जाणून घ्यायचंय मेक्सिकोच्या राजदूत भारतात कोणतं वाहन वापरतात?
ओला आणि उबरच्या आगमनानंतर रिक्षावाल्यांच्या मुजोर धोरणाला वैतागून बहुतेक भारतीय एसी कारने प्रवास करणं पसंत करत असताना मेक्सिकोच्या भारतातील राजदूत मेल्बा प्रिया दिल्लीत ऑटोरिक्षाने प्रवास करत आहेत. विश्वास बसत नाही ना?
मेल्बा राजदूत बनण्याआधीही भारतात आल्या होत्या आणि त्यांनी इथे रिक्षाने पुष्कळ प्रवास केला होता. रिक्षा हे व्यावसायिक वाहन असल्याने ते खरेदी करण्यासाठी मेल्बा प्रियांना परराष्ट्र मंत्रालयाकडून खास परवानग्या घ्याव्या लागल्या. इतकंच नाही तर त्यांच्या चालकाला रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण घ्यावे लागले. पार्लमेंटच्या परिसरात आणि पंचतारांकित हॉटेलांत या रिक्षाला प्रवेश नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. तरीही भारतात जनसामान्यांकडून वापरल्या जाणार्या वाहनासच त्या पसंती देतात.
मेल्बा प्रियांच्या या रिक्षाला राजदूतांच्या वाहनाची निळी नंबरप्लेट आहे आणि मेक्सिकोमधल्या एका कलाकाराने तिची रंगरंगोटी केली आहे. दिल्ली हे अत्यंत प्रदूषित शहर असले तरी रिक्षानेच प्रवास करणार्या मेल्बांच्या साध्या राहणीने एक चांगला वस्तुपाठ घालून दिला आहे.