जागतिक अब्जाधीशांच्या यादीतला नवा मराठी चेहेरा -पर्सिस्टंट सिस्टम्सचे फाउंडर आणि चेअरमन आनंद देशपांडे

यश, ध्येय हे शब्द माणसाला जगण्याची एक वाट दाखवून देतात. ही वाट चालत राहणे, प्रयत्न करत राहणे हे आयुष्याचे उद्दिष्ट बनल्यानंतर आयुष्याला आपण आपोआप एक अर्थ देत असतो. पर्सिस्टंट सिस्टम्सचे फाऊंडर आणि चेअरमन आनंद देशपांडे यांचा नुकताच अब्जाधीशांच्या यादीत समावेश झाला आहे.
आनंद देशपांडे यांनी १९९० साली त्यांनी पर्सिस्टंट सिस्टिम्सची स्थापना केली होती. तेव्हापासून आजरच्या त्यांच्या ह्या यशाचे रहस्य जाणून घ्यायला बरेच लोक उत्सुक असतील. चला तर जाणून घेऊया आनंद देशपांडे ह्यांच्या आयुष्यातील प्रेरणा, त्यांचा यशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि बरंच काही...
असं म्हणतात की बदल माणसाच्या आयुष्यात स्थिर असतो. अब्जाधीश झाल्यानंतर देशपांडे यांच्या आयुष्यातही बरेच बदल झालेले असणार. चला मग पाहूया आनंद देशपांडे यांच्या आयुष्यात कोणकोणते बदल झाले आहेत..
याबद्दल एका मुलाखती मध्ये सांगिताना त्यांनी सांगितले की, अब्जाधीश झाल्यानंतर मला ओळखणाऱ्या लोकांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी भेटलेली माणसे येऊन आपण अमक्या ठिकाणी भेटलो होतो, ह्या गप्पा केल्या होत्या हे सर्व आठवणीने सांगत आहेत. बाकीचे काही म्हणावे तसे बदलले नाहीये. यश मिळणे ही आंनदाची गोष्ट असतेच. पण प्रत्येक सफलता स्वतःसोबत एक जबाबदारी घेऊन येते. आता ह्या यशाच्या स्थिरतेसाठी प्रयत्नशील राहावे लागणार आहे. जर शेअर्सच्या किमतीमध्ये थोडा जरी फरक पडला, तरी कमाई १ बिलियन डॉलर वरून ९०० मिलियन डॉलर वर येऊ शकते.
आज आंनद देशपांडे यांचे वय ५९ आहे. आजवर देशपांडे यांनी आपल्या संपूर्ण करियरमध्ये इतरही अनेक मोठी पदे भूषवली आहेत. ते फक्त पर्सिस्टंट सिस्टम्स ते फाउंडर नसून ते एक उद्योजक, चेअरमन, मार्गदर्शक तसेच भारतीय सॉफ्टवेअर इंडस्ट्रीचे थिंक टँक असलेल्या iSPIRIT चे संस्थापक सदस्यही आहेत. देशपांडे आयआयटी खड्गपूर आणि अमेरिकेतल्या इंडियना युनिव्हर्सिटीचे माजी विद्यार्थी आहेत. खडगपूरमधून त्यांनी कम्प्युटर सायन्स मधून इंजिनिअरिंग केले. आणि इंडियाना युनिव्हरसिटीमधून कम्प्युटर सायन्स शाखेतच MS आणि नंतर पीएचडी केली आहे.
१९९० साली पर्सिस्टंट सिस्टिम्सची स्थापना करण्याआधी देशपांडे हेवलेट पॅकर्ड लॅबोरेटरीज या कंपनीत (HP Laboratories Palo Alto) पालो अल्टोमध्ये काम करीत होते. सद्य परिस्थिती लक्षात घेता देशपांडे यांच्या म्हणण्यानुसार कम्प्यूटर प्रोग्रॅमिंग करण्यापेक्षा आपल्या आयुष्याचे प्रोग्रामिंग कसे करावे ह्या क्षेत्रास खूप स्कोप असणार आहे. कारण जग इतक्या वेगाने पुढे जात आहे त्यामुळे माणसांनी जगणं शिकलं पाहीजे. AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सने सध्या संपूर्ण जगावर राज्य करण्यास एक प्रकारे सुरुवात केलेली आहेच. त्यामुळे पुढे जाऊन life programming ला स्कोप येणे साहजिक आहे. असं म्हणतात, काळाच्या पुढे जाऊन जे विचार करू शकतात ते जगात क्रांती घडवून आणण्यासाठी कारणीभूत ठरतात. मग ही क्रांती फक्त रणांगणात युद्ध करून होत नाही, तर टेक्नॉलॉजी रुपी क्रांतीही मनुष्याचे आयुष्य नक्कीच काही अंशाने समृद्ध करत असते.
आनंद देशपांडे यांचा पर्सिस्टंट मधील प्रवास थोडक्यात :
१९९० पासून म्हणजेच ३० वर्षापूर्वी ते फक्त मॅनेजमेंटचा भाग होते. आता त्यांच्याकडे कंपनीचे मालकी हक्क आहेत. लोकांसाठी तसेच देशासाठी काहीतरी करण्याच्या प्रेरणेने त्यांची अनेक चांगले उद्योजक निर्माण करायची इच्छा आहे. तसेच त्यांनी आता एक कॅन्सर प्रोजेक्ट चालू केला आहे. त्यामध्ये ते DeAsra फाउंडेशन मध्ये काम करीत आहेत. त्यांचे काम अगदी उत्तमरित्या चालू आहे आणि देशातील नागरिकांचे आयुष्य उत्तम बनवण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार येत्या आणि आठ ते दहा वर्षात त्यांनी केलेल्या कामाचे चांगले परिणाम दिसतील.
२०११ मध्ये मार्क अन्ड्रीसेंन यांनी एक सॉफ्टवेअर इंडस्ट्रीबद्दल एक टीकास्पद वक्तव्य केले होते. ह्यावर आपले मत मांडताना देशपांडे यांनी डिजिटल परिवर्तनाला पाठिंबा देऊन मशीन लर्निंग हा नवीन विषय शिकण्यावर भर देण्यास प्राधान्य दिले होते.
भविष्यात कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करण्यावर आपला भर असेल ह्या प्रश्नावर त्यांचे मत :
भारतासारख्या विकसनशील देशांनी बायोलॉजी रिव्होल्युशन्सला पाठिंबा देणे गरजेचे आहे असे त्यांचे म्हणणे आहे. बायोलॉजी या विषयाशी संबंधित जेनेटिक्स, जिनोमिक्स, सिंथेटिक बायोलॉजी, न्यू मटेरियल्स, न्यूरोसायन्स या सर्व गोष्टींना भविष्य असणार आहे असे ते म्हणतात. त्यामुळे प्रोग्रामिंग हा विभाग सोडून बायोलॉजीमध्ये नवीन बिझनेस करण्यावर मी भर देईन. असे त्यांचे म्हणणे आहे.
आनंद देशपांडेंचे या यशाबद्दल अभिनंदन आणि उत्तरोत्तर प्रगतीसाठी त्यांना बोभाटाकडून शुभेच्छा!!