मागे-पुढे कुठंही बसा पण सीटबेल्ट लावलाच पाहिजे- वाचा कायदा काय सांगतो
कारने मुंबई पुणे प्रवास करताय ? मग सीटबेल्ट लावायला विसरू नका. फक्त गाडी चालवणाऱ्याने नाही तर सर्व प्रवाश्यांनी सीटबेल्ट पाहिजेत. तसा नियम आलाय ना राव !! नियम मोडल्यास चालकासहित प्रवाशांना पण दंड भरावा लागेल. बघा तर काय आहे हा नियम.
यापूर्वी हा नियम चालकाला लागू होता. पण आता सर्व प्रवाशांनी सीटबेल्ट लावणं आवश्यक आहे. अभ्यासकांच्या मते मागच्या प्रवाश्यांनी सीटबेल्ट लावलेली नसेल तर त्यांच्या आणि चालकाच्या जीवाला मोठा धोका उद्भवू शकतो. दुर्दैवाने कधी अपघात झालाच तर मागील प्रवासी पुढे फेकले जातात, त्यांच्या धक्क्याने चालक डॅशबोर्डवर आदळतो तर स्वतः प्रवाशी पुढच्या काचेला जाऊन धडकतात. त्यामुळे सीटबेल्ट लावणं प्रवाश्यांच्याच हिताचं आहे भाऊ.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष पोलीस दलाच्या २ टीम्सवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महिनाभरापूर्वी या पोलीस दलाचं काम होतं की प्रवाशांना सीटबेल्ट लावण्याची सूचना देणे. पण मागील २ आठवड्यांपासून प्रवाशांवर दंडात्मक कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्या चालकास २०० रुपये दंड तर प्रत्येक प्रवाश्याला ५० रुपये दंड भरावा लागतोय. अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक रश्मी शुक्ला यांनी पुढाकार घेऊन हा नियम सुरु केला आहे.
सर्व कार्स मध्ये सीटबेल्ट्स नसतात मग अशा प्रवाशांना दंड बसणार का ?
हा नियम सर्व कार्सवर लागू होणं शक्य नाही. जर कार मध्ये ५ लोकांसाठी जागा असेल तर मधल्या प्रवाशाला सीटबेल्ट नसते. अशावेळी मध्ये बसणाऱ्या प्रवाशाला हा नियम लागू होत नाही. याखेरीज ९० च्या दशकातल्या कार्समध्ये सीटबेल्ट्स नसल्याने त्यांनाही हा नियम लागू पडत नाही.
तर मंडळी, जर तुम्ही मुंबई पुणे प्रवास करत असाल आणि तुम्हाला ‘गाडी साईडला घ्या’ असा आवाज ऐकायचा नसेल तर सीटबेल्ट लावायला विसरू नका !!