आहे. मान्य आहे की स्प्रेडशीट आपल्याला खूप उपयोगाची असते, पण तरीही तिच्यावर काम करणं काही खूप मौजमजेची गोष्ट असते अशातला भाग नाही.
जपानच्या एका आजोबांनी मात्र कमाल केलीय! त्यांनी मायक्रोसॉफ्ट एक्सेल वापरून एवढ्या सुंदर कलाकृती निर्माण केल्या आहेत की त्या पाहून तुम्हाला पुन्हा एकदा एक्सेल शिकावंसं वाटेल!
तात्सुओ होरूची असं त्यांचं नाव. ते जवळपास ८० वर्षांचे आहेत आणि गेल्या २० वर्षांपासून ते अशा कलाकृती बनवत आहेत. तात्सुओ आजोबा जेव्हा रिटायर झाले तेव्हा त्यांना नवीन काहीतरी शिकावं असं वाटलं. त्यांनी चित्रकला शिकण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी रंग, ब्रश यावर खर्च न करता त्यांनी आपल्या कॉम्प्युटरवर ती शिकायचं ठरवलं! आता चित्रकला शिकवणारे खूप ऍप्स उपलब्ध आहेत, परंतु चित्रकलेसाठी त्यांनी एमएस एक्सेलचीच निवड केली!
त्यांच्या चित्रात जपानी लँडस्केप आढळतात.
अशा प्रकारे त्यांच्या चित्रे तयार होतात.
होरूची यांना हे यश एका रात्रीत मिळालेलं नाही. त्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली होती.
एक्सेलवर चित्रे काढायला सुरुवात केल्यानंतर सहा वर्षांनी त्यांनी Excel Authoshape Art Contest मध्ये भाग घेतला आणि तिथे त्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं! त्यानंतर त्यांच्या चित्रांनी लोकांना आकर्षित करायला सुरुवात केली. त्यांच्या म्हणण्यानुसार इतर सॉफ्टवेअरपेक्षा एमएस एक्सेल हे वापरण्यास खूप सोपे आहे आणि त्यात इतर सॉफ्टवेअरपेक्षा जास्त फ्लेक्सीब्लीटी आणि फंक्शन्स आहेत.
बघा, जर ८० वर्षांचे आजोबा हे करू शकत असतील तर तुम्हीही अशी काही चित्रं काढण्याचा निदान प्रयत्न तरी नक्कीच करू शकता.. अशी चित्रं काढलीत तर आमच्यासोबत शेअर करायला मात्र विसरू नका!!
लेखक : वैभव पारगुंडे