परमवीरचक्राचे पराक्रमी - भाग १०: शत्रूचे तब्बल १० रणगाडे एकट्याने उडवून लावणारा पराक्रमी वीर 'अरुण खेतरपाल' !!
१९७१ चे भारत पाकिस्तान युद्ध, ज्यात बांग्लादेश पाकिस्तानातून वेगळा होऊन एक स्वतंत्र देश झाला होता. भारताच्या इतिहासातच नाहीतर जगाच्या इतिहासात देखील याचे एक महत्वपूर्ण स्थान आहे. या युद्धात भारतीय सैनिकांनी असामान्य कामगिरी करत पाकिस्तानला पाणी पाजले होते. या युद्धातील महत्वाच्या शिलेदारांपैकी एक होते सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल!!
खेतरपाल यांच्या पराक्रमाची चर्चा केल्याविना १९७१ च्या युद्धाची गोष्ट अपूर्ण आहे. भारत पाकिस्तान युद्धात असामान्य कर्तृत्व गाजवत अरुण खेतरपाल शहीद झाले होते. शत्रूच्या उपस्थितीत त्यांनी दाखवलेल्या शौर्यामुळे त्यांना मरोणोत्तर परमवीर चक्र देण्यात आले होते. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी त्यांना हा सन्मान मिळाला होता.
खेतरपाल इंडियन मिलिटरी अकॅडमीमधून निघाल्याबरोबर भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाले होते. या युद्धात सहभागी होण्याची इच्छा स्वतः अरुण यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती. १६ डिसेंबर १९७१ रोजी प्रचंड भयानक युद्ध सुरू होते. अरुण यात सहभागी झालेले होते. त्यावेळी २१ वर्षांचे तरुण रक्त असलेल्या अरुण यांनी रौद्ररूप धारण करत दणादण शत्रूचे रणगाडे उडवण्यास सुरुवात केली.
अरुण यांना त्याचे सहकारी परत बोलवत असताना देखील ते रणगाडे उडवत उडवत पुढे जात होते. त्यात त्यांना वीरमरण आले. एक दोन नाहीतर तब्बल १० रणगाडे त्यांनी उडवले होते. पाकिस्तानला त्यांनी पुढे सरकू तर दिलेच नाही पण शत्रूला एकट्या खेतरपाल यांना रोखण्यासाठी अजून एक बटालियन बोलवावी लागली होती.
अरुण यांनी उडवलेला शेवटचा रणगाडा हा त्यांच्यापासून १०० मीटर दूर होता. जेव्हा अरुण यांना परत येण्याचा आदेश मिळाला तेव्हा त्यांनी एक संदेश देत रेडिओ सेट ऑफ केला, 'सर माझी बंदूक अजूनही फायरिंग करत आहे, जोवर बंदूक फायरिंग करत राहील, मी फायरिंग सुरू ठेवेन.' शेवटी अरुण शहिद झाले. देशाला मात्र युद्धात विजय मिळाला. याच युद्धात अरुण यांचे वडील ब्रिगेडियर एमएल खेतरपाल हे देखील शत्रूंसोबत लढत होते.
अरुण यांच्या हौतात्म्यानंतर ते ज्या टँकमध्ये बसून लढत होते तो टँक आजही अहमदनगर येथे सुरक्षित ठेवला आहे. एनडीएमध्ये त्यांच्या नावाने परेड ग्राउंड आहे, तर आयएमएमध्ये त्यांच्या नावाने ओडिटोरियम तयार करण्यात आला आहे.
अशा पराक्रमी वीरांच्या कथा वाचल्यावर १९७१ चं युद्ध आपण का जिंकू शकलो याची प्रचीती येते. अरुण खेतरपाल यांच्यासारखे प्राण पणाला लावून लढणारे योद्धे असताना पराभव शक्यच नव्हता. भारतमातेच्या या सुपुत्राला बोभाटाचा सलाम.