आईसलँडने गमावलेली हिमनदी अख्ख्या जगासाठी धोक्याची घंटा का आहे ?
महापुरुषांच्या नावावर किंवा ऐतिहासिक घटनांच्या आठवणीत स्मारक बांधण्याची प्रथा आहे, पण पहिल्यांदाच एका हिमनदीच्या आठवणीत स्मारक बांधण्यात आलंय. त्याचं कारण आपल्या सगळ्यांनाच विचारात पाडणारं आहे.
आईसलंडने इतिहासात पहिल्यांदाच जागतिक तापमान वाढीमुळे संपूर्ण हिमनदी गमावली आहे. या हिमनदीचं नाव होतं Okjukull. Okjukull चा अर्थ होतो "Ok glacier".
१८९० साली Okjukull हिमनदी १६ चौरस किलोमीटर भागात पसरली होती. २०१२ साली हे क्षेत्रफळ कमी होऊन केवळ ०.७ चौरस किलोमीटर उरले आहे. आता तर या हिमनदीला मृत घोषित करण्यात आलंय.
संपूर्ण जगाला जागतिक तापमान वाढीबद्दल समजावं म्हणून या हिमनदीच्या स्मरणार्थ नुकतंच स्मारक उभारण्यात आलंय. यावेळी आईसलँडचे जवळजवळ १०० नागरिक Okjukull हिमनदीपर्यंत गेले होते. कविता, भाषणे आणि मृत व्यक्तीला भेटायला आल्यावर जी शांतता असते तशी शांतता तिथे होती.
या स्मारकावर लावण्यात आलेली पाटी फार महत्वाची आहे. त्यावर लिहिलंय - “भविष्यासाठीचे पत्र”.
आईसलंड मधली ही घटना फक्त आईसलँड पुरती मर्यादित नाही. एका अहवालानुसार पुढील २०० वर्षात जवळजवळ सगळ्याच हिमनद्या लुप्त होतील. जगात १,९८,००० हिमनद्या आहेत. त्यातील तब्बल ९००० एकट्या भारतात आहेत. हिमालय विरघळला तर काय होईल याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो.