शनिवार स्पेशल : तब्बल १२०० फोन्सचा मालक...'नोकिया मॅन' जयेश काळे !!
राव, आज शनिवार स्पेशल मध्ये भेटूया ठाण्याच्या ‘जयेश काळेला’. त्याला नोकिया मॅन म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण त्याच्याकडे तब्बल १२०० पेक्षा जास्त नोकिया फोन्स आहेत. त्याच्या नोकिया संग्रहामुळं त्याचं नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदलं गेलंय. चला तर आज नोकिया फोनचं कलेक्शन पाहूया.
त्याचं हे नोकिया प्रेम कधी सुरु झालं ?
कॉलेजमध्ये असताना एकदा जयेशचा फोन दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला. पडल्यानंतर अर्थातच फोनची बॅटरी बाहेर निघाली होती. ती त्यानं व्यवस्थित लावल्यानंतर फोन पुन्हा पूर्वीसारखा चालू झाला. दुसऱ्या मजल्यावरून पडूनदेखील फोन पूर्वीसारखाच चालत असलेला बघून त्याला आश्चर्य वाटलं. मंडळी, ज्यांच्याकडे पूर्वी नोकिया फोन होते त्यांनासुद्धा असा अनुभव नक्कीच आला असणार. नोकिया फोन त्याच्या टिकाऊपणामुळंच प्रसिद्ध होते.
जयेशनं पुढे नवीन नोकिया फोन घेतला. पण जुना फोन त्यानं सांभाळून ठेवला. तो अशाच प्रकारे तिसरा, चौथा, पाचवा नोकिया फोन घेत गेला आणि बघता बघता त्याच्याकडे तब्बल २० फोनचं कलेक्शन जमलं. हे त्याच्या ध्यानात आल्यानंतर त्यानं नोकिया फोन जमवायला सुरुवात केली. आज त्याच्या संग्रहात नोकियाचे अनेक दुर्मिळ फोन आहेत. यात nokia 9000i चा सुद्धा समावेश होतो. nokia 9000i हा फोन भारतातल्या खूप कमी लोकांकडे आढळतो.
मंडळी, नोकिया फोनशिवाय जयेशकडे बॅटरी, चार्जर, हेडफोनचासुद्धा संग्रह जमलाय. फोन आणि त्याच्याशी निगडीत वस्तू सोडून त्याच्याकडे ‘हॉट व्हील्स’ कार व जुन्या नोटांचा संग्रहदेखील आहे. या सगळ्या संग्रहानं त्याची खोली भरून गेलीय.
एवढं कलेक्शन तो सांभाळतो कसा ?
राव, त्यानं घरातल्या कोणत्या कोपऱ्यात फोन ठेवलेला नाही हे विचारा. घरातला एकही कानाकोपरा सोडलेला नाही. घरात जागा नसल्यानं त्याने ४०० फोन्स कारच्या डिक्कीत ठेवलेत. याकारणानं त्याला अनेकदा अडचणींना सामोरं जावं लागलं आहे. कारमध्ये इतके मोबाईल असल्यानं सुरक्षा तपासणीच्या वेळी त्याला अनेक प्रश्न विचारले जातात.
तो बरेच फोन परदेशातून मागवत असल्यानं कस्टम डिपार्टमेंटने एकदा त्याची चौकशी केली होती. चौकशीत त्यानं आपल्या आवडीविषयी सांगितलं व लिम्का रेकॉर्ड्सचं प्रमाणपत्र सादर केलं, तेव्हा जाऊन त्याची सुटका झाली.
पुढे काय ?
लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सनंतर त्याचं लक्ष वर्ल्ड रेकॉर्डवर आहे. सध्या सर्वात जास्त फोन असल्याचा जागतिक विक्रम १६०० आहे. जयेशला आपला संग्रह वाढवायचा असून हा आकडा पार करायचा आहे. आम्ही बोभाटाच्या वाचकांना एक आवाहन करू इच्छितो. जर तुमच्याकडे नोकियाचे जुने फोन असतील तर तुम्ही जयेशशी संपर्क साधून त्याला मदत करू शकता. कदाचित तुमच्याकडे असलेला फोन जयेशच्या कलेक्शनमध्ये नसेल. आणि हो, याचा योग्य मोबदला सुद्धा दिला जाईल.
मंडळी, तुम्हाला प्रश्न पडू शकतो की जयेशला फोनचं कलेक्शन करण्याची आवड आहे पण मग पोटापाण्याचं काय ? तुम्हाला आश्चर्य वाटेल पण जयेश 'मिरम इंडिया' या डिजिटल एजन्सी मध्ये क्रियेटीव्ह हेड आहे. जयेश आणि त्याच्या टीमने बनवलेल्या ब्लड बँकिंग या संकल्पनेला आंतरराष्ट्रीय कान्स सिल्व्हर मिळाले आहे. त्याने कामासोबतच आपली आवड जपलेली आहे. त्याच्या या वेगळेपणामुळे त्याच्या संपूर्ण कुटुंबाला त्याचा अभिमान वाटतो.
तर मंडळी ही होती जयेशची गोष्ट. तुमच्याकडे सुद्धा असंच भन्नाट कलेक्शन असेल तर आम्हाला जरूर मेसेज करा.