चीन आणि शेजारच्या देशांत हे चॉपस्टिक्स आले तरी कुठून? चॉपस्टिक्सने खाता येत नसेल, पण इतिहास तर जाणून घ्या..
चॉपस्टिक्स म्हणजे चायनीज-कोरियन-तैवानीज-जापानीज पदार्थ खाणे हे समीकरण पक्के झालेले आहे. चीन-कोरिया-तैवान या देशांतच काय, आता जगभरात ते-ते पदार्थ चॉपस्टिक्सने खाणे हा रिवाज झाला आहे. भारतीय पूर्वी अन्न फक्त हातानेच खात असत, पाश्चात्त्य काटे-चमचे वापरतात, मग दक्षिण-पूर्वे आशियाई देशांत चॉपस्टिक्स आल्या कुठून ? आजही या देशांत चॉपस्टिक्सने पदार्थ खाल्ले जातात. आज पाहूयात यामागचे कारण काय आहे.
चीनमध्ये चॉपस्टिक्सचा सर्वात पहिल्यांदा वापर १२००ईसापूर्व शांग राजवंशाच्या काळात झाला असे म्हणतात. त्याकाळी चीनमध्ये अन्न शिजवायला मातीची भांडी वापरली जायची. सुरुवातीच्या चॉपस्टिक्स पितळेच्या बनलेल्या होत्या आणि मुख्यतः स्वयंपाकासाठी वापरल्या जात होत्या. आजच्या चॉपस्टिक्सपेक्षा त्यांचा आकार खूप लांबलचक होता. त्या चॉपस्टिक्स उकळत्या तेलाच्या भांड्यांमध्ये खोलवर पोहोचू शकतील अश्या असल्याने वापरायला जास्त सोयीच्या होत्या. त्यामध्ये मांस, नूडल्स आणि तांदूळ शिजवले जायचे. हे अन्नपदार्थ शिजले आहे की नाही हे पाहण्यासाठी चिमट्यासारख्या दोन लाकडी बांबूच्या काठ्या वापरल्या गेल्या. कितीही अन्न गरम असले तरी या चॉपस्टिक्सचा वापर खोल भांड्यात गरम पदार्थ काढण्यासाठी करता येत असे. ईसवी सन पूर्व ४०० पर्यंत मांस बारीक तुकडे करून खाण्यासाठी वापरले जात नव्हते. त्यावेळी स्वयंपाकी तेल वाचवण्यासाठी मांसाचे लहान तुकडे करू लागले. या मांसाच्या तुकड्यांतून चरबी अन्नात मिसळली जात असे. त्यामुळे कमी तेलात पदार्थ उत्तमपणे शिजले जात. त्यावेळी ही या चॉपस्टिक्सचा खूप उपयोग झाला.
अश्या प्रकारे आधी अन्न शिजवण्यासाठी व काढण्यासाठी चॉपस्टिक्स वापरल्या जायच्या. हळूहळू "चायनीज स्टिक्स" वापरण्याची परंपरा बनली. सुरुवातीला सर्वसामान्य लोकांमध्ये दिसणारे चॉपस्टिक्स उच्च वर्गातही वापरले जाऊ लागले. कटलरीच्या भोवती चॉपस्टिक्स ठेवणे सुरु झाले.
नंतर चॉपस्टिक्स वापरण्याचे शिष्टाचार, नियमही बनवले गेले. श्रीमंतांच्या चॉपस्टिक्स या महागड्या म्हणजे सिरॅमिक, काच, चांदी यांपासून बनवल्या जायच्या. तर सामान्य लोक लाकूड आणि बांबूच्या चॉपस्टिक्स वापरत. अश्याप्रकारे चीनमध्ये ती एक परंपरा बनली. ईसवी सन पूर्व ५०० पर्यंत चॉपस्टिकचा वापर चीनपासून शेजारी जपान आणि व्हिएतनाममध्ये पसरला. जपानमध्ये पुरुष, महिला आणि मुलांसाठी चॉपस्टिक्स वेगवेगळ्या आकारांत बनवल्या गेल्या. व्हिएतनाममध्ये चॉपस्टिक्स बनवायला कांस्य लाकूड वापरण्यात आले. ही फॅशन पुढे शेजारच्या देशात आणखी पसरली
चमचा आणि काटा पूर्वेकडे वापरला जायचा. पण चीनमध्ये त्याचा वापर फारसा झाला नाही कारण चॉपस्टिक्सपेक्षा चमचे आणि काटे त्यांना अधिक कठीण वाटत होते.
चॉपस्टिक्स आपल्याकडेही मिळतात. पण ज्यांना त्या वापरण्याची गोम माहित आहे त्यांनाच चॉपस्टिक्स वापरणे सोपे जाते. नाहीतर आपला चमचा आणि काटाच बरा, नाही का?
शीतल दरंदळे