स्वदेशी चळवळीच्या तीन कथा भाग १ : पैसा फंड ग्लास वर्क्स
मंडळी, आज आम्ही तुम्हाला इतिहासात थोडं मागे घेऊन जाणार आहोत. देशात मेक इन इंडियाचे वारे वाहत आहेत आणि भारतात तयार झालेल्या मालाला महत्व येत आहे. २०१४ साली मेक इन इंडियाची चळवळ भारतात सुरु झाली. पण आपल्याला कदाचित माहित नसेल, की स्वदेशी बनावटीची ही कल्पना तब्बल १०० वर्ष जुनी आहे. या स्वदेशी चळवळीच्या तीन कथा आपण वाचणार आहोत. त्यातील पहिली कथा अशी :
पैसा फंड ग्लास वर्क्स
तो काळ होता स्वदेशी आंदोलनाचा. परदेशी मालाच्या विक्रीतून इंग्रज आपले खिसे भरत असताना रत्नागिरीसारख्या लहानश्या भागातून आलेल्या एका व्यक्तीने आपल्याच देशातील पैसा वापरून स्वदेशी माल तयार करण्याची कल्पना पुढे आणली. ही व्यक्ती होती 'अंताजी दामोदर काळे'.
लोकमान्य टिळक आणि अंताजी यांच्या प्रयत्नातून लोकांमध्ये स्वदेशीची भावना जागृत होऊ लागली. बघता बघता अंताजींनी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून जवळ जवळ ५०,००० पर्यंत रोख रक्कम जमा केली. ‘कमवा आणि शिका’ या कार्यक्रमांतर्गत लोकांकडून जमवलेला पैसा रोजगार तयार करण्यासाठी केला गेला. यातून एका लहान ग्लास मेकिंग युनिटची स्थापना झाली आणि पुढे ३ वर्षांनी या युनिटचे रुपांतर पहिल्या भारतीय ग्लास कंपनीत झाले. कंपनीची उभारणी जनतेकडून आलेल्या एक-एक रुपयाने झाली असल्याने याचे नाव देखील तसेच ठेवण्यात आले : ‘पैसा फंड ग्लास वर्क्स’.
अंताजी काळे आणि ईश्वरदास वार्श्ने हे भारतीय ‘पैसा फंड ग्लास वर्क्स’’ चे जनक मानले जातात. ही कल्पना म्हणजे त्यावेळची क्राउडफंडिंगची अगदी लहान सुरुवात होती. या पैशातून त्यांना संपूर्ण भारतीय बनावटीचा माल तयार करायचा होता. ही कल्पना तेव्हा लोकमान्य टिळकांना एवढी आवडली होती की त्यांनी ‘केसरी’ मधून यावर लेख लिहिले आणि लोकांना या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले.
आपल्याला वाटू शकतं की ही कंपनी काळाच्या ओघात बंद पडली असावी. पण नाही, पैसा फंड ग्लास वर्क्स आजही तळेगाव येथे कार्यरत आहे. आजही रेल्वे मार्गावर आपल्याला जे सिग्नल दिसतात त्यावर लावण्यात येणारी काच ही याच कंपनीतून तयार होते. या प्रकारची काच तयार करणारी पैसा फंड ही एकमेव कंपनी आहे. त्याशिवाय पूर्वी ‘विक्स बाम’ ज्या काचेच्या बाटलीतून यायचा ती बाटलीसुद्धा याच कंपनीत तयार व्हायची.