computer

या दोन प्रसंगांत पाकिस्तानने भारतासमोर हार मानली...आयएसआय प्रमुखांनी केलं कबूल !!

माजी आयएसआय प्रमुख ‘मोहम्मद असद दुर्रानी’ यांचं पुस्तक ‘द स्पाय क्रॉनिकल्स : रॉ, आयएसआय अँड द इल्युजन ऑफ पीस’ भारत पाकिस्तान संबंधांवर मोठा प्रकाश टाकतं. यात अनेक वादग्रस्त गोष्टी आहेत. पण यात काही महत्वाचे खुलासेसुद्धा केले गेलेत. यात उल्लेखलेला एक कबुलीजबाब भारतासाठी महत्वाचा आहे भाऊ.

मोहम्मद असद यांनी पुस्तकात एक खुलासा करताना म्हटलंय की आम्ही भारतासमोर २ प्रसंगांमध्ये हार मानली. हे प्रसंग म्हणजे १९६५ आणि १९७१ चं युद्ध. मंडळी, चला जाणून घेऊ या दोन युद्धांत असं काय घडलं की पाकिस्तानने पराभव पत्करला !!

१९६५ चं युद्ध

काश्मीर मिळवण्यासाठी पाकिस्तानने डाव आखला होता. काश्मीरमध्ये हिंसा भडकवून हा एक प्रकारे काश्मिरी लोकांचा उठाव आहे असं दाखवण्याचा हा प्लॅन होता. एकदा का काश्मीरमध्ये अंदाधुंदी माजली की पाकिस्तान काश्मीर गिळणार होतं. पण ह्या योजनेच्या तर चिंध्या झाल्याच, पण त्याचबरोबर  भारताने पाकिस्तानला मोठं सरप्राईज दिलं. भारताने आश्चर्यकारकरीत्या पूर्व पाकिस्तानवर हल्ला केला आणि थेट लाहोरपर्यंत जाऊन पोहोचले. मोहम्मद असद यांनी हे कबूल केलं की भारत असं करेल हे आम्हाला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं, तिथे आम्ही कमी पडलो. 

हे भारत पाकिस्तान या देशांमध्ये झालेलं दुसरं युद्ध होतं आणि भारताने ते जिंकलं.

१९७१ चं युद्ध

पूर्व पाकिस्तान म्हणजे आताचा बांगलादेश स्वतंत्र करण्यात भारताने मोठी भूमिका बजावली होती. युद्धकाळात आयएसआयने भारताच्या एकूण हालचालींवर बारीक नजर ठेवली होती.

पूर्व पाकिस्तानात अशांतता होती. यात भारत हस्तक्षेप करण्याची शक्यता पाकिस्तानने हेरली. यातूनच पाकिस्तानने पहिला हल्ला केला. त्यांना भारताला पूर्व पाकिस्तानात घुसण्यापासून रोखायचे होते. पण झालं उलटंच आणि  भारताला हल्ला करायला निमित्त मिळालं. यावेळी आयएसआयने भारत हल्ला करणार नाही अशी पक्की बातमी मिळवली होती. पण इथेसुद्धा भारताने सरप्राईज देत पाकिस्तानला धूळ चारली. या युद्धाचा शेवट म्हणजे सर्वांसमोर शरणागती पत्करून पाकिस्तानने हत्यार टाकले.

 

मंडळी, या दोन घटना भारत आणि पाकिस्तानच्या इतिहासातल्या महत्वाच्या घटना होत्या. यांच्या विशेष उल्लेख या पुस्तकात आढळतो. या पुस्तकाचे ३ लेखक आहेत. पहिले आहेत मोहम्मद असद दुर्रानी, दुसरे म्हणजे रॉ चे माजी प्रमुख ए. एस.  दुलत आणि तिसरे आहेत पत्रकार आदित्य सिन्हा.

सबस्क्राईब करा

* indicates required