रंग आधी की फळ ? 'ऑरेंज' नावाबद्दल ही गोष्ट माहित आहे का तुम्हाला ?

इंग्रजीत ऑरेंज हा रंग देखील आहे आणि फळ देखील. आता प्रश्न पडतो, फळाच्या नावावरून रंगाला नाव मिळालं की रंगामुळे फळाला नाव मिळालं ?? हे म्हणजे कोंबडी आधी की अंडं आधी असंच झालं ना भाऊ!! कोंबडी आणि अंड्याच्या बाबतीत शास्त्रज्ञ अजूनही झगडत आहेत, पण ऑरेंजच्या बाबतीत मात्र हे कोडं सुटलेलं आहे.

चला तर आज जाणून घेऊ ऑरेंजबद्दल रंजक माहिती....

मंडळी नारिंगी रंग हा निसर्गात सर्वत्र पाहायला मिळतो. सूर्यास्ताचा रंग असेल किंवा नारिंगी रंगातील फुले असतील.. रंग हा पृथ्वीच्या जन्मापासून आहे. पण गंमत अशी आहे की, इंग्रजीत या रंगाला एक नाव ठराविक कधीच नव्हतं. आज ज्याला आपण ‘ऑरेंज कलर’ म्हणतो तो त्याकाळात  "ġeolurēad" म्हणून ओळखला जायचा. ज्याचा अर्थ होतो पिवळा आणि लाल रंगाचं मिश्रण. 


फळ आधी की रंग आधी ?

संत्रं  हे फळ मूळ आशियाई फळ आहे. त्याला युरोपात पोहोचवण्याचं काम पोर्तुगीजांनी केलं. युरोपात मोठ्या प्रमाणात संत्री मिळू लागल्यानंतर त्याची प्रसिद्धी वाढू लागली. प्रसिद्धीमुळे फळाचं नाव त्याच्या रंगाची ओळख बनला. अशा प्रकारे फळ आधी आणि मग रंग आला.
 

ऑरेंज शब्दाचा थोडक्यात इतिहास :

इंग्रजीत ऑरेंज शब्दाचा उल्लेख पहिल्यांदा १२०० साली झालेला आढळून येतो. त्यावेळी ऑरेंजचा उल्लेख ‘Pume Orenge’ असा केलेला जायचा. Pume Orenge चा अर्थ होतो ‘केशरी सफरचंद’.

इंग्रजीतील ऑरेंज शब्दाचा इतिहास फ्रेंच शब्द ओरेंज, अरेबिक शब्द नारंज ते संस्कृत मधील ‘नारंग’ पर्यंत जाऊन पोहोचतो. असं म्हणतात की संस्कृत शब्द नारंग हा पर्शिया आणि अरबमार्गे इंग्लंडपर्यंत पोहोचला. पण तोपर्यंत ‘नारंग’चा ‘ऑरेंज’ झाला होता. अशाप्रकारे फळ आणि नाव एकत्रच युरोपात आले आणि त्यांना तिथे नवीन ओळख मिळाली.  

तर मंडळी, नारिंगी रंग हा त्या दुर्मिळ रंगांपैकी एक आहे ज्यांना वस्तूंवरून नाव मिळालं.

सबस्क्राईब करा

* indicates required