घराबाहेर हाकललेल्या, दिवाळखोर, जुगारी, भुरट्या चोराची लाखोंचा व्यवहार करणारा ब्रिटिश-बादशाहांचा सौदागर झाल्याची गोष्ट!!
(प्रातिनिधिक फोटो)
ग्लोबलायझेशन हा शब्द सध्या चलनी नाण्यासारखा वापरला जातो. पण ग्लोबलायझेशन गेली अनेक शतके व्यापारी, धर्मगुरू, हौशी प्रवासी आणि मुलूखगिरी या चार पध्दतीने होत होतं. या मालिकेलेतील हा पहिला लेख आहे सुंदरजी शिवजी या घोड्याच्या सौदागराबद्दल.
या कथेचा काळ आहे अठराव्या शतकातला. तेव्हा ब्रटिश ईस्ट इंडिया कंपनी हळूहळू भारतात हातपाय पसरत होती, मद्रास, मुंबई आणि कलकत्ता या शहरात कंपनीने चांगला जम बसवला होता, इतर ठिकाणी राजाश्रय मिळवून व्यापार वाढत होता, कंपनी सरकारची फौज तयार होत होती, त्या काळातली ही कहाणी आहे.
त्याकाळात वाहतूक व्यवस्था मुख्यत: घोड्यांवर अवलंबून होती. उत्तम जातीचे घोडे अफगाणिस्तान, इराक,अरेबियातून भारतात आणले जायचे. जहाजातून हे घोडे कच्छ्च्या आखातात यायचे आणि मांडवी बंदरात उतरायचे. एका घोड्यापोटी कंपनीला साडेसातशे रुपये मोजावे लागायचे. त्याकाळी मुंबई बंदर अजून विकसित व्हायचे होते. व्यापारासाठी कच्छ आणि काठियावाड ही दोन ठिकाणे प्रमुख होती. आफ्रिका, अफगाणिस्तान, तुर्कस्तान या देशातून येणारा व्यापारी माल मांडवी, पोरबंदर, गोगा आणि आसपासच्या छोट्या बंदरात उतरायचा. फौजा बनवणे आणि सामानाची वाहतूक करणे या दोन्ही कामांसाठी घोड्यांना मोठी मागणी असायची.
काही वर्षांतच कच्छ आणि काठियावाड परिसरात देशी घोड्यांच्या जाती तयार झाल्या. बाहेरच्या घोड्यांना 'बहेर' घोडे म्हटले जायचे, तर देशी घोड्यांना 'अप्सान-इ-कच्छी' म्हणून ओळखले जायचे. अरबी घोड्यांना मागणी होती, पण ते महाग पडायचे. त्यानंतर हळूहळू काठियावाडी-कच्छी-राजस्थानी घोड्यांचा खास बाजार तयार झाला. घोडे घेणे आणि विकणे यासाठी मोठ्या भांडवलाची आवश्यकता असल्याने व्यापारी कमी आणि दलाल जास्त असायचे. या सौद्यात विकणार्यापेक्षा दलालाचे काम कठीण असायचे. 'बोल बच्चन' देणाराच फक्त दलालाचं काम करू शकायचा. असे बोल बच्चन दलाल फसवाफसवी, हातचलाखीने घोडे विकायचे. घोडेबाजार म्हणजे या गोष्टी गृहितच धरल्या जायच्या. आज प्रचलित असलेला घोडेबाजार हा नकारात्मक शब्द इथेच जन्मला!
पण याच घोडेबाजारातल्या एका माणसाने इतिहास घडवला. त्या माणसाचे नाव आहे सुंदरजी शिवजी खत्री! निव्वळ प्रामाणिकपणाच्या भांडवलावर या माणसाने घोडेबाजारात आपली 'मोनोपोली' बनवली होती. त्याच्या व्यापाराच्या स्टाईलमुळे इतिहासात त्याची नोंद ‘सुंदरजी सौदागर’ अशी आहे.
गोष्ट पुढे वाचण्यापूर्वी आपल्या कथेचा नायक सुंदरजी सौदागरबद्दल जाणून घेऊया.
सुंदरजी सौदागरचे आयुष्य फारच विलक्षण होते. वयाच्या तेराव्या वर्षापासून त्याला जुगाराची चटक लागली होती. जुगारासाठी अधूनमधून भुरट्या चोर्या पण तो करायचा. त्याच्या वागण्याला त्याचे वडिल कंटाळले होते. त्यांनी सुंदरजीला कौटुंबिक वारशाचे २००० कोरी (तेव्हाचे चलन) देऊन त्याच्याशी कायदेशीर फारकत घेतली. थोड्याच दिवसांत ते पैसेही जुगारात संपले आणि सुंदरजीने बायकोचे पैसे चोरायला सुरुवात केली. बायकोनेही त्याला घराबाहेर काढले. बायकोने घराबाहेर काढल्यावर सुंदरजी मांडवी शहरात आला.
मुळात हुषार असल्याने मांडवीच्या नगरशेठची- मनसंग भोजराजची मर्जी त्याने संपादन केली. त्याच्याकडून ७००० कोरी कर्ज घेतले आणि सुंदरजीने घोड्यांची दलाली सुरु केली. सुरुवातीला पाच उत्तम घोडे घेऊन ते मुंबईला पाठवले. त्यात नफा झाल्यावर मनसंग भोजराजने आणखी भांडवल ओतले. त्यातून चौदा घोडे विकत घेऊन कोचीनला पाठवले. थोड्याच दिवसांत एक अट्टल जुगारी मोठा व्यापारी म्हणून ओळखला जाऊ लागला. यानंतर त्याचा लौकिक इतका वाढला की मद्रास सरकारने माँटगोमरी या कर्नलच्या हस्ते सुंदरजीसोबत ५३५ रुपयांत एक घोडा या हिशेबाने विकत घेण्याचा करार केला आणि एक लाख रुपये अगाऊ रक्कम त्याच्या हातात ठेवली.
या नंतर सुंदरजीचा धंदा वाढतच गेला. त्याने काठियावाड आणि सिंध प्रांतात आपले एजंट नेमले. आता त्याचे ग्राहक फक्त ब्रिटिशच नव्हे तर, दक्षिणेत निजाम, टिपू सुलतान यांनाही घोडे पुरवण्याचे काम त्याला मिळाले. त्या वेळच्या एका पत्रात सुंदरजीने मुंबईच्या गव्हर्नरला २२५ घोडे घेण्याचा सल्ला दिलेला आढळतो. सन १८१०-१२ च्या पत्रव्यवहारातून हे पण आढळून येते की त्याने कंपनी सरकारला १८०० घोडे विकले होते.
एकेकाळचा दिवाळखोर जुगारी मुलगा आता कच्छचा मोठा व्यापारी झाला होता. १८३०मध्ये त्याने एक नवा धंदा सुरु केला. घोडे ने-आण करण्यासाठी त्याने सात जहाजे विकत घेतल्याची नोंद आहे. घोड्यांसोबत व्यापार वाढतच गेला. व्यापारी असल्याने कच्छ-काठियावाडचा भूभाग त्याने पिंजून काढला. त्याकाळी कंपनी सरकारची जहाजे कच्छ्च्या आखातात लुटली जात. या समुद्री चांच्यात आणि ब्रिटिशांमध्ये समझौता घडवून आणण्याचे काम त्याने केले. यामुळे कंपनी सरकारात त्याचे महत्व वाढले. एवढे महत्त्व वाढले की ब्रिटिश अधिकार्यांना, "सुंदरजी सांगेल त्याप्रमाणे वागा" असे आदेश देण्यात आल्याची नोंद सापडते.
हे सगळे होईपर्यंत मुघल सत्ता संपुष्टात आली होती. कच्छ, काठियावाड, ओखा, द्वारका इथे अनेक छोटी संस्थाने तयार झाली होती. या संस्थानांच्या तंट्या-बखेड्यात सुंदरजीने निवाडा करण्याचे काम केले. मोरबीच्या संस्थानासाठी त्याने बँकर म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. मोरबी संस्थानाच्या अनेक जमिनी त्याच्याकडे गहाणवटीत असायच्या. तंटे सोडवायच्या कामात मोबदला म्हणून अनेक ठिकाणचा जमीन जुमलाही त्याला देण्यात आला होता.
पण, आजही गुजरातमध्ये त्याचे नाव टिकून आहे ते या श्रीमंतीच्या जोरावर नव्हे, तर त्याच्या औदार्यासाठी! १८१३ साली मोठा दुष्काळ पडला. तेव्हा कच्छच्या ८००० लोकांना त्याने दरदिवशी ३०० रुपये खर्च करून वर्षभर पोसले. पोरबंदरच्या दुष्काळ पिडितांसाठी त्याने रुपये ९००० देणगी दिल्याची नोंद आहे. काठियावाडच्या दुष्काळग्रस्तांना अन्न पुरवठा करण्यासाठी दर दिवशी ६० रुपये खर्च केल्याची नोंदही आढळते. याच दरम्यान बेट द्वारका, द्वारका आणि इतर ठिकाणच्या तीर्थक्षेत्रांच्या पुनर्निमितीसाठी मोठा निधी त्याने दिला.
एकेकाळी घराबाहेर काढलेला, दिवाळखोर, भुरटा चोर अशी ख्याती असलेला सुंदरशेठ सौदागर झाला होता. खत्री सुंदर शिवजी यांचे अधिकृत चरित्र अजूनही लिहिले गेलेले नाही, पण लिहिले गेलेच तर त्याच्या कर्तबगारीच्या, औदार्याच्या कथांसोबत ब्रिटिशांनी गुजरात कसे काबीज केले यावरही प्रकाश पडेल.