खुन्नस काढावी तर अशी!! बघा काय केलं या रशियातील माणसाने
सरकारी कारभारावर डोकं पेटावं असे चार अनुभव तरी दिवसाकाठी प्रत्येकाच्या वाट्याला येतात. स्टेट बँकेत तर लोकं गेल्या जन्माची पापं फ़ेडायला जातात म्हणे!
सरकारी हापीसातून एखादा इसम हसत बाहेर पडला तर त्याला तातडीने डॉक्टरकडे घेऊन जातात असंही म्हणतात म्हणे! पण हे अनुभव फ़क्त आपल्याच देशात येतात असं नाही , थोडया फार फरक असे, पण सगळ्याच देशात सरकारी कचेरी म्हणजे शहाण्या माणसाला वेड लावणारच!
अपवाद काही माणसांचा जी कायदा न मोड़ता पुरेपुर खुन्नस काढतात. सोव्हिएत रशियाच्या किरोव शहरातील एक घटना आहे. एका माणसाला इन्शुरन्सच्या मामल्यात ६१६ पाऊंडाचा दंड आकारण्यात आला. रशियातली फेडरल बेलीफ़ सर्विस वसूलीसाठी त्याच्या मागे लागली. त्याच्या तगाद्याला कंटाळून या इसमानं वेगळ्याच पध्दतीने खुन्नस काढली. ६१६ पाउंड म्हणजे ४६,७०० रूबल इतकी रक्कम घेऊन तो भरणा करायला कचेरीत गेला.आता इथं 'कहानीमें ट्विस्ट ' आहे. ४६७०० रूबल तो कोपेक या छोट्यात छोट्या नाण्यांत घेऊन गेला. आठ दहा गोणीतून तब्बल ४६७०००० चिल्लर त्यानं जमा केली. सेहेचाळीस लाख सत्तर हजार नाणी सरकारी कर्मचारी मोजेपर्यन्त हा गृहस्थ मजा बघत बसून राहीला!!
खुन्नस काढायची ही शक्कल तुम्हालाही आवडली असेल तर आजच चिल्लर गोळा करण्याच्या मागे लागा! अहो, का म्हणून का विचारता? आपल्याला स्टेट बँकेत जायचंय ना????