वाचा मटण सूपमुळे कशी एका खुनाला वाचा फुटली.. कहानी पूरी फिल्मी है!!
क्राईम पेट्रोलमध्ये एक वाक्य असंख्य वेळा म्हटलं जातं, “गुनाह कभी छुपता नहीं !”. अर्थात गुन्हेगार कितीही हुशार असला तरी कधी ना कधी त्याचं गुपित बाहेर येतंच येतं. मंडळी, आज ज्या केसबद्दल आम्ही सांगणार आहोत त्या केसची उकल झाली ती एका मटण् सूपमुळे. थोडी फिल्मी स्टोरी वाटेल, पण खरं आयुष्य देखील कुठल्या फिल्मपेक्षा कमी नसल्यानं ही कथा फिल्मी नसून खरीखुरी आहे.
चला तर वळूयात आपल्या क्राईम स्टोरीकडे!
२७ वर्षांच्या एम. स्वाती हिचं लग्न सुधाकर रेड्डीबरोबर झालं होतं. दोघांना दोन मुलं देखील झाली. ती नागरकॉइल इथं एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होती. तिथं तिचं फिजिओथेरेपिस्ट असलेल्या राजेशबरोबर अफेअर होतं.
या प्रेमप्रकरणातून दोघांनी मिळून सुधाकर रेड्डीचा खून करण्याचा प्लॅन आखला. प्लॅन असा की, सुधाकरला जाळून मारायचं आणि राजेशची प्लास्टिक सर्जरी करून त्याला सुधाकर बनवून घरच्यांसमोर उभं करायचं. सगळं काही प्लॅननुसार झालं.
सुधाकरला अनेस्थेशिया देऊन त्याच्या डोक्यात मारण्यात आलं. त्याचा जीव गेल्यावर त्याला जंगलात नेऊन जाळण्यात आलं. यानंतर राजेशच्या चेहऱ्यावर अॅसिड टाकून त्याला विद्रूप केलं गेलं, जेणेकरून कोणालाही त्याला ओळखता येऊ नये. यानंतर दोघांनी हा एक अज्ञातांकडून झालेला अॅसिड हल्ला होता असं सुधाकरच्या घरच्यांना सांगितलं.
कहानीमें ट्वीस्ट
सगळं काही बरोबर होत असतानाच एकदा नको ते घडलं. राजेश सुधाकर बनून हॉस्पिटलमध्ये भरती झाला होता, त्याच्यावर उपचार चालू होते. हॉस्पिटलमध्ये भाजलेल्या रुग्णांना मटण सूप दिलं जात होतं. हे मटण् सूप घ्यायला राजेशने नाही म्हटलं. ही होती साधीच गोष्ट, पण तिने गोष्टीला वेगळं वळण दिलं. मटण् सूप नाकारण्याचं कारण सुधाकर उर्फ राजेशने असं दिलं की तो शाकाहारी आहे. इथेच सगळा घोळ झाला!!
सुधाकरच्या घरच्यांना शंका येऊ लागली कारण सुधाकर मांसाहारी होता. यावर भरीस भर म्हणजे राजेशच्या वागण्यातून तो सुधाकर असल्याचं कुठूनही दिसत नव्हतं. याच शंकेतून सुधाकरच्या कुटुंबाने पोलिसांना बोलावलं आणि बाकीचं काम पोलिसांनी केलं. या दोन्ही प्रेमी युगुलाने आपला गुन्हा काबुल केला.
स्वातीने आपल्या कबुली जबाबात म्हटलं आहे की तिने एका तेलगु सिनेमातून अशा प्रकारच्या गुन्ह्याची प्रेरणा घेतली होती.
मंडळी तिने हा तेलगु सिनेमा सोडून क्राईम पेट्रोल बघितलं असतं तर तिला असलं काही करण्याची हिम्मतच झाली नसती. काय बोलता?