परमवीरचक्राचे पराक्रमी - भाग ६: आपल्या शौर्याच्या जोरावर शत्रूसैन्याची दाणादाण उडवणारे रामा राघोबा राणे!!
भारताच्या स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानने प्रत्येकवेळी त्यांच्या वाईट स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी कितीही कारस्थानं रचली आणि वेळोवेळी भारतीय सैनिकांनी त्यांची ती षड्यंत्रं हाणून पाडली आहेत. भारताने पाकिस्तानला वेळोवेळी एवढे तोंडघशी पाडून देखील पाकिस्तानचे मनसुबे कधी सुधारले नाहीत.
पाकिस्तानला धडा शिकविण्यात आपल्या सैनिकांनी कधीच कसर सोडलेली नाही. यांपैकीच एक सैनिक म्हणजे लेफ्टनंट रामा राघोबा राणे!! पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी त्यांना परमवीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते.
रामा राघोबा राणे यांचा जन्म २६ जून १९१८चा. त्यांचे वडील पोलिसात शिपाई होते. वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकत रामा राणे यांनी १९४० साली सैन्यात प्रवेश केला. सर्वात आधी त्यांना २६ वी इन्फंट्री डिव्हिजनच्या इंजिनिअरिंग युनिटमध्ये तैनात करण्यात आले. त्यावेळी हे युनिट बर्मा बॉर्डरवर जपानी सैन्याबरोबर लढत होते.
या युद्धात रामा राणे यांनी असामान्य शौर्य दाखवले. त्यांच्या पराक्रमामुळे त्यांना सेकंड लेफ्टनंट म्हणून कमिशन्ड ऑफिसर बनविण्यात आले. आता त्यांची नेमणूक जम्मू आणि कश्मीरमध्ये करण्यात आली. भारत आणि पाकिस्तान संघर्ष याच काळात उफाळून आला होता. भारतीय सैन्याने त्या संघर्षात नौशेरा भागावर विजय मिळवला होता. विजयामुळे भारताने आक्रमक पवित्रा घ्यायचे ठरवले होते. नव्या रणनीतीनुसार बारवाली, रिज, चिंगास आणि राजुरीवर विजय मिळवण्यासाठी नौशेरा- राजुरी मार्गावरील भौगोलिक अडथळे आणि शत्रूंच्या सुरंगांना साफ करणे गरजेचे होते.
हे काम फत्ते करणे सोपे नव्हते, पण रामा राणे यांनी हे काम शक्य करून दाखवले. त्यांच्या शौर्यामुळे भारताच्या ५० पॅराब्रिगेड आणि १९ इंफंट्री ब्रिगेडने झंझार जिंकून दाखवले. या विजयात रामा राणे यांनी मोठी भूमिका बजावली. त्यांच्या युनिटने रस्त्यातले भूसुरंग नष्ट केले होते. यामुळे आपल्या सैन्याला कितीतरी मदत झाली. रामा राणे यांनी सर्व रणगाडे लढाई क्षेत्रापर्यँत पोहोचतील यासाठी भुसुरंग टाळणारा मार्गदर्शक रस्ता तयार केला. याचा परिणाम म्हणून भारतीय सैन्याच्या हल्ल्यात पाकिस्तानची दाणादाण उडाली. रामा राघोबा राणे यांनी गाजवलेल्या या शौर्यासाठी त्यांना परमवीर चक्र प्रदान करण्यात आले.
संगरी वीराग्रणी जे धैर्यमेरु संकटी, जन्मले या भारती, गाऊ त्यांना आरती!!