computer

सुताच्या आकाराचा बेंडिंग ग्लास ब्रिज...व्हायरल फोटोमागे असलेला खरोखरचा पूल पाहून घ्या !!

पूल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक सरळ जाणार रस्ता व कठडे असेच चित्र येते. पण सध्या एका आगळावेगळ्या पूलाचे फोटो व्हायरल झाले आहेत. तो खरा आहे की फोटोशॉप ट्रिक आहे याची खूप चर्चा झाली. नक्की कोणता पूल आहे हा? आज पाहुयात.

या पुलाला बेंडिंग ग्लास ब्रिज म्हणतात. त्याचा आकार वक्र असा असल्यामुळे त्याला बेन्डिंग ग्लास ब्रिज असे नाव देण्यात आले आहे. चीनच्या झेजियांग भागात हा पूल आहे. या पुलाची निर्मिती दोन टेकड्यांच्या मधोमध करण्यात आली आहे. पुलाचे डिझाइन जेड कॉटन म्हणजे लोकरीपासून प्रेरित आहे. रेशमी सूत ३ वळणदार धाग्यांपासून बनलेले असते त्याप्रमाणे याचा आकार आहे. या पुलाची लांबी १०० मीटर (३२८ फूट) आहे. तो जमिनीपासून १४० मीटर (४५९ फूट) एवढ्या उंचीवर आहे. त्याची अद्वितीय रचना पाहून लोकांचा गोंधळ उडाला. हा खरच अस्तित्वात आहे का यावरच लोकांना विश्वास बसेना. काही सोशल नेटकऱ्यांनी त्याला फोटोशॉप केलेला फोटो म्हटले आहे. त्यावर विनोदही केले. तर काही लोक म्हणतात की असा पूल असणे शक्यच नाही.

या पुलाचं अनावरण २०१७ सालीच झालं होतं, २०२० साली तो पुन्हा लोकांसाठी उघडला गेला. आतापर्यंत २,००,००० हुन जास्त लोक या पुलाला भेट देऊन गेले आहेत. त्याच्या खास डिझाईनमुळे हा पूल पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. 

या पुलाची रचना इस्त्रायली आर्किटेक्ट हॅम डोथान यांनी केली आहे. लोक येथे बंजी जम्प किंवा राईड झिप लाइन देखील करतात. यापूर्वी पोर्तुगालमध्येही असाच एक पूल उघडला होता. पण तो यापेक्षा आकाराने लहान आहे.

हा पूल स्थापत्यशास्त्राचा एक अजोड नमुना आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तुमचं काय मत आहे? आम्हाला नक्की सांगा !!

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required