computer

या पठ्ठ्याने तयार केलेली छोटी जीप खऱ्या जीप पेक्षा भन्नाट आहे !!

आपल्यापैकी ज्यांना जुन्या गाड्या चालवायचे हौस असेल त्यांना विली आणि फोर्ड कंपनीने तयार केलेली जीप नक्कीच माहिती असेल. संपूर्ण जगात सैन्यासाठी हीच गाडी वापरली जात असे. अगदी दुसऱ्या महायुद्धातसुद्धा या गाडीचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला होता. भारतात अगदी गेल्या काही वर्षांपर्यंत या गाडीची चांगलीच क्रेझ होती. सैन्यच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकदेखील या गाडीचे शौकीन आहेत आणि मोठ्या प्रमाणावर ही गाडी वापरली जाते. दणकट बांधणी आणि आकर्षक डिझाईन हे जीपचं वैशिष्ट्य. त्यामुळं डोंगरात चालवा किंवा खड्ड्यात घाला, ही आपली चार पायांवर उभीच असते. हे सगळं खरं, पण सध्या ही जीप वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. केरळमधल्या एका तरुणाने आपल्या दहा वर्षाच्या लहान मुलासाठी हुबेहूब जीपची गाडीची प्रतिकृती तयार केली आहे. नक्की काय घडलंय हे तर जाणून घेऊयात ...

केरळमध्ये वास्तव्यास असणार्‍या अरुण कुमार यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या दहा वर्षाच्या मुलासाठी विले जीपसारखीच हुबेहूब दिसणारी जीप तयार केली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ही जीप आपल्या नेहमीच्या जीपसारखीच चालवतासुद्धा येते. अरुणकुमारना ही गाडी तयार करण्यासाठी तब्बल सात महिने लागलेत.

असं काही घडतं तेव्हा महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा लगेच ट्विट करतात. यावेळीही ते मागे राहिले नाहीयेत. यांनी आपल्या ट्विटरवर अरुणकुमार आणि त्याच्या गाडीचा व्हिडिओ पोस्ट करत त्याचं अभिनंदन केलं आहे. त्यांना अरुणकुमारने तयार केलेली ही गाडी प्रचंड आवडलीय.

असं म्हणतात की अरुणकुमारने तयार केलेली ही गाडी मल्याळम चित्रपट लुसिफरपासून प्रेरित आहे. तसं या गाडीचं संपूर्ण वजन ७५ किलो आहे आणि ती चक्क आपल्या वजनाच्या दुप्पट वजन लीलया पेलू शकते. ही गाडी अरुणकुमारने फावल्या वेळात तयार केली आहे म्हणजेच यासाठी त्याने आपलं काम मुळीच थांबवलं नाही.

अशा प्रकारची हुबेहूब प्रतिकृती असणारी गाडी तयार करण्यासाठी अरुणकुमारने  यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. या गाडीचे सर्व स्पेअर पार्टस, गाडीचे चासिस ते इतर सर्व गाडी तयार करण्यासाठी लागणारे पाईप्सदेखील त्यांनी स्वतः मेहनत करून तयार केलेले आहेत. या गाडीचा बेस तयार करण्यासाठी त्याने त्रिकोणी आकाराचे लोखंडी पाइप्स तयार केलेले आहेत. या संपूर्ण गाडीचा सांगाडा लोखंडी आहे, लोखंडा बतच इतरही अनेक धातू यामध्ये गरजेनुसार वापरलेले आहेत. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे या गाडीचं छत हे कापडी आहे. त्यामुळे आवश्यकता पडल्यास ते अगदी सहजपणे काढता येतं.

ही गाडी तयार करण्यासाठी आपल्या घरगुती इलेक्ट्रिक मोटरला लागते इतक्या पॉवरची म्हणजे २४ वोल्ट पावरची बॅटरी वापरण्यात आलेली आहे. या गाडीत रिव्हर्स, न्यूट्रल आणि फॉरवर्ड गिअरसुद्धा आहेत. या गिअरमुळे तर आपल्याला मूळ कंपनीनेच लहान जीप तयार केली आहे का असा आभास होतो. यात वापरण्यात आलेलं इतर साहित्य म्हणजेच चेन, स्प्रॉकेट सिस्टम, इत्यादी. स्पेअर आणि पार्ट्सदेखील चांगल्या दर्जाचे वापरण्यात आलेलं आहे.

गिअरसोबत या गाडीत खऱ्या गाडीमध्ये वापरण्यात येणारं लिफ स्प्रिंग सस्पेन्शन मेकॅनिझमदेखील वापरण्यात आलेलं आहे. या मेकॅनिझममुळे गाडी अत्यंत आरामदायी झालीय आणि खड्ड्यांचा त्रासच जाणवत नाही. ही गाडी बनवताना अरुणकुमारने लहानसहान गोष्टींचादेखील खूप विचार केलेला आहे असं दिसतं. त्यामुळेच सर्व प्रकारच्या चारचाकी गाड्यांमध्ये आढळणारं रॅक आणि स्टेरिंग सिस्टिम या गाडीतही आपल्याला बघायला मिळेल.

या गाडीला एलईडी हेडलाईटतर आहेतच, पण धुक्यात गाडी चालवता यावी म्हणून एलईडी फॉग लाईटसुद्धा वापरण्यात आलेली आहे. या गाडीत तुम्हांला नेह्हमीच्या गाडीमध्ये बघायची सवय असते त्या सर्व गोष्टी म्हणजे इंडिकेटर, ऍडजेस्ट करता येतील असे आरसे, वायपर, हॉर्न, मोबाईल चार्जिंग सॉकेट, फर्स्ट एड बॉक्स, यूएसबी मेमरी कार्ड सॉकेट आणि इतरही अनेक सोयीसुविधा मिळतील. या गाडीत अगदी स्पीडोमीटर देखील बसवण्यात आलेला आहे .परंतु एवढा लहान स्पीडोमीटर न बनवता अरुणकुमार यांनी रॉयल एनफिल्ड या दुचाकी गाडीचा ॲनालाॅग स्पीडोमीटर या गाडीत बसलेला आहे.

आनंद महेंद्र यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये बोलताना अरुण कुमार म्हणतात की त्यांनी या गाडीतल्या बऱ्याच गोष्टी स्वतः डिझाइन केलेल्या आहेत. कारण एवढ्या लहान आकाराचे स्पेअर पार्टस् बाजारात कुठेच उपलब्ध नाहीत. यासोबतच त्यांनी या गाडीसाठी एक स्वतंत्र लहान आकाराचे टूलकिटदेखील तयार केलेलं आहे. हे टूल किट गाडीच्या समोरच्या सीटच्या खाली फिट केलेलं आहे. जेणेकरून ज्यावेळी आवश्यकता असेल तेव्हा या टूलकिटच्या साह्याने गाडीचं पॅनल उघडून त्याची दुरुस्ती करता येऊ शकेल.

हा व्हिडीओ पोस्ट करत असताना आनंद महिंद्रा यांनी अरुणकुमार यांचं कौतुक केलं आहे. अरुणकुमार यांनी पूर्वी आपल्या मुलीसाठी एक लहान ऑटोरिक्षा देखील तयार केली होती. तेव्हापासूनच ते चर्चेत होते आणि त्यांनी आता मुलासाठी ही जीपदेखील तयार केली आहे.

ह्या गाडीवर किती खर्च झालेला आहे हे मात्र अरुणकुमारनी सांगितलेलं नाही. परंतु अशा प्रकारची हुबेहूब गाडी तयार करण्यासाठी भरपूर खर्च आला असणार एवढं मात्र नक्की.

 

लेखक : रोहित लांडगे

सबस्क्राईब करा

* indicates required