अस्सा रेडा सुरेख बाई !!!

Subscribe to Bobhata

काय मंडळी तुम्हाला तुमच्या पालकांनी टोणगा-हेला-रेडा या नावानी तुमचा अनेक वेळा गौरव केला असेलच आणि म्हणून तुम्ही काही बदललात असे ही नाही. पण आज  तुमच्या कुलोत्पनांची आम्ही जी माहिती तुमच्या समोर ठेवतो आहे ती वाचून तुमची कॉलर 'टाईट्ट' झाल्या शिवाय राहणार नाही.

सोबतच्या विडीओत दाखवलेला रेडा मुर्रा जातीचा आहे. मुर्रा ही म्हशीची एक खास जात आहे .भारतात हरयाणाच्या मोजक्या  काही जिल्ह्यातच -रोहतक, जींद-हिस्सार -झाझर -फतेहाबाद -गुरगाव -मध्ये मुर्राची पैदाईश केली जाते. या जातीच्या म्हशी सर्वसाधारणपणे दिवसाला १६ लिटर दूध  देतात. २०१६ साली राणी नावाच्या एका म्हशीने दिवसाला २६ लिटर दूध देऊन एक उच्चांक प्रस्थापीत केला आहे. आता तुम्ही विचारालच की म्हशींचं ठीकच आहे हो पण आम्हा टोणग्यांचं काय ?

सांगतो सांगतो. मुर्रा जातीचे टोणगे फक्त त्यांच्या वीर्य संकलनासाठी पाळले जातात आणि मुर्रा रेड्याचे मालक या विर्यावर लाखो रुपये कमावतात. अर्थात असे वीर्य तयार होण्यासाठी देखभाल सुद्धा तशीच केली जाते. (हे तुमच्या पालकांच्या नजरेस जरूर आणून द्या बरं !!)

त्यांची नावं पण छान छान ठेवली जातात. अगदी क्रिकेटरची नावं पण दिली जातात. आपण बघू या युवराज नावाच्या रेड्याचा दिनक्रम !!!

युवराजला दिवसातून पाच वेळा आंघोळ घातली जाते. पाच वेळा त्याचा खरारा केला जातो. दिड दोन लिटर तेल प्यायला दिले जाते. कडब्या सोबत २० लिटर दूध-१० किलो सफरचंद खायला घालून, पाठीवर थाप मारून, पाठ रगडून दिवसभर कौतुक केले जाते. हे सगळं केलं की वीर्याची मात्रा आणि किंमत वाढणारंच ना राव !

 

हे सगळं सांगा तुमच्या पालकांना आणि बघा तुमची किंमत काही वाढते का ?

सबस्क्राईब करा

* indicates required