इयान कारडोझो : भारतीय सैन्याच्या या अधिकाऱ्याने स्वतःचाच पाय कापून टाकला होता!!
आपल्या प्रिय देशासाठी शत्रूसोबत प्राणपणाने लढणार्या शुर सैनिकांचे अनेक पराक्रमी किस्से आपण ऐकत असतो मंडळी. जवानांच्या या वीरगाथा प्रत्येक देशभक्तासाठी प्रेरक ठरतात. असाच एक रोमांचित करणारा किस्सा आहे मेजर जनरल इयान कारडोझो यांचा... <\p>
१९७१ च्या भारत-पाकिस्तान युध्दादरम्यानची ही घटना आहे. त्यावेळी इयार कारडोझो हे गोरखा रेजिमेंटच्या ५व्या बटालीयनचे मेजर होते. युध्दात शत्रूने लपवलेल्या भुसुरूंगावर पाय पडल्यामुळे स्फोट होऊन इयान गंभीररीत्या जखमी झाले. तात्काळ वैद्यकीय उपचारांची आणि वेदनाशामक औषधांची गरज असतानाही ते न मिळाल्यामुळे जखमी इयान यांनी कुकरीने चक्कं आपला पाय कापून वेगळा केला! विचार करा हा प्रसंग त्यांच्यासाठी कीती वेदनादायक असेल! कुकरीने पाय कापल्यामुळे त्यांच्या शरिरात विष पसरण्याचा धोका होता. त्यांची सर्जरी करणंही अत्यावश्यक होतं. त्यामुळे त्यांची सर्जरी युध्दात पकडल्या गेलेल्या मोहम्मद बशीर नावाच्या एका पाकिस्तानी डॉक्टरडून केली गेली. पण सर्जरीदरम्यान पाकीस्तानी रक्त न चढविण्याची अट मेजर इयान यांनी घातली होती. त्याचबरोबर पाकीस्तानी डॉक्टर कडून सर्जरी करवून घेण्यासाठीही त्यांची मनधरणी करावी लागली.
कहाणी इथेच संपत नाही मंडळी. सर्जरी केल्यानंतर इयान यांनी शरिराला एक लाकडी पाय बसवून घेतला. पण विकलांग असल्यामुळे सैन्याने त्यांना बढती द्यायला नकार दिला. या लाकडी पायासोबतही अनेक कठीण कामं ते लीलया करायचे. स्वतःला तंदुरुस्त सिद्ध करण्यासाठी ६००० फुट उंचावर असलेलं हेलीपॅड त्यांनी पायी चढून गाठलं! मेजर इयान यांच्या सामर्थ्याची परिक्षा तत्कालीन सेनाप्रमुख, जनरल टि. एन. रैना यांनीही घेतली. लडाख मधल्या धोकादायक बर्फाच्छादित टेकड्यांवर त्यांना चालवलं गेलं, आणि यातही ते उत्तीर्ण झाले! त्यानंतर त्यांना सेनेकडून बढती मिळाली. भारतीय सेनेचे ते पहिले असे अधिकारी आहेत, ज्यांनी विकलांग असुनही मेजर जनरल पद मिळवलं...
बिकट परिस्थितीसमोर न झुकता देशासाठी आपलं सर्वस्व झोकून देणार्या या या शुर सैनिकाला आपण सलाम करूया....